पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

पोलिसांनी मनाशी निश्चित केले तर ते काहीही करू शकतात. गुन्हेगाराला शोधणे असो कि सर्वसामान्यांना न्याय देणे असो.. पोलीस सर्वच करू शकतात. नुकतेच जळगाव शहरात घडलेल्या दोन घटनांमध्ये याचा फार जवळून प्रत्यय आला पण त्यासाठी पोलिसांशी असलेले जवळचे संबंध देखील कारणीभूत ठरले. पोलिसात प्रत्येकाचा कोणत्या ना कोणत्या मार्गाने जुगाड हवा हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले. 

जळगाव शहरातून २५ दिवसापूर्वी एक महिला आपल्या दोन चिमुकल्यांसह बेपत्ता झाली. नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठून नोंद केली. तपासी अंमलदाराने तपास सुरु केला मात्र तो काही वेळेपुरते मर्यादित ठरला. पाच दिवस उलटले तरी महिलेचा तपास लागत नव्हता. मोबाईल बंद, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात काही दिसत नव्हते. नातेवाईक हतबल झाले. एक दिवस अगोदरच घरात भांडण झाले होते. संतापात चुकीचे पाऊल तर उचलले नसेल अशी शंका मनात येत होती. नातेवाईकांनी अजमेर, सुरत, जालना, बऱ्हाणपूर, रावेर, जामनेर, जळगाव, चाळीसगाव, धुळे, नंदुरबार असे हजारो किलोमीटरचे अंतर शोधाशोध करीत पालथे घातले. 

सर्व बाजूने निराशा हाती येत असल्याने अखेर नातेवाईक आमच्याकडे आले. आम्ही पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली असता तात्काळ तपास एलसीबीकडे दिला. एलसीबीचे तत्कालीन निरीक्षक बबन आव्हाड यांनी माहिती घेत याबाबत पोलीस कर्मचारी अक्रम शेख आणि ईश्वर पाटील यांना सूचना केला. नेत्रम कक्षाचे मुबारक देशमुख आणि अक्रम यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. अगोदर आमच्या नजरेतून जे सुटले होते ते त्यांनी हेरले. महिला मुलांसह अनेक रिक्षा बदलवून पाचोरा पोहोचल्याचे त्यांनी निष्पन्न केले. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पाचोरा निरीक्षकांना कळविले तर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण यांना सूचना केल्या. पाचोऱ्यात एलसीबीचे कर्मचारी लक्ष्मण पाटील आणि जितेंद्र पाटील यांनी सहकार्य केले. चौकशी केली मात्र तो तपास भडगावपर्यंतच पोहचला.

बघता बघता १५ दिवस झाले आणि पुढे पुन्हा तपास थंडावला. पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली. पोलीस अधिक्षकांनी तात्काळ सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण यांना बोलावून घेत सर्व जाणून घेतले. दुसरीकडे एलसीबीचे निरीक्षक संदीप पाटील यांना सूचना करून एक कर्मचारी देण्याचे सांगितले. पोलीस कर्मचारी अतुल वंजारी यांनी सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण यांच्या मदतीने कसून शोध सुरु केला. दोन वर्षांचे सीडीआर, एसडीआर तपासले. अगोदर जे काही पुरावे समोर आले होते ते पुन्हा तपासले. काही सुटले आहे का याचा शोध घेतला आणि एक आशेचा धागा गवसला. महिला मुलांसह नाशिक येथे सुखरूप असल्याची माहिती मिळाली. 

पोलीस पथक तात्काळ नाशिक रवाना झाले. आई आणि मुले दोघे सुखरूप असल्याचे पाहून सर्वच सुखावले. नातेवाईकांच्या डोळ्यात तर आनंदाश्रू तरळले आणि जीवात जीव आला. सर्वांना घेऊन पोलीस घरी पोहचले. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी सर्वांना घरी पाठवले. महिलेचा भाऊ, आई, नातेवाईक यांनी तिची समजूत काढली आणि तिला समजून घेतले. अखेर २५ दिवसांनी मोहीम फत्ते झाली मात्र हे सर्व पोलीस प्रशासनाशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध, मित्रांचे सहकार्य आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन यामुळेच शक्य झाले. 

दुसरी अशीच एक घटना म्हणजे आठ दिवसापूर्वी एक १७ वर्षीय विद्यार्थी १२वी नापास झाल्याचे आई बोलल्याचा राग मानून सकाळीच घरातून निघून गेला. एकुलता एक मुलगा संतापात गेल्याने आई कासावीस झाली. तिचे अश्रू थांबत नव्हते. नातेवाईक, मित्र, शहरात शोध घेतल्यानंतर देखील तो मिळून येत नसल्याने अखेर दुपारी त्यांनी पोलीस ठाणे गाठले. जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी जयेश मोरे आणि एकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. विद्यार्थी भोईटेनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या दिशेने जात असल्याचे कैद झाले. पुढे पोलीस कर्मचारी राहुल पाटील आणि अनिल कांबळे यांनी जळगाव रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. १२ तास उलटले तरी विद्यार्थी सापडत नसल्याने अखेर गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु झाली. रविवार असल्याने बरेच दुकान बंद होते त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होऊ शकत नव्हते. अखेर रात्री ७.३० वाजता मुलगा भुसावळला असल्याचा फोन आला आणि आईच्या जीवात जीव आला. मुलाला सुखरूप ताब्यात घेऊन आई घरी आली आणि पोलिसांना कळवले. 

दोन्ही घटनेत आपले पोलिसांमध्ये चांगले संबंध असले तरच काम होऊ शकते हे पुन्हा सिद्ध झाले. पोलिसांनी मनावर घेतले तर ते सर्व काही करू शकतात आणि सर्व रोखू देखील शकतात. माझी पाच वर्षापूर्वी चोरी झालेली दुचाकी शोधण्यात पोलिसांना यश आले नाही हे भाग वेगळा आहे मात्र माझ्या दुचाकीचा शोध घेतांना इतर १०० दुचाकी सापडल्या हे देखील तेवढेच खरे आहे. 

Comments

Popular posts from this blog

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग