'एसपीं'मधील बापाने दिले चिमुकलींना खेळाडूवृत्तीचे धडे!

 'एसपीं'मधील बापाने दिले चिमुकलींना खेळाडूवृत्तीचे धडे!

जळगावात नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडली. सागर पार्क मैदानावर आयोजित स्पर्धेत सहभागी संघांनी अतिशय चुरसदार आणि उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन दाखविले. विशेष म्हणजे महिला संघ देखील काही मागे नव्हत्या. एकापेक्षा एक सरस खेळाचे प्रदर्शन दाखवीत महिला खेळाडूंनी आपले डाव टाकले. कुठे विजय हाती आला तर कुठे पराभवाला सामोरे जावे लागले. अनेकांना तर दुखापत देखील झाली पण त्यापेक्षा जास्त चिंता दिसली तरी 'हार-जीत'ची.







जळगाव शहराचे पोलीस अधीक्षक एम. राज कुमार पहिल्या दिवशी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी दिसून आले. दुसऱ्या दिवशी मात्र ते आपली मोठी मुलगी प्रणव्या आणि लहानगी प्रगती यांच्यासह चक्क मैदानाजवळ खुर्ची घेऊन बसले. व्यासपीठावर न बसता चक्क मैदानाजवळ त्यांनी खुर्ची टाकल्याने सर्व अवाक झाले. 'एसपी' साहेब पुढे बसले त्यामागील कारण काही वेगळेच होते. स्पर्धा बघायला एसपी नव्हे तर एक बाप आपल्या चिमुकलींना घेऊन आल्याचे तेव्हा पाहायला मिळाले.

संस्काराचे बाळकडू लहानपणीच दिले जातात हे तेव्हा प्रकर्षाने जाणवले. विशेष म्हणजे आपल्या लहान मुलीला मांडीवर बसवून एसपी खेळातील एक-एक डाव आणि पेच तिला समजावून सांगत होते. दोन्ही मुली देखील उत्सुकतेने सर्व समजून घेतांना दिसल्या. आपण कोणत्याही पदावर असलो तरी जमिनीवर राहूनच सर्व काही शिकता आणि शिकवता येते हे तेव्हा एक बाप म्हणून पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी दाखविले. साहेबांच्या मागील बाजूस उभे राहून माझ्या २ वर्षाच्या 'दिविशा'ला मी तेच कबड्डीचे बाळकडू देत असताना सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करता आला. साहेब मुलींना कबड्डी दाखविण्यात आणि शिकविण्यात इतके दंग झाले होते की कदाचित मी त्यांना कॅमेऱ्यात कैद केले हे कळले देखील नसावे.

घरात बसून चिमुकल्यांच्या हाती मोबाईल आणि टीव्हीचे रिमोट देणाऱ्या, मैदानी खेळांपासून दूर ठेवणाऱ्या पालकांनी एकदा पोलीस अधीक्षकांकडून काही बोध घ्यावा आणि आपल्या मातीची मुलांना सवय होऊ द्यावी इतकंच..!

Comments

Popular posts from this blog

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग