गौसेवा : दारात, घरात नव्हे थेट किचन, बेडरूममध्ये गाय, कुत्रे..

गौसेवा : दारात, घरात नव्हे थेट किचन, बेडरूममध्ये गाय, कुत्रे..

चेतन वाणी - जळगाव शहर, सुशिक्षित कुटुंबीय, भले मोठे मन आणि भले मोठे घर.. प्राणीमात्रांवर दया दाखविताना कर्णासारखे उदार मन ठेवणाऱ्या भुसारी कुटुंबियांनी गौसेवेचा एक उत्तम आदर्श समाजासमोर ठेवला आहे. २० गाय-वासरू, ५० कुत्र्यांना आपल्या अंगणात, घरात आणि थेट किचन, बेडरूममध्ये मुक्त संचार करू देणाऱ्या भुसारी कुटुंबाची एक आगळीवेगळी कहाणी, विचार ऐकल्यास आपल्याला देखील गौसेवेचा मोह आवरल्याशिवाय राहणार नाही. आजच्या कलियुगात देखील असे कुणी असावे हे आश्चर्यच आहे. चला तर मग जाणून घेऊया..

भारतात आणि विशेषतः हिंदू धर्मीयांमध्ये गायीला गोमातेचा दर्जा देण्यात आला आहे. समाजात फार पूर्वीपासून गाईचे महत्व अनमोल राहिले आहे. गाईपासून मिळणारे गोमुत्र, दूध, शेण सर्वच मनुष्य आणि निसर्गासाठी प्रचंड फायदेशीर आहे. कलियुगात गोहत्येचे प्रमाण वाढले आणि अनेक ठिकाणी कत्तलखाने सुरु झाले. भाजप सरकारच्या काळात गोरक्षणार्थ कायदा तयार झाला. कायद्याच्या अनुषंगाने गो हत्या रोखण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी आजही ते शक्य झालेले नाही. काळानुरूप गौसेवेचे महत्व पुन्हा अधोरेखित होऊ लागले असून गोपालन करण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. गौसेवा आणि भूतदया करण्याच्या उद्देशाने सेवाकार्याला लागलेल्या भुसारी कुटुंबाची दिनचर्या आणि सेवाधर्म आपण सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे.

लहानपणापासूनच्या आवडीने कुटुंबियांना देखील लावला लळा..

जळगावातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे ॲड.केदार किशोर भुसारी. लहानपणापासून केदार यांना गोसेवेची आवड होती. समजूतदारपणा आल्यानंतर केदार यांनी रिंगरोड येथील आपल्या फ्लॅटमध्ये दोन गायी पाळल्या होत्या. रिंगरोड सोडल्यानंतर बळीरामपेठेत स्थायिक झाल्यावर आपली गोसेवा सुरु ठेवण्यासाठी त्यांनी घराच्या छतावरच गोठा उभारला. मनात जागा असेल तर घरात जागा मिळतेच.. हेच त्यांचे ब्रीद त्यांनी कायम ठेवले. छत्रपती शिवाजी महाराज नगरातील नवीन घरात स्थलांतरित झाल्यावर केदार यांनी आपले कार्य आणखी वाढविले. केदार यांच्या गोप्रेमामुळे पत्नी अंजली आणि मुलगा कार्तिक यांना देखील त्याचे वेड लागले होते. शिवाजी नगरातील घरात देखील केदार भुसारी यांनी गायी, कुत्रे पाळणे सुरु ठेवले. 

किचन, बेडरुममध्ये मुक्त संचार, महिन्याला लाखभर खर्च

केदार भुसारी यांच्या कुटुंबात गौसेवेचे कार्य मनापासून आणि आवडीने कुणी पार पाडत असेल तर त्यांची पत्नी अंजली. स्वतः सुशिक्षित असल्याने आपल्या आवडी आणि भूतदयेचा धर्म त्यांनी पाळला आहे. अंजली या घरात काम करीत असताना गायींचा मुक्त संचार त्यांच्या घरात असतो. कोणतीही गाय कामात व्यत्यय आणत नाही. घरात खाण्याची सोय गायींसाठी केली जाते. केदार भुसारी दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असल्याने गाय, कुत्र्यांच्या देखभालीची सर्व जबाबदारी अंजली आणि मुलगा कार्तिक पार पाडतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ तीन वेळ गाईंचे खाणे, पिणे करणे. वेळोवेळी लसीकरण आणि  इतर जबाबदारी त्या योग्यरीतीने सांभाळतात. आपण प्राण्यांना प्रेम दिले तर ते देखील आपल्याला लळा लावतात हे आपल्याला भुसारींच्या  घरात पाहायला मिळते. सर्वांचे खाणे, पिणे, लसीकरण आणि इतर किरकोळ बाबींसाठी महिन्याला साधारणतः लाखभर रुपयांचा खर्च होतो.

तीन फुटांची पुंगुरू गाय, ५० कुत्र्यांची भरते शाळा..

भुसारी यांच्या शिवाजी नगरातील घराच्या बाजूला एक मोठे पटांगण केवळ गायी आणि कुत्र्यांसाठी मोकळे ठेवण्यात आले आहे. समाजाने सोडलेले कुत्रे आणि आजारी गायी देखील ते उपचारार्थ घरी घेऊन येतात. नुकतेच दोन कुत्र्यांवर त्यांनी कर्करोगाची शस्त्रक्रिया देखील केली. कर्नाटक आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवर आढळणाऱ्या केवळ ३ फुट उंची असलेल्या ८ पुंगुरू प्रजातीच्या गाई त्यांच्याकडे आहेत. तसेच काठेवाडी, गीर आणि देशी अशा २० गायी. सेंड बर्नार्ड, लॅब्रेडीयन, रॉट विलर व उपचारार्थ आणलेले कुत्रे असे ५० कुत्रे आहेत. भूतदयेच्या कार्यासाठी भुसारी कुटुंबियांना घरात घरकाम करणाऱ्या राधाताई आणि त्यांची मुलगी प्रीती यांची मदत होते. जनावरांच्या उपचारार्थ डॉ.मिलींद पाटील, डॉ.मनीष बाविस्कर, डॉ.प्रवीण पाटील, भाग्येश आणि शुभम यांचे सहकार्य लाभत असते. 

सौरक्षण संस्थेच्या माध्यमातून पुढे नेणार कार्य..

केदार भुसारी हे आपले गोरक्षण आणि भूतदयेचे कार्य भविष्यात देखील आणखी पुढे घेऊन जात देशभरात नवा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. सौरक्षण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुढील सर्व कार्य पार पाडले जाणार आहे. एकीकडे लोक देखावा करण्यासाठी गोपालन, पशु पालन करतात मात्र भुसारी कुटुंबीय मनापासून सेवा करतात. केवळ पालन पोषण करणे नव्हेच तर त्यांची देखभाल आणि सोयसुविधा ठेवण्यात देखील त्यांनी कुठे कमी पडू दिलेली नाही. गौसेवेचे महनीय कार्य भविष्यात देखील आणखी वाढेल आणि घरोघरी एक तरी गाय असेल असा विश्वास केदार भुसारी आणि कुटुंबियांनी व्यक्त केला. 

- चेतन रविंद्र वाणी, जळगाव

मो.9823333119, 7020588288

Comments

Popular posts from this blog

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग

साडेतीनशे वर्षांचा इतिहास असलेले तरसोदचे गणपती मंदिर