Viral Video : पोलिसांना खाजगी आयुष्य नाही का?


समाजात वावरताना अनेक शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी आपल्या नजरेस पडतात. अनेकदा आपला त्यांच्याशी संपर्क देखील येतो पण त्यात एक वर्ग नेहमीच ग्लॅमरस दुनियेत वर्गला जातो तो म्हणजे 'पोलीस'.... पोलीस हा समाजाचा असा भाग आहे की तो 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद वाक्य घेऊन आपल्या रक्षणार्थ ऊन, पाऊस, थंडी, धूळ, वारा सहन करीत उभा असतो. पोलिसाला ना कुठला सण असतो ना कुटुंब, ना उत्सव, ना धर्म. इतकं सर्व करून देखील पोलिसांच्या वाट्याला येते काय तर बदनामी. 

जळगाव जिल्ह्यात सध्या पोलिसांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पाळधी येथील एका ढाब्यावर काही पोलीस कर्मचारी मित्रांसोबत नाचताना व्हिडीओत दिसत आहे. मी घेतलेल्या माहितीनुसार तो व्हिडिओ साधारणतः ११ महिन्यापूर्वीचा असून पोलिसांच्या एका बॅचला २५ वर्ष पूर्ण झाल्याने तो स्नेह मेळावा (गेट टुगेदर) होते.

मित्रांचा गोतावळा शहराबाहेर जमला आणि आनंदाला पारावार उरला नाही. सर्वांनी टिमकीच्या तालावर येथेच्छ आनंद लुटला. पोलिसांनीच मोबाईलमध्ये शूटिंग केले आणि एकाने फितूरकी केली. गेल्या वर्षी देखील रेल्वे स्टेशनजवळ एका हॉटेलमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या निरोप समारंभाला असाच गोंधळ झाला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांवर कारवाई आणि नंतर पुन्हा वापसी असे घडले.

www.chetanwani.blogspot.com

प्रत्येक पोलिसाला वाटते की आपण कुटुंबाला वेळ द्यावा, स्वतःसाठी जगावे पण प्रत्येकाला कर्तव्यापुढे ते शक्य होत नाही. कुटुंबासोबत फिरायला केलेला बेत ऐनवेळी रद्द होईल का? अशी भीती मनात अधिकाऱ्यांच्या देखील असते. कुटुंबाच्या भेटीला, वैद्यकीय तपासणीकामी निघालेला अधिकारी रस्त्यातून घरी परतलेले मी पाहिले आहे. लग्नाचा वाढदिवस सोडून, ठरलेले बेत रद्द करीत गुन्हे शोध कामात गुंतलेले कर्मचारी आजही पोलीस दलात आहेत. पोलीस स्वतःसाठी कमी आणि कर्तव्य व समाजासाठी जास्त जगतात. अनेकांनी तर आपले जीव देखील गमावले आहे. महिनाभरापूर्वीच दोघांनी अपघातात आपला जीव गमावला. एकही संघटना दोघांना श्रद्धांजली अर्पण करायला पुढे सरसावली नाही. 

राजकीय पोळी शेकु पाहणाऱ्यांना पोलिसांच्या वेदना कळत नाही का? प्रत्येक पोलिसाला एक वैयक्तिक आयुष्य असून कर्तव्याला बाधा न पोहचता तो आपले आयुष्य जगत असेल तर कुणाला काय हरकत असावी. सध्या पोलीस प्रशासनातील नवख्या आणि कलेक्शन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वांना सांभाळून घेण्याची कलाच अवगत नाही. आजकालच्या पोरांच्या हाती कलेक्शनची जबाबदारी आल्याने ते इतक्या लवकर हवेत जातात की त्यांना सहज खाली बघणे देखील शक्य होत नाही. त्यातच सर्वांशी खोटे बोलण्याची कला त्यांना जमते आणि तिथेच माणसे दुखावतात. 

गेल्या काही वर्षातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळे, पोलिसांची खात्यांतर्गत चौकशी, अचानक झालेली बदली, निलंबन यामागे बहुतांशी पोलीस सहकर्मीच जबाबदार आहे. हवेत आलेल्यांचा काटा काढण्यासाठी षडयंत्र रचून ते काम फत्ते केले गेले. आपला कुणी काटा काढला म्हणून तो देखील त्याचा बदला घेतो. मुळात पोलिसांनीच आपसी राजकारण दूर सारत एकजूट दाखवली तर पोलीस हाच हुकुमी एक्का होईल. तूर्तास तरी व्हिडिओकडे दुर्लक्ष करीत पोलिसांना समजून घेण्याची वेळ आहे इतकंच..!

Comments

Popular posts from this blog

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग