नाथाभाऊ : आपल्या माणसाची, आपुलकीची भेट!


नाथाभाऊ : आपल्या माणसाची, आपुलकीची भेट!

    
   
मुंबईत आल्यापासून मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. खान्देशातील अनेक माणसं भेटली, गप्पा झाल्या, ओळखी निघाल्या, परंतु आपुलकी नव्हती मिळाली. अनाथांचा नाथ म्हणून ओळखले जाणारे नाथाभाऊ (एकनाथराव खडसे) यांची बऱ्याच दिवसांनी भेट झाली अन मिळाली ना तीच आपल्या मातीची, आपल्या माणसाची आपुलकी..!
      

     जळगावकर हक्काने सांगतात असे हक्काचे व्यक्तिमत्त्व नाथाभाऊ. एरव्ही मुंबईत असतांना मंत्री म्हणून भाऊ नेहमी व्यस्त होते. तरीही आपल्या परिवाराला, कार्यकर्त्यांना वेळ देणे, विचारपूस करणे हा त्यांचा पहिल्यापासूनच गुणधर्म. जळगाव आणि कोथळी येथे मुक्ताई बंगल्यावर ती जत्रा मी अनेकदा अनुभवली. नाथाभाऊ, कसे हळव्या मनाचे, मनमोकळे व्यक्तिमत्व हे मोजक्याच जवळच्या लोकांना माहिती. मुंबईत आल्यापासून मी जवळपास सर्व मंत्र्यांची कार्यालये हुडकून काढली. काही ना काही काम होतेच. मंत्री महोदयांना पाहण्याची संधी मिळाली. प्रत्यक्ष बोलणे मात्र कुणाशीही नाही झाले. जळगावला पत्रकारितेत असतांना नेहमी हक्काने भेटता येणारे व्यक्तिमत्व नाथाभाऊ यांची भेट बऱ्याच दिवसापासून नव्हती झाली.

     आज दुपारी कामानिमित्त मी आणि आनंद दोघे बाहेर पडलो. फिरताफिरता पंकज मॅन्शनजवळ आलो. सहज नाथाभाऊ आहेत का? म्हणून विचारणा केली असता 'साहेब, घरात असल्याचे उत्तर मिळाले'. फ्लॅटची बेल वाजवली, नोकराने दरवाजा उघडला. आमची चौकशी करून घरात निरोप घेऊन गेला. जळगावहून दोन लोक भेटण्यासाठी आल्याचे समजताच झोपण्यासाठी जात असलेले नाथाभाऊ भेटणार असून घरात बसण्याचे नोकराने आम्हाला सांगितले.

     घरात प्रवेश करताच संत मुक्ताईची मोठी प्रतिमा चित्रित केलेली नजरेसमोर आली. दर्शन घेऊन सोफ्यावर बसलो तोच पांढरे कपडे घातलेले नाथाभाऊ प्रसन्न भावमुद्रा ठेवत आले. आम्ही आदरपूर्वक त्यांना नमस्कार केला आणि बसलो. भाऊंनी तात्काळ पाणी, चहा सांगितला. भाऊंच्या प्रकृतीविषयी विचारणा करीत गप्पांना सुरवात झाली असता नुकतेच स्पाईनची एक शस्त्रक्रिया झाल्याने आराम करीत असल्याचे भाऊंनी सांगितले. ४० वर्षापासून सतत दगदग करीत अनेक त्रास या व्यक्तिमत्त्वाने अंगी लावून घेतले. त्यामुळेच आज उतरत्या वयात ते दुखणे त्यांना सहन करावे लागत असल्याची जाणीव झाली. भाऊंवर वर्षभरात लहानमोठ्या अशा किमान २-३ शस्त्रक्रिया झाल्या असतील, मात्र जनसेवेचे तत्त्व काही त्यांनी सोडले नाही.

     नाथाभाऊंनी आमच्या दोघांच्या कामाचे स्वरूप, पगार याविषयी सविस्तर माहिती विचारली. त्यांनीच आमच्या वरिष्ठांची नावे सांगितली. विषयालाच जोड म्हणून जळगावच्या काही जेष्ठ पत्रकारांची नावे देखील भाऊंनी घेतली. सध्या सोशल मिडियाचे युग आहे. त्यात नाथाभाऊ करीत असलेल्या सोशल मिडियाचा वापर याविषयी गप्पा करीत बसलो. गप्पांमध्ये सध्या सुरू असलेले जि.प., पं.स. निवडणुकीचे वारे यावर चर्चा सुरु झाली. आपल्या जिल्ह्यात विशेषतः मतदार संघात कार्यकर्ते, उमेदवार यांच्या भेटीगाठी, अर्ज भरणे यासाठी सुरु असलेली धावपळ, राजकीय वातावरण, गटबाजी याची खडानखडा माहिती देत भाजपची सरशी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    आमच्यासोबत घरात मंदाताई आणि जावई प्रांजल खेवलकर देखील बसले होते. नातू गुरु अद्याप घरी आला नसल्याचे त्यांनी विचारले. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत जिल्ह्यात भाजप कसा वरचढ ठरला, कसे नियोजन होते याची इत्यंभूत माहिती नाथाभाऊंनी दिली. चहाचे घोट घेत गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. वडिलांच्या वयाचे असून देखील एक आपुलकी, मित्रत्त्व, खरेपणाच्या नात्याने भाऊ आमच्याशी संवाद साधत होते. त्यावरून भाऊंचा दांडगा अभ्यास, अनुभव आमच्यादेखील कामी नक्की कामी येईल असे वाटले.

     जवळपास अर्धातास गप्पा केल्यावर गुरु घरी आला. नातवाला पाहून आजोबांचे डोळे लागलीच चमकले. आजीचा मोबाईल घेऊन तो आतल्या खोलीत निघून गेला. गप्पा सोडून निघण्याचा विचार नव्हता परंतु बराच वेळ झाला असल्याने आम्ही भाऊंची रजा मागितली. 'काहीही अडचण आल्यास हक्काने निसंकोच सांगा' असे हक्काचे, विश्वासाचे शब्द शिदोरी म्हणून घेऊन आम्ही बाहेर पडलो. स्वतःच्या घरात भाऊंनी आमच्यासोबत केलेल्या निवांत गप्पा मनाला भिडणाऱ्या होत्या.

     एरव्ही नेहमी घाई गर्दीत असलेल्या भाऊंचा मूळ स्वभाव आम्हाला आज स्पष्ट अनुभवायला मिळाला. भाऊंचे दिलदार मन, आपुलकी, मुक्ताई श्रद्धा, अनुभव, कुशल वक्तृत्त्व, जबाबदारी, कर्तव्य असे सर्वच गुण आज जवळून पाहिले. आमच्या कार्यालयात आल्यानंतर आपल्या हक्काचे व्यक्तिमत्त्व लवकरच मंत्री मंडळात याच गुणांनी भेटावे अशी इच्छा आम्ही मनोमन प्रकट केली आणि आमच्या कामाला लागलो.

Comments

Popular posts from this blog

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग