गणेशोत्सव विसर्जन/ईद मिलाद : अनेक महिन्यांचे फलीत, शेवटचा तासभर मैत्रीचा सल्ला ठरला मोलाचा!

गणेशोत्सव विसर्जन/ईद मिलाद : अनेक महिन्यांचे फलीत, शेवटचा तासभर मैत्रीचा सल्ला ठरला मोलाचा

चेतन वाणी : गणरायाचे आगमन म्हणजे सर्वत्र चैतन्य आणि सणासुदीची मांदियाळी आणणारा उत्सव. सामाजिक एकोपा जपणारा हा सोहळा गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत आनंददायी असतो.  गणेशोत्सवाच्या काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची जबाबदारी पोलीस दलाची असल्याने ते जास्त सतर्क असतात. जळगाव जिल्ह्यात यंदा सर्वत्र गणेशोत्सव शांततेत पार पडले आणि ईद मिलाद देखील उत्साहात साजरे झाले. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यात पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांचे मायक्रो मॅनेजमेंट यशस्वी ठरले. मुख्य म्हणजे संपूर्ण पोलीस दलात सिंहाचा वाटा राहिला तो जळगाव 'एलसीबी'चा.

जळगाव जिल्ह्यात कोणत्याही गावात किंवा शहरात कोणतेही गालबोट न लागता गणेशोत्सव आणि ईद मिलाद शांततेत पार पडल्याचे हे कदाचित पहिलेच वर्ष असावे. मुख्यत्वे ग्रामीण भागात नियमात आणि पोलिसांच्या सूचनेप्रमाणे सर्व विसर्जन आणि जुलूस मिरवण्यात आले. जळगाव जिल्ह्यात रावेर, चोपडा, चिनावल, अडावद, धानोरा, नशिराबाद, भुसावळ, वरणगाव, एरंडोल, पाळधी, अमळनेर, पाचोरा हे संवेदनशील वर्गात येणारी गावे म्हणून मोडली जातात. सणोत्सवाच्या काळात काही समाजकंटकांमुळे याठिकाणी वाद उद्भवतो किंवा काही मतभेद झाल्याने वाद होतात. बऱ्याचदा दगडफेक किंवा किरकोळ दंगलीचे प्रकार देखील घडले आहे.

गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्याची जबाबदारी पोलिसांवरच जास्त असते. गणेशोत्सवपासून सणासुदीच्या काळाला सुरुवात होत असल्याने आगामी महिन्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी अगोदरचे काही महिने त्याचे नियोजन करावे लागते. जळगाव जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी आपल्या स्टाईलने कामाला सुरुवात केली. फटके कमी आणि कागद जास्त चालवून त्यांनी आपली छबी उमटवली. अवघ्या १० महिन्यात ४ मोठ्या गँगवर मोक्का आणि ३० पेक्षा अधिक गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. गुन्हेगारांची यादी तयार करणे, एमपीडीए प्रस्तावातील त्रुटी दूर करणे, पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाने प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविणे आणि तो मंजूर करून घेण्याचे दिव्य टीम एलसीबीने पार पाडले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील गुन्हेगारीचा बीमोड करण्याचा विडाच उचलला असल्याप्रमाणे आपले कर्तव्य चोख बजावत तत्काळ प्रस्तावांना मान्यता दिली.

मोक्का आणि एमपीडीए कारवायांमुळे अनेक गुन्हेगारांनी धास्ती घेतली असून 'मेरा नंबर कब भी आयेगा' म्हणत गुन्हेगार लपत आहे. इतकंच नव्हे तर जळगाव पोलिसांनी हद्दपारच देखील सपाटा लावला असून प्रांताधिकाऱ्यांचे देखील कारवाईला पाठबळ लाभत आहे. यंदाचा गणेशोत्सव, गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद मिलाद पोलीस व जनतेसाठी काही खास होती. गणेशोत्सव साजरा करताना अनेक मंडळांना परवानगी मिळण्यात अडचणी आल्या, मनपा, महावितरण आणि धर्मदाय आयुक्त कार्यालयाची परवानगी सहजासहजी मिळाली नाही तरीही पोलिसांनी कोणत्याही मंडळाला रोखले नाही. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे दौरे असल्याने पोलिसांना फारसा वेळ मिळाला नाही तरीही पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले. गणेश चतुर्थीच्या काही दिवस अगोदर शांतता कमिटी आणि मंडळांची बैठक घेत सूचनांचे स्वागत पोलिसांनी केले. त्याचेच फळ म्हणून विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळांची संख्या वाढली. अनेक ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले.

