मनुष्या नको रे निर्दयी होवू..!



भूतदया करा, प्राण्यांच्या भावनांची जाण ठेवा.


         

          नावरांप्रती माणुसकी दाखवा, प्राण्यांना होणाऱ्या त्रासाची जाण ठेवा. असे आपण बोलतो, ऐकतो मात्र खरंच तसं वागतो का? काही दिवसांपूर्वी महामार्गावर वाहनांच्या चाकाखाली आल्याने चिरडलेले माकड, कुत्रा यांचे फोटो पाहिले. पाहताच क्षणी जिवाचा तळफळाट झाला. गेल्या आठवड्यातच एका माकडाला निर्दयीपणे मारत असलेल्या तिघांचा व्हिडीओ व्हायरल झाला, सर्वत्र संतापाची लाट उसळली. मुक्या प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांना अटक झाली, तेव्हा कुठे अनेकांच्या मनाला थोडी शांती लाभली. मनुष्य खरंच खूप निर्दयी होतोय का? आज पुन्हा हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला.
           आमच्या घराशेजारी असलेले एक कुटूंब शेतकरी आहे. त्यांच्याकडे असलेल्या दोन म्हशी घराजवळच बांधलेल्या असतात. काल परिसरातच राहणाऱ्या कुणीतरी घरातील खराब बुरशी लागलेले बुंदीचे लाडू एका म्हशीला खावू घातले. काही वेळातच म्हशीला त्रास होऊ लागला. बिचारी मूक प्राणीच ना ती. स्वतःचा त्रास मालकाला सांगणार तरी कसा? बघता बघता म्हशीचं पोट खूप फुगले.. डोळ्यातून अश्रू बाहेर पडले.. वेदनेने ओरडू लागली.. मालकाने म्हशीला काहीतरी विषबाधा झाली असल्याची बाब चटकन हेरली. जनावरांच्या डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी लगबगीने काही इंजेक्शन दिले, सलाईन लावल्या. तासाभराने म्हशीला आराम वाटला असावा, पण पचनक्रिया मात्र काही सुधारली नाही. विषबाधेने पोटातील सर्व अवयव ओढले जात असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. 
            आपल्या आईला होत असलेला त्रास बाजूलाच असलेले पारडू टकमक बघत होते. त्यातच आईला(म्हशीला) विषबाधा झालेली असल्यानं पिल्लाला दुधापासून वंचित रहावे लागत होते. त्याला जरा दूरच बांधण्यात आले. नेमकं काय सुरू आहे, हे देखील बिचाऱ्याला कळत नव्हतं. मुके प्राणी ते बोलणार कसं आणि सांगणार कसं? पहिल्या दिवसाची रात्र गेली. दुसरा दिवस उजाडला. वेदनेने म्हैस गर्भगळीत झालेली होती. दुपारनंतर पुन्हा डॉक्टरांना बोलाविण्यात आले. पुन्हा तीन सलाईनमध्ये टाकून तीन इंजेक्शन म्हशीला देण्यात आले.
            दोन दिवसांपासून माझ्या डोळ्यासमक्ष सुरू असलेला सर्व प्रकार, उपचार पद्धती मी पाहत आहे. म्हशीला होत असलेला त्रास, मालकाची तळमळ, पारडूचा दुरावा, डॉक्टरांचे प्रयत्न सर्व समोरच आहे. डोळ्यासमोर नाही तो फक्त आरोपी. होय आरोपीचं, म्हशीच्या या परिस्थितीला कारणीभूत असलेली ती व्यक्ती. स्वतःच्या जिवाला त्रास नको म्हणून म्हशीला बुरशी लागलेले लाडू खाऊ घालणे हा देखील माझ्या नजरेतून एक गुन्हाच आहे. बुरशी आलेले लाडू खावून म्हशीला त्रास होईल, अशी शंका त्या व्यक्तीच्या मनात नक्की आली असणार. तरीही त्याने तसे कृत्य केले. स्वतःच्या बाळाला जराही त्रास झाला, आपल्या पोटात साधी कळ जरी आली तरी आपला जीव खालीवर होतो, मग का म्हणून या मुक्या प्राण्यांवर आपण भूतदया दाखवत नाही. 
            मनुष्या, भूतदया कर.. त्यांना देखील परिवार आहे. माणसांपेक्षा तर नक्कीच त्यांच्या भावना चांगल्या आहेत. नीच प्रवृत्ती त्यांच्यात नाही, प्राणी स्वार्थी नाही. तरी आपण आपल्या स्वार्थासाठी त्यांना मारतो, वाचवता येणे शक्य असून देखील वाहनांच्या धडकेत त्यांना ठार मारलं जातं, अमानुषपणे अत्याचार केले जातात, प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराची कुठं ही तक्रार दाखल होत नसल्याने हे प्रकार उघड देखील होत नाही. गेल्या काही दिवसात समोर आलेले प्रकार तर जाहीर आहेत, परंतु आजही कितीतरी घरात जनावरांवर अत्याचार होत असतात. गेल्या वर्षी मी जैन धर्मियांच्या पवित्र चातुर्मास सप्ताहात सहभागी झालो होतो. रोज प्रवचन करणाऱ्या महासतीजी यांनी एक गोष्ट सांगितली होती. आपण रोजच्या दिनचर्येत कळत-नकळत अनेक जिवांचे बळी घेतो. पायी चालतांना असो वा श्वास घेताना असो..अनेक निष्पाप जीव बळी जात असतात. रोज अशा जिवांची आपण माफी मागावी आणि मुक्या जीवांचा आपल्याकडून प्राण हिरावला जाणार नाही याची आपणच दक्षता घ्यावी, अशी शिकवण महासतीजी यांनी दिली.
           मोबाईल आणि धावपळीच्या जगात आपल्याला भूतदया करणारे बाबा आमटे तर माहिती आहे परंतु प्रत्यक्षात भूतदया करणे प्रत्येकाला जमत नाही. जमत नाही म्हणण्याऐवजी मनुष्य मुद्दामच भूतदया करण्यास टाळाटाळ करतो. करणारच ना त्यांच्याकडून कुठं मनुष्याला फायदा होतोय. मनुष्य हा शेवटी स्वार्थीच ना..! गेल्या आठवड्यात आम्हाला सकाळी मॉर्निंग वॉक करताना खान्देश सेंट्रलच्या आवारात थंडीने कुडकुडत, थकलेल्या अवस्थेत असलेले कुत्र्याचे पिल्लू सापडले. काही वेळापूर्वी फुटबॉल खेळणाऱ्या मुलांच्या घोळक्यात असलेले ते पिल्लू आता मुख्य रस्त्यावर वाहनांची चाके वाचवत स्वतःचा बचाव करत असल्याचे आम्ही पाहिले. तात्काळ त्या पिल्लाला आम्ही उचललं, खान्देश सेंट्रलचा संपूर्ण परिसर पिंजून काढला, परंतु त्याचे कुटुंब मात्र मिळाले नाही. पिल्लाला कुठं तरी सुरक्षित ठिकाणी पोहचविण्यासाठी आम्ही निघालो. कंवरनगर पोलीस चौकीजवळ असलेल्या अपंग विद्यार्थी संस्थेत आम्ही त्याला आणले. पिल्लाला बघताच सर्व दिव्यांग विद्यार्थी आनंदी झाले. आमच्यातील एकाने दूध पिशवी आणली, बिस्किटे आणलीत. पोटभर दूध-बिस्कीट खाऊन पिल्लू सुखावले. सर्व दिव्यांग विद्यार्थी स्वतःचा एक घास पिल्लाला खायला देतात, आज पिल्लू मस्त गुबगुबीत झाले आहे.
          मनुष्य खरंच निर्दयी झाला आहे का? होय, माणुसकी हरवली. आज कुठं ही अपघात झाल्यास मदत करण्याऐवजी मोबाईलवर फोटो काढायला मनुष्य प्राधान्य देतो. मनुष्य मनुष्याची मदत करत नाही, मुके प्राणी तर लांबच राहिले. मुक्या प्राण्यांवर दया करायला शिका. सात जन्मांची कथा खरी असेल तर मनुष्य पुढील जन्मी मुका प्राणी होईल. तेव्हा तरी त्याला प्राण्यांची व्यथा कळेल. प्रत्येकाने स्वतः विचार केला. प्राण्यांवर अत्याचार न केल्यास सर्व प्राणी निश्चिन्त होतील. ते तुम्हाला त्रास देणार नाही, तुम्हीही त्यांच्या वाट्याला जावू नका.

Comments

Popular posts from this blog

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'