पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग
पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग, आदरातिथ्याने सर्वच खूश
चेतन वाणी - देशभरात लाडक्या बाप्पाची स्थापना झाली असून सर्वत्र प्रसन्न आणि आनंदाचे वातावरण आहे. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या देखील घरी गणरायाची स्थापना झाली आहे. पोलीस अधिक्षकांच्या अभय बंगल्यातील मुख्य हॉलमध्ये अतिशय आकर्षक सजावट करुन बाप्पा विराजमान आहेत. साहेबांच्या बंगल्याचा परिसर म्हणजे नयनरम्य ऐतिहासिक ठिकाण. सर्वत्र हिरवळ, दाट झाडी, झुडपातून जाणारा रस्ता, इंग्रजांच्या काळातील उत्कृष्ट संरचना असलेली दगडी आणि लाकडी इमारत. इथंच विराजमान आहे दिड फुटाची लहानशी बाप्पाची मूर्ती.
पोलीस अधीक्षक दक्षिणेतील असल्याने इंग्रजी, मराठी, हिंदी आणि केरळी भाषेचे मिश्रण त्यांच्या बोलीत असते. जळगावच्या सर्वसामान्य जनतेत ते फारसे मिसळले नसल्याने बोली आणि स्वभाव अजून फारसा सैल नाही. पोलीस अधिक्षकांच्या बोलीमुळे बऱ्याचदा त्यांचा स्वभाव ओळखण्यात अनेकांची गफलत होते. तसा माणूस म्हणजे ते फार सरळ फक्त समजायला थोडा वेळ द्यावा लागतो. एकदा तुमची टोनिंग जमली की मग अगदी दिलखुलास गप्पा होऊ शकतात. सध्या तरी ते ज्यांना समजले त्यांनाच समजले.
बाप्पाच्या पूजेचे हक्काने आमंत्रण
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी साहेबांचा रात्री ७ वाजता अचानक फोन आला. चेतन ८ वाजता माझ्या घरी या.. गणपती बाप्पाचे पूजन आहे. एकतर अधिकारी माणूस असे आमंत्रण देतो म्हणजे हे आदेश नव्हे तर हक्काने बोलावणे आहे हे अगोदर समजून घ्यायला हवे. ८ वाजता मी, सौ आणि मुलगी तिघे साहेबांच्या बंगल्यावर पोहचलो. अगोदर आम्ही तिघेच आणि पंडितजी. साहेब काहीसे बाहेर असल्याने बंगल्यावर सौ.ऐश्वर्या रेड्डी मॅडमांनी स्वागत केले. आणखी २-३ पत्रकार आले आणि साहेब देखील पोहचले.
बाप्पाच्या आरतीचा मिळाला मान
रात्री ८.३० वाजता पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, सौ.ऐश्वर्या, मुले कुशाग्र आणि विहान यांनी बापाच्या पूजेला सुरुवात केली. आरती सुरु होताच रेड्डी परिवाराने आम्हाला देखील आरतीचा मान दिला. माझ्यासोबत उपस्थित इतर भाविक मान्यवरांनी देखील आरती केली. पूजन आणि आरतीसाठी रेड्डी दांपत्य खास साउथ स्टाईल पेहरावत होते. जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्यानंतर बहुदा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनीच माध्यम प्रतिनिधी आणि प्रशासकीय सहकाऱ्यांना बाप्पाचा आरतीसाठी निमंत्रीत केले असावे.
दक्षिणी नैवेद्याच्या प्रसादाने मन झाले तृप्त
बाप्पाच्या नैवेद्यासाठी खास दक्षिण्यात्य पद्धतीने तयार केलेल्या जेवणाचा नैवेद्य दाखवण्यात आला होता. जेवणात थक्कली रसम, मेदू वड़ा, सांबार, मिरची भजे, आलू वडा, गाजर कुचुंबर, पापड, वेदांक्काई पोरियाल (मसाला भेंडी), पोंगल (दही भाताचा प्रकार), अख्खे वांग्याची भाजी, चिताराना राईस (व्हेज पुलाव), भात, डाळ आणि चटणी असे खास दक्षिणी पदार्थ होते. विशेष म्हणजे जेवणात चपाती, पोळी, भाकर हा प्रकार नसला तरी सर्वांनी दाबून जेवण केले. मसाला पान देऊन सर्वांचे तोंड गोड करण्यात आले.
आदरातिथ्य आणि प्रत्येकाशी संवाद
पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी आणि परिवाराने गणरायाच्या पूजन, आरतीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, जिल्हा वन संरक्षक ए.प्रविण, जमील शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, कृष्णांत पिंगळे, परी. सहाय्यक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्यासह इतर मान्यवरांना आमंत्रित केले होते. सर्वांचा आदरातिथ्य करीत रेड्डी परिवाराने छान गप्पा केल्या. लहान मुलगा विहान तर स्वतःच सर्वांशी गप्पा करीत होता. दोन-तीन भाषांचे मिश्रण असलेली त्याची बोली सर्वांना आवडत होती. बाप्पाच्या पूजेनिमित्त झालेला हा स्नेहमेळावा चांगलाच स्मरणीय ठरला.
- चेतन अरुणा रविंद्र वाणी, जळगाव



Comments
Post a Comment