साडेतीनशे वर्षांचा इतिहास असलेले तरसोदचे गणपती मंदिर
साडेतीनशे वर्षांचा इतिहास असलेले तरसोदचे गणपती मंदिर
तरसोद, नशिराबाद, मुराराखेडा(उजाळगाव), या तीन गावांच्या सिमेसमोर तरसोद शिवारात इ.स.1662 साली मोरेश्वर हणमंत देशमुख यांनी बांधलेल्या श्री क्षेत्र तरसोद गणपती मंदिर या जागृत देवस्थानाची पंचक्रोशीत ख्याती असून आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी लाखो भाविक दरवर्षी मंदिराला भेट देत असतात. प्रचाराचा नारळ वाहायचा असो की लग्नानंतरचे देवदर्शन असो जळगावकरांची पहिली वारी असते ती तरसोदच्या गणरायाच्या चरणी.
असा आहे इतिहास :
पद्मालयचे सिध्द पुरूष गोविंद महाराज व आळंदी देवीची येथील सिध्द पुरूष नरसिंह सरस्वती स्वामी महाराज तसेच नशिराबाद येथील शिव योगिराज झिपरू अण्णा महाराज हे मंदिर परिसरात दर्शन घेण्यासाठी यायचे. शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज आणि नशिराबादचे परम पुज्य झिपरू अण्णा या तिघे महाविभूती नशिराबादच्या पश्चिमेला दोन कि.मी. अंतरावर असलेल्या ज्या चिंचेच्या महाकाय वृक्षाखाली असलेल्या गणपती मंदिराजवळ बसत तेच हे तरसोदच्या गणेशाचे मंदिर. शेगाव येथील गजानन महाराज मंदिरात याची नोंद सापडते.
नशिराबाद येथील भाविक पूर्वी संकष्टी चतुर्थीला पद्मालय येथे अमोद व प्रमोद गणरायाच्या दर्शनासाठी जात असत. त्यावेळी तेथे पुज्य श्री गोविंद महाराज वास्तव्य करीत होते. त्यांनी पांडवकालीन पद्मालय येथील गणपती मंदिराचा जीर्णोध्दार केला होता. एके दिवशी नशिराबाद येथील भाविकांना या सिध्दपुरूषांने सांगितले की, पद्मालय येथील देवालयाचे पूर्ण स्वरूप नशिराबादजवळच असलेल्या तरसोद या गावी आहे. त्यानंतर परिसरातील भाविक तरसोद येथे दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला येऊन जागृत गणरायाचे पूजन करू लागले. काही दिवसांनी स्वत: पुज्य श्री गोविंद महाराज यांनी तरसोदच्या गणपतीची महापूजा केली, अशी आखायिका आहे.
मराठ्याच्या फौजा उत्तरेकडे मुलूखगिरी करण्यासाठी जात, तेव्हा या परिसरात विश्रांतीसाठी थांबत असत. त्याकाळी तरसोद- नशिराबाद या मार्गावर छोटेसे गणेश मंदिर होते. मन्यारखेडे, भादली बु॥, खेडी व नशिराबाद परिसरातील भाविक देवदर्शनाला यायचे. त्यावेळी हा भाग नाईक निंबाळकर या पंचकुळी मराठा सरदाराच्या ताब्यात होता. शिवरायांची पहिली पत्नी येसूबाई नाईक निंबाळकर घराण्यातीलच होत्या. असा ऐतिहासिक वारसा देखील तरसोदच्या जागृत गणरायाला आहे.
तरसोद ग्रामपंचायतीत नोंद :
मुरारखेडे येथील मोरेश्वर देशमुख यांनी बांधलेल्या या मंदिराबाबत हे तरसोद ग्रामपंचायतीच्या व्हिजीट बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. इतिहास संशोधक द.ग.काळे, इतिहास संशोधक मेंबर स्टेट बोर्ड फॉर हिस्टॉरिकल रेकॉर्ड अॅन्ड एन्शंट मॉन्यूमेंटस मुंबई यांनी 9 मार्च 1958 रोजी मंदिर पुरात असल्याची नोंद केली आहे.
लोकवर्गणीतून मंदिर आवाराचा विस्तार :
तरसोद मंदिर देवस्थान विशस्त समितीची स्थापना 24 जुलै 1980 रोजी झाली. त्यानंतर जवळपास दहा वर्ष समितीचा फारसा प्रचार नव्हता. लोकवर्गणीतून 1991 मध्ये मंदिराच्या 30 बाय 60 फूट सभागृहाचे काम करण्यात आले.
प्राचीन मंदिर मातीचे होते. सन 2000 मध्ये मंदिराचे पक्के बांधकाम करून त्याला मार्बल बसवून मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला.
दरवर्षी लोकवर्गणीतून मंदिर आवाराचा विकास करण्यात आला. मोतीराम बिलाखी भिरूड यांनी त्यांच्या पत्नी पत्नी सुशीलाबाई यांच्या स्मरणार्थ 50 बाय फूटाचे सभागृह बांधून दिले.
मंदिर समितीने कार्यालय आणि विशेष कक्ष, महिला व पुरूष प्रसाधन गृह बांधण्यात आले. मागील व पुढील प्रांगणात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. पाणी पुरवठ्यासाठी विहिरींनी पाणी नसल्याने ट्युबबेल करण्यात आल्या, त्यावर 7.5 व 10 हॉर्सपॉवरचे दोन पंप बसविले. पाण्याच्या टाकीची साठवण क्षमता 5 हजार लीटर आहे.
मंदिरासाठी कै.पु.न.उखा अलकरी यांच्या वारसांनी 36 आर जमीन दान दिली. त्यानंतर मंदिर समितीने 1.98 आर हेक्टर जमीन खरेदी केली. समितीने 65 बाय 30 चा 1 पत्री हॉल बांधला आहे. सुरक्षेच्या दृष्टिने मंदिर आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.
वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल
श्री क्षेत्र तरसोद येथे वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल सुरूच असते. कार्तिक शुध्द पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमेला 1 दिवसांचा यात्रोत्सव असतो. प्रत्येक संकष्टी आणि अंगारकी चतुर्थीला भाविकांच्या अलोट गर्दीमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.गणेश जयंतीच्या दिवशी गायत्री यज्ञ, होम हवन, पुजा, पाठ दिवसभर सुरू असतात. दर्शनासाठी येणार्या भाविकांना प्रसाद म्हणून बुंदी दिली जाते. मंदिराला वर्षभरात लाखो भाविक भेट देतात.
मंदिराच्या आवारात असलेल्या 350 वर्ष जुन्या वड आणि चिंचेच्या झाडाखाली भाविक क्षणभर विश्रांती घेत असतात.
तीर्थक्षेत्र 'ब' मंजूरीची प्रतिक्षा
श्री क्षेत्र तरसोदचा समावेश तीर्थक्षेत्र 'ब' वर्गात होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून तो मंजूरीच्या अंतिम टप्प्यात आहे. 'ब' वर्गाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर मंजूर निधीतून परिसराला वॉल कंपाऊंड, पाण्याची मोठी टाकी उभारणे, भक्त निवास, उद्यान बांधणे यासह विविध सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रस्त्याची दूरवस्था लवकरच दूर होणार
तरसोद देवस्थानापर्यंत पोहचण्यासाठी महामार्गापासून रस्ता आहे. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून भाविकांना खडतर प्रवास करून बाप्पाच्या दर्शनासाठी जावे लागते. नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता त्याठिकाणी आले असता रस्त्यासाठी 5 कोटी रूपये मंजूर करण्यात येणार असून लवकरच कामाला सुरूवात होईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Comments
Post a Comment