पत्रकारांच्या मनोरंजनाचा नवा अध्याय.. पत्रकार प्रीमिअर लीग!
पत्रकारांच्या मनोरंजनाचा नवा अध्याय.. पत्रकार प्रीमिअर लीग!
चेतन वाणी : पत्रकार हा समाजासाठी नेहमीच झटत असतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांची आजची परिस्थिती लक्षात घेता तुटपुंज्या वेतनात डोंगराएवढ्या बातम्यांच्या मागे धावावे लागते. स्वतःचे आयुष्य आणि आरोग्य हरवत चालेल्या पत्रकारांच्या मनात मनोरंजनाचा नवीन किरण जागरूक करण्यासाठी नुकतेच पार पडलेला नवीन अध्याय म्हणजे पत्रकार प्रीमिअर लीग. महाराष्ट्रात प्रथमच जळगाव जिल्ह्यात पत्रकार प्रीमिअर लीगचे गुंफले गेले. भल्याभल्यांना सहा महिने मेहनत घेऊन देखील शक्य होत नाही असे कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही पार पाडले. पहाटे ४ वाजता घरी पोहचून आज सकाळी १२ वाजता पुन्हा पत्रकार परिषदेला उपस्थित राहणे हेच पत्रकारांचे आयुष्य.
पत्रकार प्रीमिअर लीग पर्व-१. क्रिकेट प्रीमिअर लीग म्हणजे आमच्यासाठी नवखा विषय. साधारतः १०-१२ वर्षांपूर्वी जैन उद्योग समूहतर्फे पत्रकारांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जायच्या त्या मला ठाऊक होत्या मात्र तेव्हा फक्त खेळायला जाणे आणि आनंद लुटणे इतकेच होते. यंदा स्पर्धेच्या पहिल्या पर्वाची संकल्पना घेऊन किशोर पाटील आणि सचिन गोसावी माझ्याकडे आले. क्रिकेट आवडीचा विषय असल्याने लागलीच त्यावर आमचे एकमत झाले. पत्रकारितेत जुने असल्याने वाल्मिक जोशी जुळले. क्रिकेट लीगचा अनुभव असल्याने जकी अहमद सोबत आले तर मदत करणारे कार्यकर्ते भरमसाट असलेले वसीम खान सोबत आले. सहा लोकांच्या समितीने दीड महिन्यापूर्वी नियोजन केले.
स्पर्धा आयोजित करताना स्तुती आणि टीका होणार याची पूर्व तयारी आम्ही अगोदरच करून ठेवली होती. स्पर्धेसाठी अनेक जबाबदाऱ्या होत्या. मैदान शोधणे, तारीख बुक करणे, टेन्ट, साउंड, लाईव्ह, ट्रॉफी, लाईट्स, अंपायर, स्कोरर या सर्व व्यवस्था करणे. सर्वात मोठी जबाबदारी होती ती कपडे, किट आणि जेवणासाठी प्रायोजक मिळवणे. काही लोकांची नावे निश्चित करून आम्ही कामाला लागलो. सर्वच मैदान आगाऊ बुक असल्याने शिवतीर्थ मैदान दि.१० ते १२ फेब्रुवारी उपलब्ध झाले. अवघा एक महिना आमच्याकडे शिल्लक होता. प्रत्येकाने जबाबदारी वाटून घेतली आणि काम सुरु झाले. कमी वेळेत मोठे शिखर सर करायचे होते. मनात कोणतीही शंका न ठेवता स्पर्धा यशस्वी करायचीच हे मात्र निश्चित होते. आम्ही जवळपास सर्व संपादकांची भेट घेऊन त्यांना स्पर्धेची कल्पना दिली आणि सल्ला मागितला. मार्गदर्शकांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले त्यामुळे पुढील मार्ग सुकर झाला.
स्पर्धा जरी केवळ पत्रकारांसाठी असली तरी सर्व माध्यमातील पत्रकारांना एकत्र करणे आणि त्यातून एका संघात केवळ १३ खेळाडू निवडणे हे फार मोठे काम होते. ग्रामीण भागातील पत्रकारांचा उत्साह मोठा होता. काही तर अगोदरच तयारीला लागले आणि सराव सुरु झाला. यावल संघ पूर्ण जोमाने सराव करीत असल्याचे समजले. जळगाव संघाने देखील सराव सुरु केला. स्पर्धेचा दिवस उगवला. मैदानावर अगोदर दुसऱ्या स्पर्धा असल्याने रात्री १२ वाजता मैदान आमच्या ताब्यात आले. पहाटे ३.३० पर्यंत सर्व सहकारी मैदानावर काम करीत होते आणि सकाळी ८ वाजता पुन्हा हजर झाले. अवघ्या ४ तासांची झोप आणि दिवसभराची मेहनत.
स्पर्धा सुरु झाली आणि तीन संघ आलेच नाही. काही संघांना लांबवरून यावे लागणार असल्याने तर काहींचे इतर व्यवसाय नोकरी असल्याने त्यानुसार स्पर्धेच्या वेळ जुळवून आणल्या. पहिल्या दिवशी कोल्ड ड्रिंकची व्यवस्था नव्हती हे आम्हाला लक्षात आल्याने दुसऱ्या दिवशी लागलीच ती व्यवस्था करण्यात आली. तिन्ही दिवस सर्वोत्तम जेवण देण्याचा आम्ही प्रयत्न केला. स्पर्धेसाठी प्रायोजकांच्या भरवशावर सर्व बुकिंग करून ठेवल्या मात्र ऐनवेळी अनेकांचे पैसेच आले नाही. काहींनी कमी दिले तर काही अजूनही उधारीवर आहेत. स्पर्धा संपताच पैसे मागणारे समोर उभे राहिले. ओळखीचे आणि जवळचे लोक होल्डवर आहेत तर इतरांना आहेत ते देऊन शब्द पाळला आहे.
स्पर्धेत सहभागी प्रत्येक खेळाडू, संपादक, पाहुणे मंडळी, प्रायोजक आणि मदत करणाऱ्या सर्वांना योग्य सन्मान मिळावा त्यांची योग्य सोय व्हावी यासाठी आयोजक समितीने पुरेपूर प्रयत्न केले. यामिनी कुलकर्णी, सुनील भोळे, राकेश वाणी, अश्रफ भाई, चंदन मोरे, फहीम खान, शाहिद शेख, फैजान शेख, गुड्डू भांजा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. आम्ही तीन दिवस झोप आणि जेवण विसरलोच होतो. आणखी ३-४ दिवस स्पर्धा सुरु राहिली असती तर घरच्यांनीच आम्हाला हाकलून दिले असते. आमच्या सर्वांच्या पत्नी आणि कुटुंबीय यांचे योगदान खूप मोठे आहे त्यांनी आम्हाला मानसिक आधार दिला. आमचे सहकारी जकी अहमद हे तर दोन्ही मुलांचे वाढदिवस देखील विसरले. सर्व खेळाडू आनंदी राहिले आणि आम्हाला मिळालेली कौतुकाची थाप हीच आमच्या कामाची पावती आहे.
पत्रकार प्रीमिअर लीगचे पहिले पर्व यशस्वी करण्यासाठी आयोजक समितीने काय केले हे आणि किती मोठी जोखीम घेऊन सर्व जुळवून आणले हे आम्हालाच माहीती. यंदा आम्ही कुठेतरी कमी पडलो, अनेक चुका राहिल्या हे देखील आमच्या लक्षात आले. कुणाचे मन दुखावले असेल तर क्षमस्व. दुसऱ्या पर्वात आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न असेल. पुढील वर्षी आयोजक समितीचा आणखी विस्तार केला जाणार असून इच्छुकांचे स्वागत आहे. इतके स्पष्ट लिहून देखील टीकाकारांना समजत नसेल तर त्यांना त्यांच्या टीका लखलाभ तर आम्हाला मदत करणाऱ्या सर्व दृश्य, अदृश्य शक्तींचे स्वागत आणि आभार.



Comments
Post a Comment