गुणगौरव सोहळा : समाजाने, समाजासाठी राबवलेला युवकांचा पहिलाच उपक्रम
गुणगौरव सोहळा : समाजाने, समाजासाठी राबवलेला युवकांचा पहिलाच उपक्रम

चेतन वाणी - वैश्यवाणी समाज तसे बघायला गेलो तर उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक. मुंबई, कोकण, गोवा परिसरात तसे समाजाची बरीच घरे आहेत मात्र त्यांचा इकडे संपर्क तोडकाच. खान्देश पट्ट्यात आमच्या समाजातील जुन्या मंडळींनी समाजाच्या एकत्रिकरण आणि प्रगतीसाठी बरेच प्रयत्न केले. वडिलधाऱ्यांची मेहनत म्हणूनच आज काही मंडळी चांगल्या पदावर आहेत.
मी लहान असताना आमच्या समाजात जळगाव जिल्ह्यात मोठा गुणगौरव सोहळा पार पडत होता. समाजाने अनेक वर्ष हा उपक्रम राबवला मात्र कालांतराने दुसरी पिढी समाजकार्यात पुढे सरसावली नाही आणि अनेक उपक्रम बंद झाले. सध्या तर समाज संघटन दूरच राहिले तरुणाई राजकारण, देश आणि धर्माच्या गोष्टी करतात, जेव्हा की अगोदर आपले संघटन मजबूत असेल तर धर्म आणि राष्ट्र मजबूत होईल हे त्यांना कळत नाही, किंबहुना ते त्यांना समजून घ्यायचे नाही.
विषयांतर नको.. समाजातील गुणवंतांचा गुणगौरव व्हायलाच हवा असा एक विचार यंदा पुन्हा पुढे आला. विचार आला खरा पण त्याला पुढे नेणार कोण? भूषण वाणी, राकेश वाणी आणि माझं यावर एकमत झाले आणि सुरु झाली चर्चा. समाजाच्या ग्रुपवरील चर्चेतून गुणगौरव सोहळा समिती तयार झाली. नाशिक, चाळीसगाव, शिरपूर, अमळनेर, चोपडाचे समाजबांधव वेळ देऊ लागले. समाजबांधवांनी ‘आपण समाजाचं देण लागतो’ या उदात्त भावनेने आर्थिक मदत दिली. कोणताही उपक्रम असला तर पैसा लागतोच आणि पैशाचे सोंग करता येत नाही पण सर्व सदस्य खंबीर असल्याने तयारी सुरू झाली.
दिवस ठरला.. सर्व तयारी झाली.. दिवस उजाडला.. सभागृह फुल्ल भरले.. ७५ पेक्षा अधिक गुणवंत पोहचले.. गुणगौरव सोहळे तर सर्वच समाजात होतात मग वैश्यवाणी युवा फाऊंडेशन आयोजित सोहळ्याचे वेगळेपण काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला असणार. गुणगौरव सोहळ्याला एकही राजकारणी, इतर समाजातील मान्यवर उपस्थित नव्हते. व्यासपीठावर समाजातीलच विविध क्षेत्रातील जेष्ठ आणि अनुभवी व्यक्ती हेच प्रमुख पाहुणे. गुणवंत निवड ठरवताना टक्केवारीची अट न ठेवता केवळ पास हाच नियम. गुणवंतांचा सन्मान करण्याचा मान समाजातील सर्व जेष्ठ, मान्यवर पुरुष आणि महिला सदस्यांना देण्यात आला. समितीच्या सदस्यांनी कोणतीही मोठेगिरी न दाखवता स्वतः सर्व कार्य मेहनतीने पार पाडले.
अंदाजे १० वर्षांनी समाजाचा गुणगौरव सोहळा जळगावात पार पडला असावा. विद्यार्थ्यांना आकर्षक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, फोल्डर फाईल देऊन गौरवण्यात आले. विशेष म्हणजे आजकाल सर्वत्र चमकोगिरी करीत नावासाठी धडपड केली जाते मात्र आमच्याकडे कुठेच कोणत्याही सदस्याचे नाव वापरण्यात आले नाही. गुणगौरव समिती म्हणूनच हा सोहळा पार पडला. भर पावसात देखील समाजबांधवांनी गर्दी केली होती. त्यात बाहेरगावाचे सदस्य देखील बरेच होते. आज आम्ही घेतलेल्या उपक्रमाने समाजातील तरुणाईत असलेली मरगळ दूर होऊन नवचैतन्य निर्माण झाले आहे.
https://mahapolicenews.com/vaishyawani-samaj-community-students-felicitation-ceremony/
समाजाला इतर समाजांसोबत मुख्य प्रवाहात आणत चिमुकले, विद्यार्थी, तरुण-तरुणी, उपवर-वधू, सुशिक्षित बेरोजगार, महिला भगिनी, जेष्ठ मंडळीच्या दृष्टीने सकारात्मक दिशा गुणगौरव सोहळ्याने दाखवली. समाजातील काही प्रमुख प्रश्रांवर येत्या काळात मार्ग निघेल, राज्यभरातील समाजबांधव एकत्र येतील, महिलांचे संघटन निर्माण होईल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. जेष्ठांचे आशिर्वाद कायम सोबत असणारच आहे आणि त्यांचा सल्ला दिशा दाखवणारच असतो. गुणगौरव सोहळ्याने दिलेला विश्वास आणखी दृढ करीत पुन्हा समाजासाठी आम्ही तयार राहणारच..!
Comments
Post a Comment