‘शिवमहापुराण’ कथेचे महासेवेकरी ‘पोलीस’च..
‘शिवमहापुराण’ कथेचे महासेवेकरी ‘पोलीस’च..
चेतन वाणी - जळगाव जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाची परीक्षा पाहणारा आजवरचा सर्वात मोठा सोहळा नुकतेच पार पडला तो म्हणजे वडनगरी शिवारातील पंडित प्रदीप मिश्रा यांचा शिवमहापुराण कथा सोहळा. कथेच्या निमित्ताने भक्तीचा जागर झाला, लाखो भाविक भक्तिरसात न्हाऊन निघाले, रात्रीची कडाक्याची थंडी, दिवसाचे ऊन सहन करीत भाविकांनी कथेचा लाभ घेतला. भाविकांच्या सेवेसाठी हजारो सेवेकऱ्यांनी सेवा बजावली मात्र खरे सेवेकरी होते ते पोलीस. तहान, भूक विसरून, पुरेशी झोप न घेता दिवसभर रस्त्यावर उभे राहून पोलिसांनी बजावलेल्या चोख कर्तव्यामुळे शिवमहापुराण कथा सोहळा कायदा व सुव्यवस्था राखत पार पडला. एरव्ही सण, उत्सव वेशीवर टांगून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या शिस्त, माणुसकीचे रूप जळगावात पाहायला मिळाले.
प्रख्यात कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी संपूर्ण देशातील भक्तांना ‘एक लोटा जल सारी समस्या का हल’ हा मंत्र देत भगवान भोले बाबाच्या भक्तीचा मार्ग दाखवला. देशभर सध्या पंडित प्रदीप मिश्रा आणि बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्याच नावाचा बोलबाला आहे. जळगाव तालुक्यातील वडनगरी गावाजवळ श्री बडे जटाधारी मंदिराचे विश्वस्त असलेल्या चौधरी कुटुंबियांनी वर्षभरापूर्वीच पंडित मिश्रा यांच्या कथेसाठी वेळ निश्चित केली होती. जळगावात कथा होणार आणि साधारणतः ८ लाखांपेक्षा अधिक भाविक येणार असा अंदाज वर्षभरापासूनच व्यक्त केला जात होता.
जळगावात कथा होण्याच्या काही महिने अगोदर मालेगाव तर काही दिवस अगोदरच धुळे आणि नाशिक येथे कथा झाली. तिन्ही ठिकाणी भाविकांच्या येण्या-जाण्याचे अनेक मार्ग उपलब्ध होते तर भाविकांची व्यवस्था देखील चोख होती. जळगावात देखील भाविकांच्या व्यवस्थेच्या दृष्टीने आयोजकांनी नियोजन केले होते. विविध समित्या देखील गठीत केल्या, पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी देखील कथास्थळी भेट देत सूचना केल्या. सर्व नियोजनरित्या सुरु असले तरी पूर्वी अनुभव नसल्याने नको तो घोळ होतोच आणि हौशेनौशे स्वयंसेवक ऐनवेळी पसार होत असल्याने देखील नियोजन कोलमडते. जळगावात देखील पहिल्या दिवशी तसेच काही झाले मात्र ‘बाबा सब देख लेंगे’ म्हणत सर्व निर्विघ्नपणे पार पडले.
पंडित प्रदीप मिश्रा यांची कथा दि.५ डिसेंबर रोजी सुरु होणार होती. तत्पूर्वी जळगाव जिल्हा प्रशासनाने अनेक बैठका घेतल्या आणि प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित करून दिली. कथेच्या पूर्वसंध्येलाच कथास्थळी लाखभर भाविक येऊन बसले. कथेचा कार्यक्रम खाजगी असला तरी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जवळपास ७०० पोलीस अधिकारी, कर्मचारी व ६०० होमगार्ड यांची नियुक्ती केली होती. जळगाव विभागात कथा असल्याने पोलीस अधिक्षकांसोबत मुख्य जबाबदारी होती ती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांची. सुरुवातीपासूनच्या सर्व नियोजनात दोघांचा सहभाग होता मात्र कथेच्या काही दिवस अगोदरच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची बदली झाली आणि अशोक नखाते यांनी जबाबदारी स्वीकारली. ज्याठिकाणी पोलिसांची गरज नसते मात्र त्याठिकाणी पोलिसांनी पुढाकार न घेतल्यास नंतर पोलिसांनाच धावपळ करावी लागते हा मूलमंत्र ध्यानी ठेवत पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी नियोजन केले.
