नवीन वर्ष, नवे पर्व, नवा प्रवास...!

नवीन वर्ष, नवे पर्व, नवा प्रवास...! 

     मित्रांनो गेल्या साडेचार वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात वावरतांना अनेक दिग्गज संपादक, सहकारी, मित्र यांच्याकडून खूप काही शिकलो. गेल्या दोन वर्षापासून नवे वर्ष, नवे पर्व, नवा प्रवास असे समीकरणच जुळले आहे. गेल्या नववर्षाला दै.गावकरी मध्ये रुजू झालो तर यावर्षी मंत्रालयात माहिती व जनसंपर्क विभागात रुजू . बघूया हे वर्ष माझ्या सुप्त कलागुणांना आणखी काय- काय वाव देणार..!

     जळगाव शहरात राहतांना यू
बी ग्रुपमधून मर्चंटायझर, त्यानंतर छायाचित्रकार असे काम करतांना अनावधनाने पत्रकारिता क्षेत्रात आलो. सुरुवातीला दै.सकाळमध्ये शनिपेठ परिसरासाठी ‘सिटीझन रिपोर्टर’ म्हणून सुरुवात केली. सुरेश उज्जेनवाल सरांनी प्राथमिक पत्रकारिता समजाविली, परंतु मीच गंभीर नसल्याने फारशी मनावर घेतली नाही.
खरी पत्रकारिता सुरु...
    दैनिक देशोन्नतीमध्ये माझे मित्र योगेश चौधरी, निखील सोनार यांच्या मदतीने मला उपसंपादक म्हणून संधी मिळाली. पत्रकारितेमधील ‘प’ सुद्धा माहित नसलेल्या मला आवृत्ती प्रमुख मनोज बारी सरांनी खरा पत्रकार समजाविला, ते उदाहरण देवून.. (एखाद्या ठिकाणी गर्दी दिसल्यास, दुर्लक्ष करून निघून जाणारा सर्वसामान्य, थोडीफार विचारणा करणारा  जिज्ञासू, धडपड्या आणि त्याठिकाणी गर्दीत घुसून चार लोकांशी चर्चा करून, संपूर्ण माहिती घेत ती कागदावर उतरविणारा पत्रकार असतो.) दै.देशोन्नतीमध्ये असलेले आनंद गोरे यांनी मला इंट्रो आणि बातमी तयार करणे शिकविले. काहीतरी करण्याची धडपड करीत अवघ्या तीन महिन्यात मी बातमी लिहायला शिकलो. श्री. बारी सरांनी माझ्यातील धडपड आणि माझे व्यक्तिमत्व पाहून गुन्हे व जिल्हाधिकारी बीटची जबाबदारी माझ्यावर सोपवली. सुरुवातीला श्री.प्रशांत कोतकर सरांनी पत्रकारितेतील खाचखळगे शिकवले. वर्षभर काम केल्यानंतर लागलीच मला दै.तरुणभारतमधून बोलावणे आले.
‘ते’ अडीच वर्ष महत्त्वाचे..!
     दै.तरुणभारतचे श्री.दीपक कुलकर्णी सरांशी मुलाखतीपूर्वीच ओळख झाली. अवघ्या आठवडाभरात माझी मुलाखत झाली. मुलाखतीपूर्वी तशी फारशी तयारी केलेली नव्हती परंतु दैनिकाची पार्श्वभूमी आणि विचारसरणी याची माहिती घेतली होती. श्री.गिरीश कुलकर्णी सर व श्री.धन्यकुमार जैन सरांनी माझी मुलाखत घेतली. माझी विचारणा आणि या पूर्वी केलेल्या कामाची माहिती घेतल्यानंतर जळगाव शहराचे पोलीस अधीक्षक, एमआयडीसी पोलीस ठाण्याचा क्रमांक विचारला. त्यानंतर दै.तरुणभारत दैनिकाच्या विचारसरणीशी निगडीत लेखन करण्यास आवडेल का? काही भिती वाटणार नाही का? असे दोन महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले, मी लागलीच होकार दिला. दोन दिवसांनी फोन आला. पगाराची अपेक्षा विचारली थोडीफार तडजोड करून मी होकार कळविला. माझी तिसरी इंनिंग सुरु झाली.
     नवीन दैनिक, नवीन सहकारी, नवीन आव्हान, नवीन लेखन शैली या सर्वांचे दडपण होते. संपादक श्री.सचिन जोशी सर आणि वरिष्ठ उपसंपादक श्री.दीपक कुलकर्णी सर यांच्या तालमीत माझी पत्रकारिता जोर धरू लागली. श्री.जोशी सर अगदी प्रेमाने कामाची रूपरेषा आणि संबंध कसे टिकवावे हे शिकवीत होते. बातमीही हवी अन दुरावाही नको. अशी शिकवण ते देत होते. अवघ्या सहा महिन्यात मला शहरप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. त्याच वेळी श्री.प्रवीण चौधरी सरांनी  पत्रकारितेचे शिक्षण घेण्याचा आग्रह केला. नुकतेच पदवीची शिक्षण पूर्ण केलेले असल्याने मी देखील मु.जे.महाविद्यालयात ‘मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम’ला प्रवेश घेतला. एकीकडे रोजची पत्रकारिता आणि दुसरीकडे शिक्षण असा माझा प्रवास सुरु झाला.
     दै.तरुणभारतमध्ये माधव बहुद्देशीय प्रतिष्ठानचे सर्व संचालक वेळोवेळी करीत असलेले मार्गदर्शन मला तेव्हा आणि आजदेखील कामी येत आहे. तरुणभारतला अनेक मालिका गाजविल्या. आठ दिवस सुरु असलेल्या मालिका थांबविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न देखील केले. परंतु थांबणार तो मी कसला. संपूर्ण भांडाफोड केल्यानंतरच मालिकांचा शेवट होत असे. दीड वर्ष लोटल्यानंतर तरुणभारतमध्ये मुख्यसंपादक म्हणून श्री.दिलीप तिवारी सरांची नेमणूक झाली. नवीन साहेब, नवीन विचार असल्याने अवघ्या महिन्याभरात तरुणभारतचा चेहरामोहराचा बदलला. कधी सौम्य तर कधी कठोर असलेले तिवारी सरांचे शब्द मला खूप काही शिकवून गेले. शुद्ध लेखनासाठी असलेले नियम त्यांनी अगदी सोप्या भाषेत समजाविले. जास्तीत जास्त कसे टेक्नोसोवी व्हावे? हे त्यांनी सांगितले.
विविधांगी कामांचे वर्ष २०१६
    अडीच वर्ष दै.तरुण भारतमध्ये केलेले कार्य हीच माझी ओळख झाली. पगार दुप्पट झालेला असतांना देखील डिसेंबर २०१५ रोजी पुढील काहीही विचार न करता एका झटक्यात मी तरुणभारत सोडले. आता काम काय करावे अशी विवंचना असतांना श्री.विशाल चढ्ढा सरांनी माझी भेट दै.गावकरीचे संपादक श्री.धो.ज.गुरव सरांसोबत करून दिली. तीन दिवसात मी दै.गावकरीला रुजू झालो. पुन्हा पगाराची तडजोड केली आणि कामाला सुरुवात केली. अनेक संपादकांना घडविणाऱ्या श्री.धो.ज.गुरव सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्यच... सरांनी माझे आजवरचे काम ऐकून पहिल्याच दिवसापासून संपादकीय प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविली. गावकरीमध्ये कामाचा फारसा दबाव नसल्याने मी अभ्यासाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. मास कम्युनिकेशन जर्नलिझमच्या परीक्षा झाल्या. महाविद्यालयात तिसरा आणि विद्यापीठात चौथा क्रमांक मी पटकाविला. केल्याचे चीज झाल्याचे समाधान तेव्हा स्पष्ट जाणवत होते. दै.गावकरीची पत्रकारिता सुरु असतांना श्री.सचिन जोशी सर आणि श्री.विशालभाऊ त्रिपाठी यांच्यामुळे जळगाव शहर विधान मतदार संघाचे आमदार श्री.सुरेश दामू भोळे(राजूमामा) यांचा जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. तो एक वेगळाच अनुभव आहे.
    फावल्या वेळेत छायाचित्रकार मित्र वासिम खान आणि राकेश वाणी यांच्यासोबत फोटोग्राफीचा छंद जोपासला. सोशल मिडिया साईटवरील फोटो पाहून अधिकारी, राजकारणी, मित्र, इतर लोक बोलू लागले, ‘चुकून आलास रे तू पत्रकारितेत’..! मॉडेलिंग कर, मॉडेलिंग.., मुंबईला जा.. श्री.चंद्रकांत यादव सरांनी तर मार्ग देखील सांगितला होता. परंतु परिवारला सोडून मुंबई येण्याची इच्छा नाही झाली. पत्रकारिता करतांना काही प्रेसनोट तयार करणे, पत्रकार परिषदा आयोजित करणे, सोशल मिडियासाठी लेखन करणे, एखादी व्यक्ती, संस्था विषयी लेख तयार करणे अशी कामे पार्ट टाईम वेळेत होऊ लागली. श्री.तिवारी सरांनी तशी अनेक कामे माझ्याकडे सोपविली. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री.रमेशजी मुनोत यांच्यामुळे जैन धर्मियांचा पवित्र चातुर्मास प्रवचन सोहळा संपूर्ण चार महिने मी अनुभवला  आणि त्यातून बराच काही बोध घेतला. पार्ट टाईम कामातून कमी वेळेत मिळत असलेला पैसा आणि होत असलेल्या ओळखी यातून माझे नवीन करियर जळगाव शहरात बहरू लागले होते.
     सर्व योग्य सुरु असतांना विधी शाखेच्या प्रवेशाची पूर्वपरीक्षा दिली, उत्तीर्ण झालो, एस.एस.मणियार विधी महावियालयात निवड झाली. पत्रकारितेचे शिक्षण घेतल्यानंतर विधी शाखेचे शिक्षण सुरु झाले. सर्व धावपळीत अभ्यासाला वेळच मिळेना. वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करीत होतो. माझी लहान बहिण अर्चना हिने सांगितल्याने माहिती व जनसंपर्क विभागाच्या संहिता लेखक पदासाठी अर्ज केला. अवघ्या महिन्याभरात मुलाखत झाली. मुलाखतीसाठी असलेली गर्दी पाहून वाटत नव्हते माझी निवड होईल, परंतु मुलाखत छान झाली असल्याने एक विश्वास मनी होता. आठवडाभरा मुंबई, मंत्रालयात असलेल्या कार्यालयात काम करण्यासाठी माझी निवड झाली असल्याचे पत्र मेलवर आले आणि फोनवरून देखील कळविण्यात आले.
     दि.१५ डिसेंबर रोजी सकाळी रुजू व्हायचे होते आणि दि.१६ पासून विधी शाखेची परीक्षा सुरु होणार होती. परीक्षेचा तळ्यात-मळ्यात विचार करून दि.१४ रोजी मुंबई गाठली. आ.राजूमामा भोळे यांनी केलेले सहकार्य आजही कामी येत आहे. मामांच्या मनोरा आमदार निवासातील खोलीत राहण्याची व्यवस्था झाली. दि.१५ रोजी कामावर रुजू झालो. बैठकीत श्री.आंबेकर सर, मयुरा देशपांडे मँडम, श्री.आशुतोष पाटील सर यांनी कामाचे स्वरूप समजावून दिले.  ४ वाजता बैठक आटोपली. कामाचा पहिलाच दिवस असल्याने घाबरतच मयुरा मँडमांना परीक्षा असल्याचे सांगत सुट्टी मागितली. थोडासा दट्टा देत परवानगी मिळाली परंतु अंतिम परवानगी श्री.आंबेकर सर देतील असे सांगितले. सरांना भेटलो, सर्व माहिती सांगितली,  तत्काळ १५ दिवसांची सुट्टी घेऊन घरी निघालो. पहाटे अडीच वाजता घरी पोहचलो. सकाळी ७ वाजता उठून ९ वाजता  परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात गेलो.
आशिर्वाद, मार्गदर्शन, सहकार्य हीच अपेक्षा!
     दि.२ जानेवारी २०१७ रोजी नव्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई येथे संहिता लेखक म्हणून रुजू झालो. कामाला आता नव्याने सुरुवात केली आहे. शासन म्हणून काम कसे करावा हा नवीनच अनुभव मिळतो आहे. नवीन काहीतरी संकल्पना मांडण्याचे आव्हान माझ्यासमोर आहे.  पुढील काही महिन्यात  मी ते करूनच दाखवेल..शासन तळागाळातील जनमानसापर्यंत कसे पोहचले आहे, शासकीय उपक्रम, योजना यांची इत्यंभूत माहिती प्रत्येकापर्यंत पोहचविण्याचा माझा मानस आहे..! केवळ आपले आशिर्वाद, सहकार्य आजवर होते तसेच यापुढे राहील अशी अपेक्षा  करतो..!

Comments

Popular posts from this blog

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'