*परिस्थिती : व्यक्तींचे विविध पैलू*
*परिस्थिती : व्यक्तींचे विविध पैलू*
*‘क्रीएटिव्ह ग्रुप’ची धाव, ‘ब्लू डायमंड’ची ओशाळलेली माणुसकी, तत्पर असलेले ‘तेज’*
मित्रांनो
नुकतेच माझ्या परिवारावर एक मोठे संकट आले. पैशांपेक्षा माणुसकी महत्वाची असते हे
आजवर आपण केवळ बोलतच आलोय परंतु, मी जळगाव शहरात परिस्थितीनुसार बदलत जाणाऱ्या
व्यक्तींचे काही पैलू मी त्यादिवशी दोन तासात अनुभवले. माझ्या मदतीसाठी लागलीच
धावून आलेल्या ‘क्रीएटिव्ह ग्रुप’ आणि लागलीच उपचार सुरु करणारे डॉ.तेजेंद्र चौधरी
यांचे विशेष आभार मांडण्यासाठी हा ब्लॉग.... अरे हो, एक राहिलेच ..! माणुसकीपेक्षा
पैसा श्रेष्ठ असलेले डॉ.‘ब्लू डायमंड’ यांचे मनापासून विशेष आभार...!
गेल्या आठवड्यात बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास माझे वडील रविंद्र
वाणी(आप्पा) यांना दुकानावर असतांना अचानक लकव्याचा सौम्य झटका आला. त्याचा
परिस्थितीत त्यांनी मला फोन केला. मी घरी होतो त्याच अवस्थेत गाडी काढली आणि
निघालो. दुचाकीवर असतांनाच ‘क्रीएटिव्ह ग्रुप’च्या दोन मित्रांना फोन केले, मी
दुकानावर पोहचतो तोच ते देखील हजर होते.
*तब्बल अर्धातास फिरफिर*
वडिलांना
कुणाकडे न्यावे म्हणून डॉ.विलास भोळे यांचा सल्ला घेतला. लागलीच डॉ.नरेंद्र दोषी
यांचे रुग्णालय गाठले, परंतु बाबा वयामानानुसार आता रोज केवळ ५० रुग्ण तपासात
असल्याने आमचा नंबर लागणार नसल्याचे समजले. मग जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त
शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील व डॉ.दत्तात्रय बिराजदार यांच्याशी संपर्क केला.
त्यांनी जिल्हा रुग्णालयात बोलाविल्याने तेथे गेलो डॉ.बिराजदार यांनी तपासणी केली
असता रक्तदाब खूप वाढला होता. तो कमी करण्यासाठी एक गोळी देवून स्वताच्या सहीनिशी
असलेले पत्र देवून शहरातील प्रसिद्ध न्युरोलोजीस्ट डॉ.‘ब्लू डायमंड’ यांच्याकडे
पाठविले.
ओपीडी रुग्ण तपासत असलेल्या डॉ.‘ब्लू डायमंड’ यांची ४०० रुपये तपासणी फी
भरून आम्ही प्रतिक्षा करीत थांबलो. डॉ.बिराजदार आणि माझा भाऊ दै.सकाळ फोटोग्राफर
राकेश वाणी याने फोनवरून संपर्क करून वडिलांच्या प्रकृतीची माहिती देवूनही तब्बल
२५ मिनिटांनी डॉ.‘ब्लू डायमंड’ यांनी केबीन मध्ये बोलाविले. मी पत्रकार असल्याने
वडिलांची तपासणी करून मला योग्य पद्धतीने समजावून दिले.
*अर्धातास हरविली माणुसकी, सुरु झाला पैशांचा
बाजार*
डॉ.‘ब्लू
डायमंड’ यांनी वडिलांना अतिदक्षता विभागात दाखल करून एमआरआय आणि काही रक्त तपासणी
कराव्या लागतील असे सांगितले. मी तत्काळ होकार देत वडिलांना दाखल करून घेण्यास
सांगितले. केवळ ५ मिनिटात डॉ.‘ब्लू डायमंड’ यांचा असिस्टंट(चहापेक्षा केटली गरम )
बाहेर आला, ‘तुम्हाला अतिदक्षता विभागात प्रती दिवस ६ हजार रुपये लागतील’ असे
सांगितले. मी त्याला देखील होकार दिला. वडिलांसमोर पैसा गौण आहे. पुन्हा १०
मिनिटांनी डॉ.‘ब्लू डायमंड’ यांचा असिस्टंट आला, माझ्या हातात औषधी, सलाईन,
इंजेक्शनची लांबलचक यादी, १० पेक्षा अधिक रक्त तपासण्या लिहिलेली चिट्ठी व हातात
एमआरआय करण्याची चिट्ठी दिली. तत्काळ सर्व करण्यास सांगितले.
*आमचेच ऐकावे लागेल असा दम*
स्वताचे
मेडिकल असलेले माझे मित्र सुनील भंगाळे किंवा इरफान सालार यांच्याकडून औषधी,
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातून एमआरआय आणि डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी यांच्याकडून
रक्त तपासणी केली तर चालेल का अशी विनंती मी डॉ.‘ब्लू डायमंड’ यांच्या असिस्टंटला
केली. ‘आम्ही सांगितले तेथूनच सर्व करावे लागेल असा आदेश वजा दम त्याने मला दिला.
मी त्याला पुन्हा योग्य पद्धतीने समजावित विनंती केली असता त्याने सपशेल नकारच
दिला. पत्रकार शांत कसा बसणार मी घडलेला प्रकार पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप
तिवारी सर आणि बालरोग तज्ञ डॉ.राजेश पाटील, डॉ.बिराजदार यांच्या कानावर घातला.
त्यांनी देखील घडत असलेला प्रकार चुकीचा असून डॉ.‘ब्लू डायमंड’ याच्याशी तू स्वत
बोल आम्ही देखील बोलतो असे सांगितले.
*थक्क करणारी वाक्ये पडली कानावर*
मला
अगोदर तर १५ मिनिटे भेटू देण्यात आलेच नाही. मी वारंवार विनंती केल्यावर डॉ.‘ब्लू
डायमंड’ यांची भेट घेतली. अगोदर मनात
विचार होता की चहापेक्षा केटली गरम असेल परंतु नंतर समजले चहा गरमच नाही तर नसलेला
सुद्धा होता. डॉ.‘ब्लू डायमंड’ यांची काही वाक्ये ऐकून माझे कान सुन्न झाले. मी
अगोदर झालेला सर्व प्रकार त्यांना नीट समजावला असता अनेक प्रश्न उपस्थित करीत
‘आम्हाला दुसऱ्या मेडिकल, पँथोलोजीवर आमचा विश्वास नाही. त्यांचे रिपोर्ट योग्य
नसतात, दुसऱ्या मेडिकलवरून औषधी घेतली तर काही वेळेस रिअक्शन होतात असा आमचा अनुभव
आहे, असे हास्यास्पद उत्तर त्यांनी दिले. (बहुदा डॉ.‘ब्लू डायमंड’ औषधी आणल्यानंतर
तपासात नसावे). इतकेच नव्हे तर डॉ.‘ब्लू डायमंड’ पुढे बरेच काही बोलले. ‘तुम्ही
आताच असे करताय बिल देतांना तर फार झिगझिग कराल, गिरीश महाजन (एकेरी प्रयोग) व इतर
राजकारणीचे फोन आणाल’. ‘आम्ही पत्रकार आणि वकिलांना उभे करतच नाही,. मी त्यांना
शांततेत समजाविले, ‘तुमची वैयक्तिक फी कमी करीत नसल्याची जाणीव करून दिली. पत्रकार
असून कोणताही दबाव न आणता विनंती करीत असल्याचे पुन्हा लक्षात आणून दिले. तुम्हाला
जर औषधी आमच्याकडून घ्यायची नसेल तर तुमचा पेशंट घेवून जा. असे त्यांनी थेट सांगितले.
*उडत गेला ‘ब्लू डायमंड’, धावून आला ‘तेज’*
मी डॉ.‘ब्लू डायमंड’चे आभार मानत, स्वभाव आणि
व्यक्ती ओळखण्यात ते करीत असलेली चूक देखील लक्षात आणून दिली. तपासणी आणि ईसीजीचे
७०० रुपये देवून आम्ही वडिलांना घेवून निघालो. डॉ.तेजेंद्र चौधरी यांच्याशी
फोनवरून संपर्क केला असता त्यांनी वडिलांना घेवून या सांगितले. तत्काळ तपासणी करून
अतिदक्षता विभागात दाखल करून घेतले. अवघ्या काही मिनिटात त्यांनी सर्व प्रक्रिया
पार पडली. निवडक औषधी, निवडक रक्त तपासण्या आणि एमआरआय करण्यास सांगितले. विशेष
म्हणजे त्यांनी आमच्यावर कोणतेही बंधन लादले नाही. वडिलांना दाखल करण्याची
प्रक्रिया सुरु असतांनाच संपूर्ण क्रिएटीव ग्रुप रुग्णालयाबाहेर येऊन उभा होता.
*माणुसकीला जागणारे आणि पैसा प्यारा असलेल्या
सर्वांचे आभार*
माझे वडील दोन दिवस अतिदक्षता विभागात उपचार
घेत होते, नंतर प्रकृती बऱ्यापैकी सुधारणा दिसताच त्यांना साध्या कक्षात हलविण्यात
आले. चार दिवस आम्ही चिंतीत असतांना डॉ.तेजेंद्र चौधरींसह त्याच्या रुग्णालयात काम
करणारे सर्व कर्मचारी यांनी वडिलांची चांगली काळजी घेतली, त्यांचे आभार. माझ्या
घरून काही साहित्य आणणे, गोळ्या आणणे, नेहमी रुग्णालयात माझ्यासोबत दोन मित्र
थांबणे, अशी मदत करणारे क्रिएटीव ग्रुपचे जिवाभावाचे मैतर सर्वांचे आभार. वेळेवर
मानसिक आणि नोटाबंदी असतांना आर्थिक मदत करणारे सर्व उपकारींचे आभार. कागदोपत्री
खूप पदव्या, शहरात नावलौकिक, विविध सामाजिक कार्यक्रमात केलेले व्याख्यान, ‘रुग्ण
हे आमचे दैवत’ असे बोलून ‘पैशांना प्राधान्य’ देणाऱ्या प्रसिद्ध न्युरोलोजीस्ट डॉ.‘ब्लू
डायमंड’चे विशेष आभार.
*अनुभवातून मिळालेली शिकवण*
एकीकडे योग्य उपचार, ठराविक औषधी, आपल्याला
मोकळीक, मनमोकळा स्वभाव, ठराविक सर्वांना परवडेल असे बील काढणारे डॉ.तेजेंद्र
चौधरी यांची वागणूक सर्वांनी लक्षात ठेवावी. मित्रांनो तुमच्या कोणत्याही परिचिताला
काहीही व्याधी झाल्यास माणुसकी असलेल्या डॉक्टरकडेच घेवून जा. पैसा जास्त गेला तर
चालेल परंतु कमीत कमी त्याला बोलण्याची, माणसांची पारख आहे की नाही हे तरी बघा.
*महत्वाचे सांगायचे राहूनच गेले... आता
वडिलांची प्रकृती चांगली आहे, वयानुसार आणि आजारी पडल्याने थोडा थकवा आलाय, हळूहळू
सुधारणा होईल असे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या पंधरा दिवस तरी घरीच आराम*

Comments
Post a Comment