www.chetanwani.blogspot.com

गणेशोत्सवाचे ९ दिवस शांततेत पार पडले आणि पोलिसांसह भाविकांनी देखील आनंद घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने रात्री १२ वाजता वाद्य बंद करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. सातव्या दिवशी चोपड्यात उल्लंघन झाले आणि पोलिसांनी ३० मंडळांवर गुन्हे दाखल केले. चोपड्याचा परिणाम इतरत्र झाला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी जळगावात पहिल्यांदाच रात्री १२ वाजता वाद्य बंद झाले आणि १ वाजता रस्ता मोकळा झाला. गेल्या वर्षी बऱ्याच मंडळांना रात्री १२ वाजले तरी जागेवरून हलने शक्य झाले नव्हते मात्र यंदा जवळपास सर्व मंडळांना आपले प्रदर्शन आणि उत्कृष्ट नृत्य, लेझीम सादरीकरण करता आले. सार्वजनिक गणेश महामंडळाचे नियोजन, गणरक्षकांची भूमिका, पोलिसांनी उभारलेली अलार्म व्यवस्था, माजी पोलीस आणि वनरक्षकांची मदत कामी आली.

पोलीस आपले कर्तव्य पार पाडत होते पण त्यांना मानसिक आधार दिला तो मुस्लीम समुदायाने. गणेश विसर्जन असल्याने ईद मिलाद एक दिवस पुढे ढकलण्यात आली. इतकंच नव्हे तर गणेश विसर्जन मिरवणूकमुळे पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठल्याने त्रास होऊ नये म्हणून ईद मिलाद  मिरवणुकीची (जुलूस) वेळ सकाळी ८ ऐवजी १० वाजता ठेवण्यात आली. मुख्य म्हणजे विविध परिसरातील मिरवणुका एकत्र करण्यात आल्या. मुस्लीम समुदायाने दाखविलेल्या मोठेपणाचे अनेकांनी कौतुक केले.

जळगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर दुपारपासून रात्रीपर्यंत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिवसभर कर्तव्य बजावत उभे होते त्यात उन्हाचा तडाखा जोरदार होता. काही कर्मचारी तर अगोदरच्या दिवशी देखील रात्री नियोजन करीत होते. विसर्जन मिरवणुकीत वाहन लावण्यावरून वाद झाल्याने पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, परिरक्षावधिन उपअधीक्षक आप्पासो पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासह सर्व प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. एलसीबीच्या पथकाला तर जिल्हाभरातील संवेनशील भागात विसर्जन मिरवणुकीत जाऊन आपले कर्तव्य बजावावे लागले.

www.chetanwani.blogspot.com

जळगावात दिवसभर गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेकदा पायी फिरून पाहणी करीत असताना पोलिसांनी कुणालाही रोखले नाही किंवा कोणत्याही कार्यकर्त्याला अरेरावी केली नाही. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार आणि अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी दोघे दिवसभर शहर पोलीस ठाणेजवळ ठाण मांडून होते. रात्री १२ वाजताच पोलीस अधीक्षक नेहरू चौकाच्या दिशेने तर अपर पोलीस अधीक्षक भिलपुरा चौकाच्या दिशेने रवाना झाले. पोलिसांच्या विनंतीला मान देत सर्व मंडळांनी वाद्य बंद केली आणि अवघ्या तासाभरात सर्व रस्ता देखील मोकळा झाला. १-२ मंडळांनी अर्धा तास वाद्य वाजविण्याची परवानगी मिळावी म्हणून सर्वपक्षीय नेत्यांना साकडे घातले मात्र त्यांचे प्रयत्न विफल ठरले. नेहरू चौकाजवळ एका मंडळाच्या ट्रॅक्टर चालकाला फिट्स आल्याने तो खाली कोसळला. पोलीस अधीक्षकांनी स्वतः धाव घेत गर्दी बाजूला केली आणि रुग्णाची पाहणी केली.

मध्यरात्री १२ वाजेनंतर देखील काही मंडळांचे कार्यकर्ते भिलपुरा मशिदीजवळ जोरदार घोषणाबाजी करीत कमी आवाजात वाद्य वाजवीत होते. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी तरुण कार्यकर्त्यांना शांततेत सूचना केल्या. मंडळाच्या युवा अध्यक्षाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला बाजूला घेऊन जात प्रेमाने विनंती केली. 'आम्ही कालपासून रस्त्यावर आहोत. उद्या पुन्हा सकाळी बंदोबस्त आहे. पोलिसांनी देखील आराम करायला संधी द्या आणि बाप्पाला शांततेत निरोप द्या'. पोलीस अधीक्षकांनी खांद्यावर हात ठेवून केलेल्या विनंतीमुळे कार्यकर्त्यांना देखील आपलेपणा वाटला आणि विनंतीचा मान राखत ते पुढे सरकले. सर्व मंडळ पुढे मार्गस्थ झाल्यावर पोलीस अधीक्षक शहर पोलीस ठाण्यात आले. दिवसभर मेहनत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची गळाभेट घेत हस्तांदोलन करून अभिनंदन केले. रात्री १.१५ वाजता क्युआरटी पथकाला त्यांनी मेहरूण तलावावर येण्याच्या सूचना केल्या मात्र सर्वांचे चेहरे उतरलेले पाहून अधीक्षकांनी त्यांना घरी जाण्याच्या सूचना केल्या.

१.३० वाजता शहरात फेरफटका मारत पोलीस अधीक्षक एम.राजकुमार मेहरूण तलावावर रवाना झाले. विसर्जनाचा आढावा घेत पोलीस अधीक्षकांनी अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी व इतर प्रभारी अधिकाऱ्यांना घरी जाण्याच्या सूचना केल्या व ते स्वतः तलावावर थांबले. एकीकडे एरंडोल शहरात रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना पोलीस अधीक्षक मेहरूण तलावावर थांबून होते. सर्व मोठे गणपती मेहरूण तलाव परिसरात पोहचल्यावर पोलीस अधीक्षक पहाटे घरी निघाले. यंदा पहिल्यांदाच सर्व विसर्जन लवकर आटोपले. पोलीस अधीक्षकांनी स्वतः सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. दुसऱ्या दिवशी ईद मिलाद मिरवणुकीसाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सकाळीच हजर झाले. पहाटे ४ ते ७ दरम्यान घरी पोहचून देखील पोलीस सकाळी ७ ते १० च्या आत कर्तव्यावर हजर झाले. तब्बल तीन दिवसांची झोप मोड, भूक मोड करून पोलिसांनी जळगाव जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली ही शहराच्या दृष्टीने कौतुकास्पद बाब आहे. गणेश मंडळांनी शांतता राखत सहकार्य केल्यानेच हे सर्व शक्य झाले. 

www.chetanwani.blogspot.com

जळगाव शहरात विसर्जन मिरवणुकीत सहभागी प्रत्येक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना आपले लेझीम सादरीकरण करण्यासाठी पुरेशी संधी मिळावी म्हणून काही नवीन उपाय शोधणे आवश्यक आहे. विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आणखी मोठा करणे, विसर्जन मिरवणूक मार्गावर असलेले स्वागत व्यासपीठ जवळ-जवळ उभारणे, ठराविक व्यासपीठ उभारण्यास परवानगी देणे, सादरीकरणाची वेळ निश्चित करणे असे काही बदल केल्यास निश्चितच त्याचा सकारात्मक परिणाम येणाऱ्या काळात दिसून येईल. बाप्पाची कृपा दरवर्षी प्रमाणे यंदा देखील जळगावकरांवर राहिली आणि येणाऱ्या काळात देखील असू द्यावी, हीच श्रीचरणी प्रार्थना.

Comments

Popular posts from this blog

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग