*आमचं भांडण स्वार्थासाठी..!*
*आमचं भांडण स्वार्थासाठी..!*
गेल्या अनेक वर्षांपासून कायम असलेली सेना-भाजप युती यावर्षी नाट्यमय घडामोडी होऊन तुटली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणाच केली. अवघे काही दिवस उलट नाही तोच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीनंतर एकत्र येणार असल्याचे वक्तव्य केले. केवळ आपलीच चर्चा मतदारांमध्ये रहावी या उद्देशाने भाजप-सेनेने भांडण केलं असल्याचे आता वाटतं आहे.
गेल्या चार महिन्यापासून राज्यात निवडणुकीची चर्चा सुरु आहे. चर्चा तर सर्व करताय पण कुणाची..? आठवण करून बघा जरा, कोणत्या पक्षाचं नाव येतं ओठांवर? भाजप आणि शिवसेना दोनच नाव लक्षात येतात. का तर, गावात ज्याची चर्चा, त्याचेच नाव ओठी असते. तशीच गंमत सध्या आपल्याकडे आहे. भाजप आणि सेना युती तुटल्यापासून दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्यातच त्यांचा दिवस जात होता. त्यामुळे कोणतीही वृत्तवाहिनी सुरु करा किंवा वृत्तपत्र वाचा दोनच नावे समोर भाजप आणि सेना. अगोदर युती कायम राहणार असे सुतोवाच करून ‘पहले तुम, पहले तुम’ करीत युती तुटली.
दोघांचा वाद सुरु असतांना मराठी माणसाच्या विकासाचा मुद्दा करून हातमिळवणी करायला गेलेल्या मनसेकडे शिवसेनेने लक्षच दिल नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आपल्या खास शैलीत दुभंगलेल्या युतीवर शिंतोडे उडवीत होते. आज सेनेला डिचवायचं तर उद्या भाजपला टोला मारायचा अशी त्यांची शैली अनेकांना विचार करायला लावत होती. त्यामुळे त्यांचावर विश्वास तरी कसा ठेवावा असे काही नेत्यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेस अधूनमधून चमकत होती. एमआयएमची अवस्था कुठतरी जल्लोषात, गाजावाजा करणे अशी होती.
युती तुटल्यानंतर काही दिवसातच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीनंतर भाजप-सेना पुन्हा एकत्र येणार अस सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असचं सांगितलं. सेनेकडून मात्र तसा काही दुजोरा मिळाला नाही. गावात जो ओरडून-ओरडून स्वताची चर्चा करवून घेतो, जनता त्यालाच लक्षात ठेवते. मुंबई, ठाणे परिसरात देखील तेच झालं, भाजप आणि सेना हे नाव जनतेच्या मनावर बिंबविण्यासाठी रचण्यात आलेली खेळी यशस्वी ठरली. जाहिराती देखील दोघांच्याच जास्त होत्या.
नुकतेच मतदान पार पडले असून नागरिकांनी आपले अमुल्य मत मतपेटीत टाकले आहे. भाजप-सेनेच्या भांडणात दोघांची मतेजरी विभागली जाणार असली तरी दोघांपैकी एकाच्याच पथ्यावर पडणार आहेत. कालच दाखविण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये सेना क्रमांक १, भाजप २, कॉंग्रेस ३ क्रमांकावर राहणार असल्याचे दाखविण्यात आलं आहे. निकालानंतर दोघांची देखील एकहाती सत्ता येणे अवघड दिसतंय, त्यामुळे तेव्हा सत्ता स्थापन करण्यासाठी दोघांना एकत्र येण भाग आहेच. आजवर केलेल्या भांडणातून मतदारांना उल्लू बनविणाऱ्या या पक्षांना एकत्र येण्यासाठी काहीतरी मुद्दा हवा, नाहीतर मतदार शिव्यांची लाखोली वाहतील. तेव्हा पुन्हा मराठी माणसाचा मुद्दा जागृत होईल. मराठी माणसाच्या विकासासाठी आम्हाला एकत्र यावं लागेल, अस म्हणून दोघ एकत्र होणार!
युती तुटली, सरकार पडणार, आम्ही पाठींबा देणार नाही, नवीन सरकार स्थापन होणार अशा सर्व वावड्या त्याच क्षणाला संपुष्टात येणार. परंतु एक नवीन मुद्दा उपस्थित होईल..? महापौर, उपमहापौर पद कोण आणि कित्ती काळ घेणार? पुन्हा चर्चा रंगणार भाजपच्या भरवशावर असलेले आठवले तर उपमहापौर पदावर अडूनच बसतील, कदाचित या सर्व बाबीचं नियोजन देखील अगोदरच करून ठेवण्यात आलं असेल. युती सरकारने गनिमी काव्याने खेळलेली खेळी नक्की यशस्वी होणार यात कुणाचं ही दुमत नाही. पुन्हा एकदा पक्ष, उमेदवार जिंदाबाद, मतदार हक्कापासून बाद..!


Comments
Post a Comment