कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'
कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'
जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर देशभरातील वातावरण गेल्या पंधरवड्यात पार ढवळून निघाले. मुख्यत्वे जातीय तणाव आणि दंगली उसळल्या, त्यातल्या तर गल्ली दादा जास्तच दबंगगिरी करू लागले. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पाहिले बोट उगारले जाते ते पोलिसांवर.. टीकेचा धनी पोलीसच होतो.. इतकंच काय तर सध्या दंगलीत पिळले जाणारे देखील पोलीसच.. अगोदर होता तसा खाकीचा दरारा राहिला नाही असे वाटू लागले असले तरी त्यामागे अनेक कारणे आहेत. मानव अधिकार आयोगाची नियमावली, संशयीत, गुन्हेगार, राजकारणी, अवैध धंदेवाल्यांचे वाढलेले प्रस्थ यामुळे सर्वच काही बदलले. सर्व काही असले तरी आजही गुन्हेगारांना वचक घालायला खाकी सक्षम आहे मात्र काही खाकीदार सक्षम नाही. विशेषतः नव्याने गेल्या १० वर्षात भरती झालेले अधिकारी आणि कर्मचारी.
जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलाची आणि सध्याच्या कायदा व सुव्यवस्था आणि गुन्ह्यांची परिस्थिती काही वेगळी नाही. सर्व काही सारखेच. स्थानिक प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी सक्षम ठरत नसल्याने स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षकांना अधिकचे लक्ष घालावे लागत आहे. नुकतेच झालेल्या पाळधी दंगल, अट्रावल तणाव, इतर लहान मोठे जातीय व गुन्हेगारीचे वाद सुरूच आहे. सर्वच ठिकाणी वरिष्ठांना पुढाकार घ्यावा लागला. खाकीने आपला वचक कमी केला किंबहुना आपलेच गद्दार ठरले, कुठे काहींनी माती खाल्ली तर कुठे गुन्हेगारांशी मैत्री वाढली आणि दबले गेले.
जळगाव जिल्ह्यात आजही काही कर्मचारी असे आहेत की त्यांचे नाव काढले तरी चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. गुन्हेगारच काय तर कधी काळचे गुंड आणि आजचे पांढरपोशे दिग्गज राजकारणी देखील त्यांना दचकून असतात. जुनी आठवण पण त्यांना नको वाटते. आज हा विषय काढायचे कारण म्हणजे गेल्या महिनाभरात काही घटना अशा घडल्या की पोलिसांना फार अडचणींना आणि टीकेला सामोरे जावे लागले. दोन दिवसापूर्वीच घटना होती. एका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गटात वाद झाला. दोन्ही गट रुग्णालयात पोहचले, सोबत मोठा जमाव देखील आला. दोन्ही गट समोर असताना देखील सुरुवातीचा तासभर स्थानिक पोलीस 'रिक्वेस्ट मोड'मध्ये होते तर उपविभागीय पोलीस अधिकारी येताच ते 'ॲक्शन मोड'मध्ये आले. अगोदरच काय तो दणका दिला असता तर सर्व शांत झाले असते.
दोन-तीन दिवसापूर्वी देखील एका गुन्हेगाराने पोलिसांशी हुज्जत घातली पण पुढे काय तर त्याला सोडून देण्यात आले. दोन महिन्यांपूर्वी देखील टॉवर चौकात दोन वेळा पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि वाळू माफियांचा वाद झाला होता मात्र नंतर सर्व चिडीचूप. एका अवैध धंदे चालकाने तर पोलिसांवर आरोप केले होते मात्र ते पण गोडी गुलाबीने शांत करण्यात आले. आता पुन्हा वळूया मूळ मुद्द्याकडे.. जळगाव पोलीस दलात दरारा असलेल्या दोन नावांपैकी एक म्हणजे पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग (अण्णा) पाटील आणि दुसरे म्हणजे विजयसिंग (बापू) पाटील. एक काळ गाजवलेली ही जोडी आजही त्याच दमाने काम करते आहे. गुन्हे शोध असो की कायदा व सुव्यवस्था हाताळणी. दोघे नेहमी पुढे असतात. महिनाभरापूर्वी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा रातोरात हटविल्यानंतर कायदा व सुव्यवस्था रोखण्यात पुढे असलेले विजू बापू मी पाहिले तर ती धोक्यात आणणारे मात्र कुठे चमकले नाही. लोखंडी गेट वर उभे राहून त्यांनी सर्वांना सांभाळले आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळला. अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस प्रशासन तेव्हा टीकेचे धनी ठरत होते मात्र बापूंनी हसून सर्व समाज बांधवांना जोडून ठेवले. सोशल मीडिया हौसेपोटी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या उगवत्या इंस्टास्टारमुळे जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार होती बापूंनी त्याच्या मुसक्या तर आवळल्याच पण त्याला वठणीवर आणत गावाबाहेर रवाना देखील केले. बापूंनी चार भिंतीत दिलेले डोस कुणालाही समजले नाही पण त्याला मात्र आयुष्यभर कामी येतील.