जळगावात कथेच्या ठिकाणी भाविकांना जाण्यासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने शहरातील प्रमुख चौक ते कथा स्थळापर्यंत टप्प्याटप्प्यावर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात होते. पहिल्या दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत सर्व नियोजनाप्रमाणे सुरु होते मात्र कथा संपली आणि भाविक एकाच वेळी बाहेर पडल्याने पोलिसांचे नियोजन कोलमडले. नियोजन कोलमडले असले तरी पोलिसांनी आपल्या कर्तव्याहून पळ न काढता परिस्थितीला सामोरे गेले. पायी येणारे भाविक आणि वाहनधारक यांच्यामुळे कोंडी होत असल्याने पोलीस अधीक्षक यांनी इतरांची वाट न पाहता रस्त्याच्या कडेला उभे असलेले एक ट्रक्टर रस्त्यावर आडवे लावले आणि एका बाजूची वाहतूक रोखली. गर्दीत एका वाहन चालकाने अधिक्षकांच्या वाहनाला देखील धडक दिली. रस्त्यावर जिकडे तिकडे केवळ पोलीसच आपली जबाबदारी पार पाडत होते तर इतर विभाग मात्र कुठेच दिसेनासे होते. प्रशासनातील इतर विभागांचे अधिकारी तर सोडाच कर्मचारी देखील जागेवर नव्हते. भाविकांच्या गर्दीत गरजूंना मदत करण्यापासून ते वृद्धांना रुग्णालयात पोहाचाविण्यापर्यंत पोलिसांनीच सेवा बजावली. सकाळी ७ वाजत रस्त्यावर उतरलेले पोलीस रात्री १ वाजता सर्व रस्ते मोकळे केल्यावर घरी गेले. दिवसभरात पोलिसांना कुणीही जेवण आणि पाण्यासाठी विचारले नाही हि फार मोठी शोकांतिका आहे. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या पोलिसांनी देखील आपले कर्तव्य चोख बजावले आणि हे कौतुकास्पद आहे.
पहिल्या दिवशी भुकेने व्याकूळ पोलिसांनी शेव, मुरमुरे, वेफर्स, कुरकुरे खाऊन आणि पाणी पीत एखाद्या कान्याकोपऱ्यात आपल्या पोटाला आधार देताना मी स्वतः पाहिले. पहिल्या दिवशी रात्री ११.१५ वाजता पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची संपूर्ण अधिकाऱ्यांसह के.सी.पार्क जवळील पेट्रोल पंपावर भेट झाली असता त्यांनी आम्हाला जेवण झाले का म्हणून विचारणा केली. आम्ही होकार दिला आणि तोच प्रतिप्रश्न त्यांना केला असता ‘हमारे लोक खाली पेट खडे है भाई, मै कैसे खा सकता हू’ असे उत्तर त्यांनी दिले. कर्मचाऱ्यांची जाण ठेवणारे पोलीस अधिकारी जळगावकरांना मिळाले हे आपले नशीब.
पहिल्या दिवशी लाखो भाविकांना ९ किलोमीटर पायपीट करावी लागली, अनेकांना गर्दीने भोवळ आली, रिक्षा चालक, वाहन मालकांना गर्दीत ५ तास अडकून राहावे लागले आणि सर्वांनी गैरसोयीचे खापर पोलिसांवरच फोडले. मुळात पोलिसांनी आपली जबाबदारी चोख बजावली हे कुणी पहिलेच नाही, फक्त नेहमीप्रमाणे पोलिसांना टीकेचा धनी केले. गर्दीचे नियोजन करण्याची जबाबदारी होती आयोजकांची. स्वयंसेवकांच्या मदतीने वेळीच रस्ता मोकळा केला असता तर लवकर मार्ग मोकळा झाला असता. पोलीस होते म्हणून तरी सर्व भाविक सुखरूप आणि रात्री १२ च्या आत घरी पोहचले नाहीतर काही अनुचित प्रकार घडला असता किंवा मोठा गोंधळ उडाला असता हे नक्की.
मालेगाव, धुळे, नाशिक येथील कथेत गर्दीचा फायदा घेत सक्रीय होणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचारी साध्या वेशात गर्दीत गस्तीवर होते. भाविकांना दागिने, पैसे, मौल्यवान ऐवज आणू नका अशा सूचना केलेल्या असतांना देखील भाविकांनी दुर्लक्ष केले आणि पहिल्याच दिवशी डझनभर भाविकांना त्याचा भुर्दंड सहन करावा लागला. पोलीस होते म्हणूनच पहिल्या दिवशी एक-दोन नव्हे तर तब्बल २७ महिला चोरट्यांची आणि दोन दिवसांनी १३ पुरुष चोरट्यांची आंतरराष्ट्रीय टोळीच्या मुसक्या आवळण्यात जळगाव पोलीस दलाला यश आले. जळगावात चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने दुसऱ्या दिवसापासून होणाऱ्या चोऱ्या टाळण्यात जळगाव पोलिसांना यश आले. आजवर देशभरात कुठे नव्हे तर जळगावात जिल्हा पोलिसांच्या नियोजनामुळेच हे शक्य झाले. कदाचित यामुळे पुढे होणाऱ्या कथेच्या ठिकाणी पोलीस आणि आयोजक अधिक सतर्क राहतील.
पहिल्या दिवशी पोलिसांच्या नियोजनाचा फज्जा उडाल्याने दुसऱ्या दिवसापासून पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी नियोजन बदलले आणि ते शेवटच्या दिवसापर्यंत यशस्वी ठरले. कथेला भेट देणाऱ्या लोकप्रतिनिधी, मान्यवरांच्या सोयीपासून भाविकांची गैरसोय होऊ नये याचे सर्व नियोजन पोलिसांनी केले. दि.६ ते १० पोलिसांचे सर्व नियोजन योग्य ठरले. टॉवर चौकात, १०० फुटी रस्त्यावर, शिवाजीनगर भागात एकेरी मार्ग सुरु असल्याने अनेक नागरिकांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस सर्वांना हात जोडून विनंती करीत दुसऱ्या मार्गाने जाण्यास सांगत होते. कथास्थळी जाणाऱ्या बस, रिक्षा, खाजगी वाहने यांचे मार्ग आणि वेळ निश्चित केलेली असल्याने पोलिसांचे नियोजन परफेक्ट ठरले. शेवटच्या दिवशी भाविक गर्दीचा रेकॉर्ड मोडणार अशी शक्यता असल्याने पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी कुणीही जागा सोडू नये अशा सूचना पोलिसांना दिल्या होत्या. कर्मचाऱ्यांची खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये म्हणून सर्वांना जागेवर खिचडी, पाववडा आणि पाण्याची व्यवस्था करून देण्यात आली. पोटाला आधार मिळाल्याने दिवसभर उभे राहणाऱ्या इच्छेला देखील आधार मिळाला. कथा दरम्यान पोलीस हा पोलीस म्हणूनच सेवा देत होता. सेवा बजावताना ना जात आडवी आली ना धर्म. कुणीही भेदभाव केला नाही किंवा कर्तव्यात कसूर केली नाही. प्रत्येक पोलीस आणि होमगार्ड यांनी केवळ आपले कर्तव्य बजावले.
