१४ सप्टेंबरपासून आपल्यासेवेत "सुरेशदादा"

१४ सप्टेंबरपासून आपल्यासेवेत "सुरेशदादा"

आत्मशुद्धीच्या पर्युषण पर्वात..
हृदयापासून क्षमा करा आणि बळही द्या..

     जैनधर्मियांच्या पवित्र पर्वधीराज पर्व पर्युषण पर्वाच्या समाप्तीला शहराच्या राजकारणात गेल्या 35 वर्षांपासून एकहाती सत्ता गाजविणारे सुरेशदादा जैन साडेचार वर्षानंतर समस्त जळगावकरांची क्षमा मागून पुन्हा समाज(राज)कारणात सक्रिय होणार असल्याचा सूचक संदेश त्यांनी दिला आहे.
    घरकुल घोटाळ्याप्रकरणी गेल्या साडेचार वर्षांपासून कारागृहात असलेले माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना राजकीय हितशत्रू माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांच्या जन्मदिनाचा योगायोग साधत जामीन मिळाला. तेव्हा सर्वांच्या मनात एकच प्रश्न 'दादा' पुन्हा सक्रिय होणार का? जळगावकरांना लवकरच या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे.
     एकेकाळी जळगावची ओळख 'सुरेशदादा' अशी होती. पहावे तिकडे फक्त 'दादा' हेच नाव सर्वांच्या मुखी आणि समोर होते. सुरेशदादा यांनी जळगावच्या राजकारणात सक्रिय असतांना 35 वर्ष शहरासाठी आपले योगदान दिले. विधानपरिषद निवडणुकीत जैन यांचे नाथाभाऊंसोबत चांगलेच बिनसले. त्यानंतर सुरेशदादांना साडेसातीचा लागली. घरकुल घोटाळ्याप्रकरणी त्यांना कारागृहात जावे लागले. दादा काही महिन्यात जामिनावर बाहेर येणार असे वाटत असतांना त्यांच्या अडचणी वाढतच गेल्या. एका मागोमाग एक जामीन न्यायालयाने फेटाळले. गेल्या विधानसभा निवडणुकीत 'मोदी लाट'चा मोठा फटका दादांना बसला आणि ते पराभूत झाले. कारागृहातील त्यांचा प्रवास साडेचार वर्ष झाल्यावर नुकताच त्यांना जामीन मिळाला.
     दादा कारागृहात असतांना त्यांचे खंदे समर्थक आणि पक्षही जिल्ह्यात डगमगला. दादांना जामीन मिळाल्यानंतर सर्वांमध्ये एक नवचैतन्य साकारले. समर्थकांनी जळगावात दादांचे जंगी स्वागत (शक्ती प्रदर्शन) केले. दुसऱ्या दिवशी सर्वत्र पुन्हा एकच चर्चा 'फक्त दादा'.
     दादा स्वगृही आल्यानंतर त्यांचे पुढील पाऊल काय? या प्रश्नाने सर्वांच्या मनात हुरहूर लावली. महिनाभर मी आराम करणार असल्याचे दादांनी सांगितले. परंतु आज पर्युषण पर्वाच्या संवत्सरीला सुरेशदादा जळगावकार नागरिक, ते ओळखत असलेल्या सर्वांची माफी मागून पुन्हा समाजकारणात सक्रिय होणार असल्याचा सूचक संदेश त्यांनी एका जाहिरातीतून दिला आहे.
१४ सप्टेंबरपासून आपल्यासेवेत 'दादा'
     सुरेशदादा जैन आज दि.७ पासून आपल्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी दि.१३ पर्यंत राजस्थान येथे जाणार आहे. दि.१४ नंतर पुन्हा तोच रुतबा, तोच दरारा, तोच आदर आणि तेच 'दादा' आपल्या सेवेत असतील...☺
दादांचे नियोजन काय?
सुरेशदादा जैन पुन्हा सक्रिय होणार असल्याचा संदेश त्यांनी जरी दिला असला तरी त्यांची पुढील कारकीर्द शिवसेनेतून असणार, खाविआ, नवीन आघाडी हे अद्याप काही स्पष्ट नाही. सुरेशदादा आणि नाथाभाऊ एकत्र येणार हि चर्चा कितपत खरी ठरणार हे तर येणारा काळच सांगेल.
विधानपरिषद तोंडावर?
विधानपरिषद आमदार गुरुमुख जगवानी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सध्या विधानपरिषदेची जागा रिक्त आहे. सुरेशदादा बाहेर येण्यापूर्वी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरु केली होती, परंतु आता दादा स्वतः विधानपरिषद लढविणार कि, कोणाला तरी पुढे करणार हा पण यक्षप्रश्न आहे.
जाहिरातमधील मजकूर थोडक्यात...
     मी आजपर्यंत राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करीत होतो. मात्र गेल्या साडेचार वर्षांपासून संवाद साधू शकलो नाही. आपण दिलेले प्रेम, आशीर्वाद न विसरता मी आपल्या हृदयात राहू इच्छितो. जेव्हापासून आपला परिचय झाला, तेव्हापासून आजपर्यंत माझ्यासह माझ्या परिवाराकडून जाणते-अजाणतेपनी आपला अपमान झाला असेल, मन दुखावले असेल, आपली निंदा केली असेल वा वाईट चिंतले असेल किंवा कठोर वचन काढले असेल... तर दोन्ही हात जोडून, अश्रूपूर्ण नयनांनी, हृदयापासून आपली क्षमा मागतो व पुन्हा समाजकारणाच्या उद्देशाने आपल्या सेवेत रुजू होण्यासाठी आपल्याकडून आशीर्वादरुपी बळाची अपेक्षा करतो.

Comments

Popular posts from this blog

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'