शहर पोलीस ठाण्यात आणि आता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अण्णांनी आपला दरारा कायम ठेवला आहे. संवेदनशील आणि गुन्हेगारी अधिक असलेल्या भागात ते उभे जरी राहिले तरी चोरट्यांना पळता भुई होते. अण्णा भुसावळ पोलीस ठाण्यात नेमणुकीला असण्यापूर्वी इराणी मोहल्ल्यातून एखाद्याला पकडून बाहेर आणण्यासाठी १०० ते १५० पोलीस कर्मचारी लागत होते मात्र अण्णा गेल्यावर केवळ तीन पोलीस कर्मचारी हे काम करू लागले. भुसावळला तेव्हा मोठे गँगवार झाले, ७ खून झाले सर्वांना अण्णांनी जेरबंद केले. दरारा म्हणतात तो यालाच.. मिशांना ताव देत अण्णा एकेकाला कसे वठणीवर आणतात हे मला चांगलेच ठावूक आहे. जुने अट्टल गुन्हेगार, चोरटे आणि आजच्या उगवत्या गल्ली गुंड, दादांना देखील त्यांचा दरारा माहिती आहे. आजही पैलवान असलेल्या अण्णांना गुन्हेगारांना वठणीवर आणायला रामरतन पट्ट्याची देखील गरज भासत नाही. कानाखाली एकच आवाज काढला की ते पोपटासारखे बोलू लागतात. अण्णांनी अनेक चोरटे, गुन्हेगारांना रोजगार देखील मिळवून दिला. आज कुणी बस स्थानकावर चहा विक्री करतो तर कुणी हॉटेलात कामाला आहेत. कुणी चालक झाले. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना देखील अण्णा खंबीरपणे उभे आहेत.
दोघांनी जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले अनेक अवैध धंदे कोणताही राजकीय दबाव न जुमानता बंद पाडले होते. तेव्हा होणाऱ्या चोऱ्या, घरफोड्या रोखल्या आणि जिल्हा हादरलेल्या घटनेतील म्हणजे रात्रीच्या वेळी डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या मानसिक रुग्णाला पकडण्यात देखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे. विशेष म्हणजे अण्णा आणि बापू दोघे निर्व्यसनी असून आजच्या तरुण, जबाबदारीचे भान नसलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडून घेण्यासारखे खूप काही आहे. फिटनेस तर पाहण्याजोगे आहे. मनात जे तेच तोंडावर असा त्यांचा स्वभाव आहे, त्यामुळे राग आणि प्रेम सर्व काही स्पष्टच असते.
पोलीस अधीक्षक एम. राज कुमार हे जिल्ह्यात नवीनच असून जिल्ह्याची पूर्णतः ओळख करून घेण्यापूर्वीच हे वाद उफाळून येऊ लागले. गुन्हेगारांना कागदोपत्री लगाम घालण्यासाठी त्यांचा मास्टर प्लॅन योग्यच आहे मात्र मास्टर माईंड गुंडांना आणि पडद्यामागून सूत्रे हलविणाऱ्यांना ठिकाणावर आणायला त्यांना 'अण्णा-बापू' सारखेच कर्मचारी लागणार आहे. नवख्या मंडळीत देखील ३-४ चेहरे तसे दमदार आहेत हे गुन्हेगारांना त्यांची लायकी दाखवून देतात. पोलीस अधीक्षक आपल्या पद्धतीने नक्कीच भविष्यात काही बेत आखुन असतील आणि जोडीला अनुभवी व नेहमी पोलीस दलाच्या हिताचा विचार करणारे एलसीबी निरीक्षक किसनराव मजन पाटील हे वजीर म्हणून त्यांच्या सोबत असणारच हे निश्चित. येत्या पंधरवड्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या आहेत, तेव्हा पोलीस अधिक्षकांनी सर्व समावेशक विचार करून नेमणुका केल्यास येणारा निवडणुकांचा काळ कायदा व सुव्यवस्था राखून पार पडेल यात शंका नाही.

Comments
Post a Comment