पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा..!
पहाटेच्या पाणीपुरवठ्यापासून विजेच्या लपंडावापर्यंत; जळगावकरांच्या ‘थेंबा-थेंबाच्या’ नियोजनाचा प्रश्न
चेतन वाणी । महाराष्ट्रात यंदा अल निनोच्या प्रभावामुळे भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आतापासूनच पारा वाढू लागल्याने दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. नदी-नाले कोरडे पडत आहेत, अनेक ठिकाणी पाणीकपात सुरू झाली आहे.
पण आजचा मुद्दा थोडा वेगळा आहे…
जळगाव शहरातही पाणी कपात करण्यात आली आहे. आमच्या परिसरातील म्हणजेच प्रभाग क्रमांक ५ मधील शनिपेठ-काट्याफैल भागात पाणीपुरवठा सध्या पहाटे ५ वाजता सुरू होतो. पूर्वी तर पहाटे साडेतीन वाजताच नळाला पाणी यायचे. म्हणजे झोप गेली उडत!
सध्या पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे, ही समाधानाची बाब आहे. मात्र त्याचवेळी पाणीपुरवठ्याशी संबंधित काही मूलभूत प्रश्नांकडेही पाहणे गरजेचे आहे.
अमृत योजना आल्यानंतर पाणी थेट तिसऱ्या मजल्यावर पोहोचणार, अशी मोठी वल्गना करण्यात आली होती. मात्र सध्याची परिस्थिती पाहता ही वल्गना अद्याप हवेतच विरल्याचे दिसते. पाण्याचा दाब आणि इमारतींची उंची यांचा ताळमेळ बसत नसल्याने अनेक ठिकाणी विद्युत पंप आवश्यक ठरतो.
आणि वीज गेली म्हणजे… बोंबला!
नळाला पाणी आले तरी ते वरच्या मजल्यावर कसे पोहोचणार, हा प्रश्न उभा राहतो. मग ना नीट झोप लागते, ना उठून दुसरे काही करता येते.
याचा अनुभव चार महिन्यांपूर्वी, म्हणजे २४ जून २०२६ रोजीही आला होता. त्या दिवशी सकाळी विद्युत पुरवठा खंडित झाला. नळाला पाणी आले आणि काही वेळातच गेले. मनपाचा वॉल्व्हमन आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभाव नागरिकांच्या अडचणीचे कारण ठरला. अखेर जनता रस्त्यावर उतरली आणि नगरसेवकांसह महावितरण व महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांनाही घटनास्थळी यावे लागले. त्यानंतर पुन्हा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
सुदैवाने, त्यादिवशी मी जळगावात नव्हतो. त्यामुळे मला काहीच करावे लागले नाही!
आज, ६ ऑक्टोबरला पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली. पहाटे ३ वाजेपासून विजेचा लपंडाव सुरू झाला. अगोदरच उकाड्याच्या झळा, त्यात विजेचा कमी दाब असल्याने इन्व्हर्टरही सुरळीत सुरू नव्हता. अशातच पहाटे ४.४५ वाजता विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला.
जेमतेम डोळा लागणार होता… आणि त्याच वेळी नळाला पाणी आले!
आज पाण्याच्या मोटारींचे नेहमीचे आवाज मात्र ऐकू येत नव्हते. नळाला पाणी आले होते, पण ते भरायचे कसे? हा प्रश्न डोक्यात घोळू लागला.
मग काय… फोन सुरू!
सर्वात अगोदर महावितरणचा नंबर फिरवला. नेहमीप्रमाणे आमच्या भागातील कार्यालयाचा आणि संबंधित अभियंत्याचा फोन बंद!
अखेर वॉल्व्हमनला विनंती केली. मात्र पाणी न सोडल्यास पाइपलाइन फुटण्याची शक्यता असल्याचे सांगत त्याने नकार दिला.
पहाटेची वेळ असल्याने नगरसेवक, महापौर, उपमहापौर, महापालिका अधिकारी किंवा महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्रास द्यावा, असे मनाला पटत नव्हते. अखेर नगरसेवक आणि मनपा आयुक्तांना व्हॉट्सॲपवर संदेश पाठवला. महावितरणच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही फोन केला.
नेहमीप्रमाणे दोन अधिकाऱ्यांनी फोन घेतला नाही.
मात्र महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी साहेब यांनी नेहमीप्रमाणे फोन घेतला. तक्रार ऐकून घेतली आणि तत्काळ कार्यवाही केली.
सर्व कैफियत त्यांच्या दरबारी मांडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत दोन संबंधित अधिकाऱ्यांचे फोन आले आणि पुढील दहा मिनिटांत विद्युत पुरवठा सुरळीत झाला.
या सगळ्या गडबडीत जवळपास पाऊण तास गेला.
वीज आली… मोटारी सुरू झाल्या… आणि आजचे पाणी पूर्ण भरले जाणार, याची खात्री झाल्यावर अखेर सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
पण प्रश्न एका दिवसाचा नाही…
जळगाव शहराला पुरेल इतका मुबलक पाणीसाठा वाघूर प्रकल्पात असतानाही दोन दिवसाआड पाणीपुरवठा होतो, अशी नागरिकांची नेहमीच ओरड असते. त्यातच पाणीपट्टी मात्र भरमसाठ घेतली जाते, अशीही तक्रार केली जाते.
आता तर जळगावचे पाणी कोकाकोला पळवणार, असे आरोपही होऊ लागले आहेत. त्यावर सध्या तरी अधिकृतपणे कोणी बोलताना दिसत नाही.
मात्र आजूबाजूची परिस्थिती पाहिली की साधारण २५ वर्षांपूर्वीच्या भीषण पाणीटंचाईच्या आठवणी जाग्या होतात.
भविष्य कठीण आहे.
म्हणूनच मनपाचे युवा आयुक्त, युवा महापौर, उपमहापौर, अभ्यासू ज्येष्ठ नगरसेवक आणि आपल्या शहराचे लाडके आमदार साहेब—या सर्वांनी आजपासूनच पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करण्याची गरज आहे.
काही दिवसांपूर्वी आम्ही उघड्या नळांना तोट्या बसविण्यासाठी निवेदन दिले होते. मात्र त्यावर अद्याप मनपाकडून ठोस कारवाई झालेली दिसत नाही.
पाणी वाचवण्याची सुरुवात मोठ्या घोषणांपासून नव्हे, तर अशा छोट्या उपायांपासूनच व्हायला हवी.
वीज आणि पाणी यांचा ताळमेळ आवश्यक आहे..
आज आमच्या भागात जी परिस्थिती निर्माण झाली, ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या भागात निर्माण होत असते.
विजेचा लपंडाव आणि पिण्याच्या पाण्याची वेळ यांचा ताळमेळ कुठेतरी साधणे गरजेचे आहे.
रोजच ही समस्या निर्माण होत नसली तरी जेव्हा होते, तेव्हा त्या भागातील नागरिकांची मोठी मानसिक आणि शारीरिक धावपळ होते. दिवसाची सुरुवातच तणावाने होते.
मग यावर कायमस्वरूपी काही नियोजन का होऊ नये?
पाणीपुरवठ्याची वेळ, संबंधित भागातील विद्युत पुरवठ्याचे वेळापत्रक, पर्यायी व्यवस्था, महावितरण आणि मनपा यांच्यातील समन्वय या सगळ्यांचा एकत्रित विचार झाला तर अशा समस्या बऱ्याच अंशी टाळता येऊ शकतात.
आज पहाटे माझ्या घरापुरता प्रश्न सुटला. पण उद्या तो दुसऱ्या भागातील नागरिकांसमोर उभा राहू नये, यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे.
माझे व्हॉट्स ॲप संदेश संबंधित सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सकारात्मक पद्धतीने घेतील, याची मला खात्री आहे.
आजच्या दिवसासाठी सर्वांचे मनापासून आभार.
आणि विशेष आभार… महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी साहेब यांचे. पहाटेची वेळ असतानाही तक्रार ऐकून घेऊन तत्काळ कार्यवाही केली. प्रशासनाकडून नागरिकांना नेमके हेच अपेक्षित असते. फोन उचलणारा अधिकारी आणि समस्या सोडवण्याची तत्परता.
बाकी…
पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा..!
आज नळातून आलेला प्रत्येक थेंब एकच सांगून गेला.. पाणी आहे म्हणून शहर आहे; पण पाण्याचे नियोजन नसेल तर उद्याचे शहर किती सुरक्षित असेल, हा खरा प्रश्न आहे.

Comments
Post a Comment