इनसायडर स्टोरी : डॉ.अश्विन सोनवणे यांचे उपोषण फसले का?

इनसायडर स्टोरी : डॉ.अश्विन सोनवणे यांचे उपोषण फसले का?


जळगाव शहराची अवस्था सर्वांनाच ठावूक आहे. गल्लोगल्ली रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून शहर खड्ड्यांनी भरले आहे. कचरा आणि अस्वच्छ गटारींनी परिसर व्यापले असतांना स्वच्छतेच्या नावाने लाखोंची बिले वर्ग केली जात आहे. ठराविक परिसरात विकासकामे होत असून इतरांना मात्र वाटाण्याच्या अक्षता दिल्या जात आहे. जळगाव शहरातील विकासकामांविषयी माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला. भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाचे नेते संकटमोचक ना.गिरीश महाजन यांच्या कानावर देखील सोनवणे यांनी तो विषय घातला होता. डॉ.सोनवणे आपला हेतू घेऊन पुढे सरकत असतानाच काही लोकांनी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत आपला हेतू साधला. शहरातील विकासकामांच्या मुद्द्यात आयुक्तांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा मुद्दा मुख्य करण्यात आला. अवघ्या काही महिन्यांपूर्वी नगरसेवकांच्या नाकावर टिच्चून पुन्हा पदावर बसलेल्या डॉ.विद्या गायकवाड विरुद्ध डॉ.अश्विन सोनवणे असे चित्र रंगवण्यात आले.

www.chetanwani.blogspot.com

उपोषण सुरु झाले आणि विकासकामांच्या मुद्द्यावर डॉ.सोनवणे यांना तब्बल ५० पेक्षा अधिक नगरसेवकांचा पाठींबा मिळाला. उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी संकटमोचक ना.गिरीश महाजन यांचा डॉ.सोनवणे यांना  फोन आला. उपोषणाची माहिती घेत त्यांनी ते पुढे सुरु राहू देण्याचे देखील सांगितले. जळगाव शहर मनपात एकहाती सत्ता मिळवलेल्या भाजपमध्ये मोठी फुट पडली असल्याचे नगरसेवक फुटाफुटीच्या वेळीच सर्वांना लक्षात आले होते. डॉ.अश्विन सोनवणे यांच्या उपोषणावेळी देखील ते दिसून आले. नगरसेवकांनी पाठींबा तर दिला मात्र आ.राजूमामा भोळे यांचा जाहीर पाठिंबा दिसून आला नाही. आपल्या सर्व बॅनरवरून डॉ.सोनवणे यांनी आ.भोळे यांचा फोटो कधीच बाजूला केला आहे. डॉ.सोनवणे आमदारकीच्या शर्यतीत येत असल्याने आ.भोळे आणि त्यांच्यात फुट पडल्याचे उघड झाले आहे.

नेत्यांशी चर्चा केल्यावर उपोषण सोडविण्याचे कार्य आ.राजूमामा भोळे यांनीच केले. अविश्वास ठराव विशेष महासभेत ठेवत पुढील रणनीती राबविण्याचे नगरसेवकांनी ठरविले फक्त कस लागणार होता तो जादुई आकडा गाठतांना. इकडे हे सर्व ठरत असतांना एक गट अविश्वास ठराव रद्द करण्यासाठी पुढे सरसावला. थेट कुणीही पुढे आले नसले तरी फोनाफोनी करीत लाभार्थी सर्वांनी नेत्यांचे कान भरण्याचे काम चोख केले. अधिवेशन काळात सुट्टी येताच नेते जळगावात पोहचले आणि अजिंठा विश्रामगृहात एक बैठक झाली. दुसरीकडे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे देखील दुसरी छुपी बैठक झाली. डॉ.विद्या गायकवाड यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव पारित केल्यास भविष्यात त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्याची सुरुवातच अशी झाली तर भविष्यात पोस्टींग मिळवताना ते अडचणीचे ठरते.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून विद्यमान मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन हे तयारी करीत असून आयुक्त अविश्वास ठरावाच्या मागे महाजन असल्याचे चित्र उभे करण्यात आले आणि तसा संशय पालकमंत्री ना.पाटील यांच्या मनात देखील काही लाभार्थ्यांनी पेरला होता. काहींनी तशी माहिती त्यांच्यापर्यंत अलगद पोहचवली. सुनील महाजनांचे मनसुबे फळाला जावू नये, आपल्या गटातील नगरसेवक आणि काही ठराविक पदाधिकाऱ्यांच्या माहितीवर ना.पाटील यांनी विश्वास ठेवला आणि मंत्री महाजन यांच्यापर्यंत ते सर्व पोहचविले. राज्याचे राजकारण पाहणाऱ्या नेत्यांना जळगावातील परिस्थिती लक्षात घेता कुणालाही नाराज न करता निर्णय घ्यावा लागणार होता. अजिंठा विश्रामगृहातील बैठक यशस्वी ठरली. नेत्यांनी मार्ग काढला आणि आयुक्तांवरील अविश्वास ठराव मागे घेत बदलीची शिफारस करण्याचे त्यात ठरले. पालकमंत्री असल्याने ना.पाटील यांचा शब्द वरचढ ठरला. भाजपने देखील दुसऱ्या दिवशी महासभेत गुगली टाकली. अविश्वास प्रस्ताव मागे न घेता कोरम पूर्ण न झाल्याने सभा तहकूब करावी लागली, त्यामुळे तो प्रस्ताव अनिश्चित काळासाठी रोखला गेला.

जळगाव शहरातील कामांच्या बाबतीत पहिल्याच दिवशी आयुक्त डॉ.विद्या गायकवाड कामाला लागल्या. सर्वांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत त्यांनी आपले काम सुरु केले. डॉ.गायकवाड यांचे कार्य देखील उत्तम आहे यात शंका नाही मात्र सर्वांनासोबत घेऊन कार्य केल्यास आगामी काळात प्रभागात सर्व नगरसेवकांना तोंड दाखवायला जागा मिळेल. सध्या मनपात अधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू असून डॉ.गायकवाड यांच्या जोडीला नवीन उपायुक्त आणि अधिकाऱ्यांची साथ लाभणार आहे. स्वच्छता, गटारी, हॉकर्स पुनर्वसन, शहर सुभोभिकरण, स्वच्छतागृहे हे मुद्दे महत्त्वाचे असून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी आणि पाठपुरावा करणे त्यांना आवश्यक आहे. जळगावकरांना आणि नगरसेवकांना देखील आयुक्त डॉ.गायकवाड यांच्यावर विश्वास असून त्या आपली जबाबदारी चोख पाडतील अशी आशा आहे.

पुढील महिन्यात जळगाव मनपाची मुदत संपत असून त्यानंतर प्रशासक प्रशासनाचे राज्य सुरु होणार आहे. तत्पूर्वी येत्या चार दिवसात ३० कोटींच्या कामासाठी विशेष महासभा बोलाविण्याच्या हालचाली सुरू आहे. पुढे देखील महिनाभराचा कालावधी शिल्लक राहणार असून त्यात कधीही विशेष महासभा बोलावून अविश्वास प्रस्ताव आणला जावू शकतो फक्त त्यासाठी संकटमोचक ना.गिरीश महाजन यांची मान्यता असणे आवश्यक आहे. जळगावातील कामे मार्गी लावण्यासाठी आणि समस्या सोडविण्यासाठी येणारा काळ सुगीचा असून त्यासाठी सर्वांचे एकमत होणे आवश्यक आहे.

www.chetanwani.blogspot.com

डॉ.अश्विन सोनवणे यांनी शहराच्या विकासासाठी उपोषण पुकारण्याची हिंमत पुढे कुणी दाखविणार? की, आहे त्याच नावेत स्वार होऊन पुढे जातील हे तर येणारा काळच सांगेल. डॉ.सोनवणे यांचे उपोषण काहींनी पब्लिसिटी स्टंट वाटला तर काहींना विधानसभा निवडणुकीची तयारी. सोनवणे यांनी घेतलेली भूमिका पक्षाच्या विरोधात वाटत असली तरी ती शहराच्या दृष्टीने योग्य होती. सध्या जळगाव शहर मनपात भाजपची कोणतीही सत्ता नाही. जळगाव शहराच्या विकासासाठी पहिल्यांदाच कुणीतरी नगरसेवक पुढे आला. विशेष म्हणजे त्या नगरसेवकाला इतरांनी देखील पाठींबा दिला. आज जरी सर्व शांत झाले किंवा सोनवणेंच्या आंदोलनाला हवी तशी प्रसिद्धी न देता उलट ते चुकीचे असे दाखविण्यात आले तरी येणाऱ्या काळात सोनवणे योग्य होते असे जळगावकर नागरिक नक्कीच म्हणतील.

Comments

Popular posts from this blog

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग