दशसुत्री कार्यक्रमाने होतेय महिलांची प्रगती!

दशसुत्री कार्यक्रमाने होतेय महिलांची प्रगती!

    
महाराष्ट्र शासनाने महिलांच्या विकासासाठी नेहमी प्रथम प्राधान्य दिले आहे. महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी २०११ पासून राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच पदभार स्विकारलेल्या अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी अवघ्या काही महिन्यातच अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. राज्यभरात सुरु असलेल्या या अभियानाविषयी जागतिक महिला दिनानिम्मित आर.विमला यांच्याकडून जाणून घेवूया सविस्तर माहिती..!
अभियानाचा मुख्य उद्देश आणि स्वरूप
  
२०११ मध्ये केंद्र शासनाने जे वंचित आहेत अशा गोरगरीब जनतेच्या जीवनमानाचा दर्जा उंचवावा त्यासाठी या अभियानाची स्थापना केली. एकट्याने कोणतेही कार्य हाती घेतल्यास ते लवकर शक्य होत नाही, असा विचार करीत जास्तीत जास्त संस्था निर्माण करण्यावर शासनाने भर दिला. केंद्र शासनाने पंचसूत्री तर राज्यशासनाने दशसुत्री कार्यक्रमाची आखणी केली. त्यानुसार महिलांना एकत्र आणणे, त्यांची बैठक घेणे, बचतीची सवय लावणे, स्व गरजांसाठी निधी उभारणे, ताळेबंद तयार करणे यासह शासनाने सामाजिक बाबींकडे लक्ष वेधण्यास सुरुवात केली. त्यात नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता, यासह महिलांना लोह, कॅल्शियमच्या गोळ्या देणे, महिलांची प्रसूती रुग्णालयातच करणे, मुलांचे शिक्षण यावर देखील भर देण्यात आला आहे.
राज्यात २५ लाख कुटुंबांना १७०० कोटींवर कर्ज वितरीत
    राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानांतर्गत राज्यात आज दीड लाख बचतगट तयार करण्यात आले असून तब्बल २५ लाख कुटुंबापर्यंत अभियान पोहचले आहे. अभियान ४५ लाख कुटुंबापर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट आहे. महिला बचतगटांना तीन वर्षात अभियानामार्फत १७२ कोटी तर बँक लिंकेज अंतर्गत १५४७ कोटींचे वितरण करण्यात आले आहे. राज्यात ३६ जिल्ह्यात ५० पैकी ३६ केंद्रित ब्लॉक आहेत तर उर्वरित अकेंद्रित ब्लॉक आहेत. केंद्रित ब्लॉक असलेल्या भागातील बचतगटांना अधिक सक्षम करणे आणि अकेंद्रित ब्लॉक असलेल्या भागात नवीन गट त्यात करून महिलांना, परिवाराला सक्षम करण्याचे काम अभियानामार्फत सुरु आहे.
महिलाच चालवितात ग्रामसंघ, प्रभागसंघ
    राज्यात राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानाच्या विविध सखी ग्रामीण भागात जाऊन महिलांना एकत्र करतात. १० महिलांचा बचतगट तयार करण्यात येतो. बचत कशी करावी हे सांगून त्यांना विविध प्रकारच्या उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात येते. बचतगटाला तीन महिने पूर्ण झाल्यावर १५ हजारांचा फिरता निधी देण्यात येतो. फिरता निधी नियमित परतफेड केल्यावर त्यांना पुढील निधी देण्यात येतो. ग्रामीण भागात तयार करण्यात आलेले ग्रामसंघ, प्रभागसंघ हे महिलाच चालवितात.
महिला बचतगटांना कर्ज व्याजाचा मिळतो परतावा
    राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानात समाविष्ट असलेल्या बचतगटांना अभियानाअंतर्गत जास्तीत जास्त ७५ हजारांचे कर्ज देता येते. परंतु जर त्या बचतगटाने www.nrlm.gov.in या वेबसाईटवर बँक लिंकेजमध्ये नोंदणी केली असल्यास त्यांना बँकेकडून मिळालेल्या कर्जाचे व्याज शासन अदा करते. कर्जाची नियमित परतफेड असलेल्या केंद्रित भागातील गटांना ७ टक्के व्याजदराने कर्ज मिळते. ते व्याज केंद्रशासन ३ टक्के आणि राज्य शासन ४ टक्के परत करते. अकेंद्रित भागातील बचतगटांना १२.५ टक्के व्याजाने कर्ज मिळते. ते व्याज ५ टक्के केंद्र शासन आणि ७.५ टक्के राज्य शासन परत देते. त्यामुळे महिलांन उद्योगवाढीला चालना मिळते.
महालक्ष्मी सरस, जिल्हा सरस बचतगटांची बाजारपेठ
    बचतगटांनी निर्मिती केलेले पदार्थ, वस्तू यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावा, त्यांचा माल जिल्हा, राज्यपातळीवर पोहचावा यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानाअंतर्गत जिल्हापातळीवर सरस महोत्सव, विभागीय बचतगट मेळावा आणि राज्यस्तरीय ‘महालक्ष्मी सरस’ महोत्सव आयोजित करण्यात येत असतो. जिल्हास्तरीय महोत्सवात १० ते १५ लाख, विभागीय मेळाव्यात १ ते दीड कोटी आणि महालक्ष्मी सरसमध्ये १५ कोटींच्यावर उलाढाल होते.
‘एका क्लीक’वर मिळणार माहिती
    राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानाबद्दल केंद्रशासनाच्या www.nrlm.gov.in तर राज्यशासनाच्या www.umed.in या वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे. तसेच महालक्ष्मी सरसबद्दल www.mahalaxmisaras.com या वेबसाईटवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. तसेच जिल्हा ग्रामीण विकास अधिकाऱ्यांकडे व बचतगट सखींकडे माहिती उपलब्ध होऊ शकते. काही अडचण किंवा तक्रार असल्यास ceo.msrlm@umed.in यावर थेट मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांच्याकडे मेल पाठवू शकतात. लवकरच एक हेल्पलाईन क्रमांक देखील कार्यान्वित करण्यात येणार आहे.
सोशल मीडिया, ई-मार्केटमुळे अभियान होणार स्मार्ट
    सध्या सोशल मिडियाचे युग असल्याने सोशल मिडिया माध्यमाद्वारे प्रसिद्धी सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियान स्मार्ट करण्यासाठी पदभार स्विकारल्यानंतर उमेद आणि महालक्ष्मी सरसचे फेसबुकवर पेज तयार करण्यात आले. वेबसाईटवर वेळोवेळी माहिती पब्लीश केली जाते. आगामी काळात आम्ही ई-मार्केट पोर्टल सुरु करण्यात येणार आहे. ई-मार्केट इंटरनेट प्रणालीवर अवलंबून असल्याने २४ तास खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु असतील. त्याचा महिला बचतगटांना मोठ्याप्रमाणावर फायदा होईल. त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर देखील बचतगटांचे रिटेल मार्केट सुरु करण्याचा आर.विमला यांचा मानस आहे. प्रगत शेती, कुक्कुटपालन, शेळीपालन प्रभावीपणे राबविणे, भात शेतीसाठी एसआरआय पद्धतीचा अवलंब करणे यावर त्या भर देत आहेत.
महालक्ष्मी सरसचे अँन्ड्रोइड अँप
    महालक्ष्मी सरस महोत्सवात सहभागी होणाऱ्या महिला बचतगटांचा माल नागरिकांना वर्षभर हवा असतो. परंतु तो उपलब्ध होऊ शकत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी या वर्षापासून महालक्ष्मी सरस नावाने अँन्ड्रोईड अँप तयार करण्यात आले आहे. अँपवर एकदा महिला बचतगटांनी नोंदणी केल्यानंतर ग्राहकांना त्याद्वारे हवे तेव्हा घरबसल्या मालाची ऑर्डर देता येते. बचतगटाच्या महिला देखील निर्मिती केलेला माल कुरिअर खर्च घेऊन घरी पाठवितात. अँन्ड्रोइड अँपमुळे बचतगटांना मोठा फायदा होणार आहे.
कॅशलेस पद्धतीचा वाढविला वापर
    नुकतेच पार पडलेल्या महालक्ष्मी सरस महोत्सवात बहुतांश स्टाँलवर कॅशलेस प्रणालीचा उपयोग करण्यात आला. महिला बचतगटांना पीओएस मशीन पुरविण्यात आले होते. त्यामुळे कॅशलेस व्यवहारांना चालना मिळाली. बचतगटांनी कॅशलेस प्रणालीचा उपयोग करावा यासाठी त्यांना ई वालेट, रुपे कार्ड, विविध अँप याबाबत माहिती देण्यात येणार आहे. यासाठी नुकतेच राज्यस्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले असून ब्लॉक स्तरावर लवकरच प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. बँक सखींची याकामी मदत घेण्यात येणार आहे.
स्वताचा विकास झाल्यास परिवार, समाजाचा विकास
    आपण जे काम करतो ते मन लावून करावे. आपण असलेल्या पदाला कसे सर्वश्रेष्ठ करता येईल, हे आपल्या हातात असते. महिलांनी घरबसल्या स्वताच्या विकासासाठी आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावे. महिला संघटीत झाल्यास समाजातील अनिष्ट गोष्टी दूर करू शकतात. स्वतःचा विकास झाल्यास परिवाराचा, समाजाचा विकास करता येतो, हे महिलांनी लक्षात ठेवावे. एकत्र राहून कार्य केल्यास एकमेकांच्या सुख-दुखा:त सामील होता येते, असा संदेश राष्ट्रीय जिवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी महिला दिनानिमित्त दिला आहे.  
पतपुरवठा करणाऱ्या संस्थांकडून सावधान
    अलीकडच्या काळात विविध आमिष देवून कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्या संस्था कर्जाचे आमिष देत बक्कळ व्याज वसूल करतात. तसेच काही ठग बचतगटांना कर्ज देणार असल्याचे सांगून महिलांना गंडवितात. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहायला हवे. शासकीय बँकेमार्फत कर्ज मिळण्यास उशीर होतो, त्यामुळे थोडा संयम बाळगावा. काहीही संशयास्पद वाटल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क करावा, असे महिलांना वारंवार सांगण्यात येते.
कर्ज देण्यास बँकांची टाळाटाळ
    अभियानाअंतर्गत बचतगटांना जास्तीत जास्त ७५ हजारांपर्यंत कर्ज शासन देऊ शकते. ते देखील वारंवार देता येत नाही. १ लाखांपेक्षा अधिकचे कर्ज बँकेमार्फत बचतगटांना देण्यात येत असते. परंतु महाराष्ट्रात काही बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे बहुतांश गटांना आपल्या उद्योगाचा विस्तार करता येत नाही. आम्ही बँक प्रतिनिधींची दर तीन महिन्यांनी बैठक घेवून त्यांना याबाबत मार्गदर्शन करीत असतो.

    राज्यात राष्ट्रीय जिवनोन्नती अभियानाला स्मार्ट बनविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी स्मार्ट प्लन तयार केला आहे. त्यानुसार त्या एक-एक टप्पा अवलंबित आहे. येणाऱ्या काळात राज्यात सुरु असलेल्या अभियानाची ओळख देशपातळीवर घेतली जाईल, असे यातून दिसते.

-    चेतन रविंद्र वाणी९८२३३३३११९, ७०२०५८८२८८


Comments

Popular posts from this blog

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग