ट्रॉफीच नव्हे, मने जिंकणारे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार!
ट्रॉफीच नव्हे, मने जिंकणारे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार!
चेतन वाणी : जळगाव जिल्ह्यात नुकतेच नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. एरव्ही शिस्त आणि कायद्याच्या दृष्टीने कणखर असणारे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांचे दुसरेच रूप गेल्या ७ दिवसात ५ जिल्ह्यातील पोलीस खेळाडूंनी पाहिले. जेव्हा पोलीस अधीक्षक स्वतः खेळाडू म्हणून सहभागी होतात तेव्हाच खेळाडूंना देखील उत्साह संचारतो आणि ते विजयश्री खेचून आणतात. जळगाव जिल्ह्यात विभागीय क्रीडा स्पर्धा होणार असल्याने 'न भूतो न भविष्यती' नियोजनाचा विडा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी उचलला. गेल्या २ महिन्यांपासून खेळाडूंशी होत असलेली चर्चा, मायक्रो नियोजनाने सर्व शक्य झाले आणि महिला व पुरुष दोन्ही गटात सर्व साधारण विजेतेपद जळगाव जिल्ह्याने मिळवले. शेवटच्या दिवशी समारोपीय कार्यक्रमात सर्वांना मनसोक्त मजा लुटता आली आणि जेवणाचा तृप्तीचा ढेकर देत सर्व आपल्या घरी मार्गस्थ झाले.
जळगाव एखादा पोलीस अधिकारी कधी पोलिसांसाठी चांगला असतो तर कधी फारच शिस्तीचा किंवा त्रासदायक ठरतो. जळगाव जिल्हा तसा गेल्या काही वर्षापासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत फार चांगला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना सांभाळून घेणारे, समजणारे आणि पोलिसांचे हित पाहणारे पोलीस अधीक्षक जिल्ह्याला लाभले आहे. गेल्या वेळीचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी तर सर्वांना चांगलेच सांभाळले आणि पोलिसांच्या आनंदाचा तरंग उत्सव देखील उत्कृष्टपणे पार पाडला. बदली असो की विभागांतर्गत कारवाई डॉ.प्रवीण मुंढे यांनी सर्वांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला. डॉ.मुंढे यांची बदली झाली आणि पोलीस अधीक्षक म्हणून एम.राजकुमार यांनी पदभार स्विकारला.
पोलीस अधीक्षक एम.राजकुमार हे शिस्तप्रिय आणि कुटुंबवत्सल म्हणून ओळखले जातात. जळगावात येऊन वर्ष पूर्ण होत असल्याने त्यांच्या कार्याची प्रचिती बहुदा सर्वांना आलेली आहे. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या कार्यकाळात पोलिसांसाठी होणारा सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा. जळगाव जिल्ह्यात नुकतेच स्पर्धा संपन्न झाल्या. जळगाव जिल्ह्यात २०१७ नंतर यंदा नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडणार असल्याने पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी स्वतः पुढाकार घेतला. जळगावात होत असलेल्या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यालाच विजेतेपद मिळावे यासाठी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी तीन महिने अगोदरपासुनच नियोजन सुरू केले. सर्व क्रीडा प्रकारातील पोलीस खेळाडूंना एकत्र करीत त्यांनी पोलीस मुख्यालयाशी जोडले. सर्वांशी चर्चा करून प्रमुखांची बैठक घेतली आणि विजयाचा मंत्र देत विजयश्री खेचून आणण्याचा निर्धार करून घेतला.
जळगावचे पोलीस खेळाडू तसे हुनहुनरी मात्र त्यांच्यात सामील होत प्रोत्साहन देण्याचे कार्य पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी केले. एरव्ही पोलीस खेळाडू आणि अधीक्षक किंवा अधिकारी यांची जर्सी वेगळी असे मात्र यंदा असा भेदभाव दिसून आला नाही. सुरुवातीपासूनच खेळाडूंच्या हिताचा विचार करणाऱ्या अधिक्षकांनी हव्या त्या वस्तू, क्रीडा साहित्य तत्काळ उपलब्ध करून दिले. सर्व साहित्य मिळत असल्याने खेळाडू देखील जोमाने तयारीला लागले होते. सर्व क्रीडा प्रकारातील खेळाडूंचा पोशाख, राहण्याखाण्याची व्यवस्था, वेळोवेळी चर्चा, बैठक यामुळे नियोजन सफल ठरले.
पोलीस अधीक्षक एम.राजकुमार हे स्वतः पुढाकार घेत तर होतेच शिवाय त्यांनी पोलीस कल्याण विभाग, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपविभागीय अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक, राखीव पोलीस निरीक्षक यांच्यासह सर्व विभागांना जबाबदारी वाटून दिलेली असल्याने इतर जिल्ह्यातून आलेल्या एकही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली नाही. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार हे स्वतः दररोज सकाळी रनिंग, सायकलिंग करीत असल्याने आणि स्वतः खेळाडू असल्याने त्यांनी फुटबॉल स्पर्धेत सहभाग देखील नोंदविला. केवळ सहभागीच झाले नाही तर एम.राजकुमार यांनी सलग दोन दिवस केलेल्या सुपर गोलमुळे जळगाव संघाला जेतेपद देखील मिळाले.
विजेतेपद जळगाव जिल्ह्याला मिळेल याची खात्री पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांना होतीच मात्र सर्व खेळाडूंचा आत्मविश्वास उंचाविण्यासाठी त्यांनी सातपुडा ऑटोमोबाईल्सच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडू पुरुष आणि महिला अशा दोघांसाठी दोन दुचाकी पारितोषिक म्हणून ठेवल्या. शेवटच्या दिवशी पारितोषिक वितरणानंतर मनोरंजन संगीत संध्या ठेवण्यात आली होती. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून पोलीस अधीक्षक कुटुंबासह स्पर्धांना हजेरी लावत होते. बऱ्याच ठिकाणी तर ते चिमुकलीला देखील घेऊन जात होते. पहिल्या दिवसापासून असलेली कुटुंबाची हजेरी शेवटच्या दिवशी देखील कायम होती. खेळाडू पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि सहकाऱ्यांसोबत पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी कुटुंबासह सहभाग नोंदवीत गाण्याच्या तालावर ठेका धरला.
स्पर्धेसाठी आलेल्या पाहुण्या खेळाडूंच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून सर्वांना आवडेल त्या जेवणाची फर्माईश पूर्ण करण्यात आली. कोणत्याही क्रीडा प्रकारात जळगाव संघाचा पराभव झाला तरी पोलीस अधीक्षक आपल्या खेळाडूंना समजावून सांगत होते तर विजेत्या संघाचे अभिनंदन करून प्रोत्साहन देखील देत होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी केलेल्या आभारपर भाषणाने सर्वांना हसविले आणि काहीसे भावूक देखील केले. पोलीस अधीक्षक विजयी चषक हातात घेत माझ्या मुलांनी ‘हा कप आम्हीच ठेवू’ असा शब्द दिला होता आणि तो पूर्ण करून दाखविला आहे. 'आज मी इथे आहे पुढे नसणार मात्र हा कप इथेच राहील', असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तब्बल २० वर्षानंतर जळगाव जिल्हा पोलीसदलाला नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे जेतेपद मिळाले ही जिल्हा पोलीस दलासाठी खरोखरच अभिमानाची बाब आहे.
पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून शेवटची नेमणूक आहे. पोलीस अधिक्षकांची पदोन्नती अपर पोलीस महानिरीक्षक म्हणून कधीच झाली असून जळगावातून बदली झाल्यानंतर पुढे कायम ते वरिष्ठ पदांवरच राहणार आहेत. जळगावातील आपली कारकीर्द कायम संस्मरणीय रहावी यासाठी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी घेतलेल्या मेहनतीला सलाम. भविष्यात देखील ते खेळाडूवृत्तीचे प्रदर्शन करतील आणि खाकीची प्रतिमा आणखी उंचावतील यात शंकाच नाही. नुकतेच सांगायचं झालं तर गत आठवड्यात पार पडलेल्या खान्देश रन स्पर्धेत पोलीस अधीक्षकांनी सहपरिवार सहभाग नोंदविला आणि मोठी दौड लगावली. शिस्त, व्यायाम, चिकाटीची सांगड घातली तरच 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद साध्य होईल हाच संदेश क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी दिला.
- चेतन रविंद्र वाणी, जळगाव
मो.9823333119, 7020588288

Comments
Post a Comment