खाजगी कार्यक्रमासाठी किंवा वैयक्तिकरित्या पोलीस बंदोबस्त हवा असल्यास साधारणतः प्रति कर्मचारी १५०० रुपये खर्च येतो. कथेच्या बंदोबस्तासाठी सर्व पोलिसांनी विनामूल्य सेवा बजावली. विशेष म्हणजे ७ दिवस कथेसाठी बंदोबस्त बजावणाऱ्या पोलिसांना आपले नियमीत कामकाज, तपास देखील पूर्ण करणे आवश्यक होते. वेळात वेळ काढत सर्वांनी ती जबाबदारी देखील सांभाळली. पहिल्या दिवशी कथेच्या ठिकाणी जातांना रात्री १०.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर एका दुचाकीस्वाराला चारचाकीने जोरदार धडक दिली. दुचाकीस्वाराच्या पायाचे हाड मोडले आणि रक्तबंबाळ अवस्थेत तो वेदनेने विव्हळत रस्त्याच्या कडेला पडलेला होता. मी आणि सहकारी जकी याच्यासह आणखी दोघांनी त्याला उचलून एका रिक्षात टाकले तेव्हा मदतीला स्वयंसेवक नव्हे तर पोलिसच धावले. नव्याने भरती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जखमीची दुचाकी चालविण्याच्या स्थितीत नसताना देखील एकमेकांच्या मदतीने शहर पोलीस ठाण्यात आणली आणि डिक्कीतील सर्व साहित्य देखील सुस्थितीत ठेवले. पोलीस वेळीच पोहचले नसते तर त्या बाबांच्या वाहनाचा आणि साहित्याचा देखील पत्ता लागला नसता.
शिवमहापुराण कथेच्या निमित्ताने जळगावकरांनी भक्तीचा जो महामेळा अनुभवला कदाचित भविष्यात पुन्हा कधी ती वेळ येईल. जळगावात आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे, शरद पवार असे दिग्गज राजकारणी आणि किरीट भाईजी, इंद्रदेवजी महाराज यांच्यासह देशातील प्रख्यात निरुपणकारांचे कार्यक्रम झाले मात्र इतकी गर्दी कुठेही पाहायला मिळाली नाही. पोलीस हा समाजाचा असा घटक आहे जो कुटुंब विसरून ‘सद्ररक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रीद सार्थ ठरविण्यासाठी झटत असतो. जळगावातील शिवमहापुराण कथा निर्विघ्नपणे पार पडल्यावर सर्व पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. कौतुकास्पद बाब म्हणजे अवघ्या १० दिवसापूर्वी पदभार स्वीकारून देखील अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी स्वतः हातात माईक घेत वाहतूक नियमन केले आणि भाविकांना योग्य ते मार्गदर्शन केले हे विशेष आहे. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार हे दुपारपासून रात्रीपर्यंत अनेकदा कथास्थळी आणि मार्गावर भेट देत होते आणि बऱ्याचदा थांबून देखील होते. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, कृष्णांत पिंगळे, पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, महेश शर्मा, डॉ.विशाल जैस्वाल, अनिल भवारी, रंगनाथ धारबळे, सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, सर्व पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व होमगार्डने आपले कर्तव्य चोख बजावल्यानेच सर्व कायदा व सुव्यवस्था राखत पार पडले. कथेच्या निमित्ताने पोलिसांवर टीका अनेकांनी केली असेल पण पोलीस देखील मनुष्य आहे आणि त्यांच्या देखील भावना जाणून जळगावकर म्हणून पोलिसांना एकदा सन्मानाने सल्युट मारायला लाजू नका. स्वयंसेवक, सेवेकरी म्हणून आपण लाख मिरवून घेतले असेल पण खरा सेवेकरी पोलीसच होता हे विसरू नका. जय हिंद.
- चेतन रविंद्र वाणी, जळगाव
मो.९८२३३३३११९, ७०२०५८८२८८











Comments
Post a Comment