संवेदनशील शनिपेठेत दिसली सामंजस्याची भूमिका : एकीकडे अजान सुरू, दुसरीकडे श्रीराम नामाचा गजर
केवळ जळगावात नव्हे तर यंदा देशभरात श्रीराम नवमी जल्लोषात साजरी केली जात आहे. मुस्लीम धर्मीयांचा पवित्र महिना रमजान नुकतेच सुरू झाला असून श्रीराम नवमीची धामधूम देखील याच पर्वात आली. महाराष्ट्रात श्रीराम नवमीपूर्वी पाळधी आणि छत्रपती संभाजी नगर या दोन ठिकाणी सामाजिक शांततेला गालबोट लागले आणि दंगल उसळली. मंगळवारी पाळधी येथे श्री सप्तशृंगी देवीची गडावर जाणारी पायी दिंडी जात असताना काही समाज कंटकांनी त्यावर दगडफेक केली. वाद वाढला आणि दंगल उसळली. प्रथमदर्शनी समोर आलेल्या माहितीनुसार रमजान महिन्यातील रात्री ८.३० वाजेची नमाज सुरू असताना बाहेर डी.जे. सुरू असल्याने काही लहान मुलांनी वाद घातला आणि दगडफेक सुरू झाली असे समजले. समाजकंटक समाजात सर्वत्र विखुरलेले असतात परंतु समाजातील ज्येष्ठांनी आणि देशाचे उद्याचे भविष्य समजल्या जाणाऱ्या तरुणाईने भान ठेवणे गरजेचे आहे.
जळगावात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी एकदा मस्जिदजवळून जाताना वाद उसळला होता. त्यानंतर सार्वजनिक गणेश महामंडळातर्फे घेण्यात आलेल्या भूमिकेमुळे दरवर्षी गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडते. दरवर्षीच नमाज अदा होत असताना मिरवणूक वाजत गाजत मस्जिद समोरून पुढे जात असते. आपण मनापासून ध्यान, प्रार्थना करीत असताना बाहेर कितीही गोंधळ असला तरी आपल्याला त्याचा त्रास होत नाही. पाळधी येथे देखील काहीसे असेच झाले असावे. रमजान महिन्यात पवित्र रोजे सुरू असताना हातात दगड घेऊन कुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न एखादा रोजेदार तर नक्कीच नाही करणार. समाजकंटक किंवा माथेफिरू, कुटुंबाची चिंता नसलेलेच असे कृत्य करू शकतात.
दंगलीनंतर पोलिसांनी धरपकड सुरू केल्याने गाव १०० टक्के शांत झाले. अनेक सीसीटिव्ही फुटेज समोर आले असल्याने तपासात खरे गुन्हेगार स्पष्ट होतीलच यात शंका नाही. पाळधीत घडलेल्या प्रकारानंतर श्रीराम नवमी उत्सव शांततेत कसा पार पडणार? याची चिंता प्रशासनाला होती. कोणतीही मिरवणूक एखाद्या जागी दोन तास थांबून नसते तर काही वेळाने ती पुढे मार्गक्रमण करतेच, त्यामुळे काही काळासाठी आपण शांत राहिलेले कधीही उत्तम असते. आवाजाने कुणाचा धर्म दुखावला जात नसतो. शनिपेठ आणि त्यातल्या त्यात भिलपुरा, इस्लामपुरा परिसर अधिक संवेदनशील आहे.
गुरुवार दि.३० रोजी सायंकाळी ६.३० वाजता शनि मंदिराजवळून श्रीराम नवमीची भव्य मिरवणूक निघाली. ६.४५ वाजता मिरवणूक भीलपुरा चौकात पोहचली. मुस्लीम धर्मीयांचा रोजा सोडण्याचा आणि नमाजचा नेमका तोच होता. भिलपुरा मस्जिदीतून अजान सुरू झाली आणि चौकात डी.जे, ढोल ताशांचा गजर सुरू होता. एरव्ही संवेदनशील समजल्या जाणाऱ्या या चौकातून आजचा क्षण म्हणजे समाजकंटकांच्याच चेहऱ्यावर चपराक आहे. मिरवणुकीला ना गालबोट लागले ना काही अनुचित प्रकार घडला. दोन्ही समाजाकडून एकात्मतेचा संदेश देण्यात आला. रमजानची नमाज देखील अदा झाली आणि मिरवणुकीत प्रभू श्रीरामांचा जयघोष देखील झाला. कदाचित सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा आदर्श, श्रीराम रथोत्सव, वहानोत्सव आणि परिसरातील सर्वधर्मियांची भूमिका यासाठी कारणीभूत असेल. स्व.अविनाश दादा आचार्य, स्व.नियाज अली भैय्या, सचिनदादा नारळे, अयाज अली, किशोरभाऊ भोसले यांच्यासह दोन्ही समाजातील ज्येष्ठांनी आजवर सामजिक एकोपा जपला असून त्याचाच हा परिणाम आहे.
जळगावातच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी सर्वधर्मियांनी एकमेकांच्या धर्माचा आदर आणि स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगला तर सर्व सण शांततेत आणि जल्लोषात पार पडतील. दंगल करणारे पळून जातात आणि अगोदर बहुतांश निष्पाप नागरिकांना पोलीस ठाण्याची हवा खावी लागते. दंगेखोरनंतर पोलिसांच्या तावडीत सापडतात खरे परंतु त्यांच्या कुटुंबीयांना आणि इतर नातेवाईक, मित्र परिवाराला त्रास सहन करावा लागतो. आपण देखील उद्याचा भारत घडविण्यासाठी सज्ज होऊ आणि समाजाला पुढे नेऊ असा विचार तरुणाईने करणे आवश्यक आहे.

Comments
Post a Comment