राजकीय किंगमेकर 'भाऊ-दादां'ची भूमिका संशयास्पद!

राजकीय किंगमेकर 'भाऊ-दादां'ची भूमिका संशयास्पद!

खडसे 'रावेर लोकसभा' मतदार संघात तर दादा '7 शिवाजीनगरा'त व्यस्त

     
जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून निवडणुकांची धामधूम सुरू असतांना एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणाची सुरूवात ज्यांच्या नावाने होत होती ते किंगमेकर आ.एकनाथराव खडसे आणि सुरेशदादा जैन यांची सध्या असलेली राजकीय भूमिका संशयास्पद दिसत असल्याने अनेकांच्या मनात प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.
     
      जिल्ह्यात कोणतीही निवडणूक आल्यास किंवा एखादा राजकीय डाव खेळायचा असल्यास काही वर्षापूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि सुरेशदादा जैन यांचेच नाव आघाडीवर असायचे. जैन शक्यतो शहराच्या आणि ठराविक न.पा.च्या राजकारणात लक्ष घालायचे तर खडसे जिप, पंस, इतर न.पा.च्या निवडणुकांचे नियोजन करीत होते. राज्याच्या राजकारणातही या दोन किंगमेकरांची वेगळीच छबी होती.
     घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेशदादा जैन हे साडेचार वर्ष कारागृहात असल्याने राजकारणापासून लांबच राहिले. त्याच काळात युतीचे सरकार आल्याने मंत्रीपद मिळालेले आ.एकनाथराव खडसे यांची राजकीय कारकीर्द अधिकच बहरली. परंतु अचानक दोन मोठे युटर्न आले. विविध आरोपांमुळे खडसेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तर जैन यांना घरकुल प्रकरणात जामिन मिळाल्याने ते बाहेर आले. 
     जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून विधानपरिषद निवडणूक आणि नपा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. विधानपरिषदेच्या निवडणुकीत नेहमीच अग्रेसर असलेल्या एकनाथराव खडसेंनी अचानक शांत पवित्रा घेतला तर ना.गिरीष महाजन यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत सर्वपक्षीयांना माघार घ्यायला लावत चंदूलाल पटेल यांना विजयी करून आणले. विधानपरिषदेच्या निवडणुकीत एरव्ही रस घेणारे जैन आणि खडसे प्रत्यक्ष निवडणुकीपासून लांबच राहिले. खडसेंची ऐनवेळी चंदूलाल पटेल यांनी भेट घेतल्याने त्यांनी थोडीफार मदत केली तर खाविआच्या माध्यमातून जैन यांनीही मदत केली. परंतु उघड उघड कोणीही सहकार्य केल्याचे दर्शविले नाही.
     घरकुल घोटाळ्याचे आरोप होण्यापूर्वी खडसेंना शह देण्यासाठी जैन यांनी काही नगरपालिकांमध्ये स्वतंत्र आघाडी उभारली होती. त्यात काही ठिकाणी त्यांची सरशी देखील झाली तर दुसरीकडे खडसे यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नेहमीच पुढाकार होता. जिल्ह्यात पंजा, घड्याळ बाजूला करीत कमळ फुलविण्याचे प्रमुख कार्य त्यांनीच केले.
     सध्या दोन्ही राजकीय किंगमेकर एक वेगळ्याच संशयास्पद भुमिकेत वावरत आहे. जामिनावर सुटल्यानंतर सुरेशदादा कुलदेवीच्या दर्शनानंतर सक्रीय राजकारणात येणार, विधानपरिषद निवडणूक लढविणार, उमेदवाराला पाठिंबा देणार, वाढदिवशी सक्रीय राजकारणात येण्याची घोषणा करणार अशा विविध चर्चा जिल्ह्यात सुरू असतांना न.पा.निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली तरीही ते 7 शिवाजीनगरच्या बाहेर आले नाही. एकाही उमेवाराला जाहिर पाठिंबा देणे, प्रचार करणे, जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणे असे काहीही न करता सुरेशदादा जैन हे गेल्या दीड महिन्यांपासून 7 शिवाजीनगरालाच ठाण मांडून आहेत. एकीकडे राज्यात शिवसेना बहरत असतांना जैन घरी व्यस्त असल्याने नेमके त्यांच्या मनात काय सुरू आहे?, ते पुन्हा सक्रीय राजकारणात येणार का?, कुटूंबियांकडून त्यांना राजकारणात परतण्यास विरोध आहे का? अशा विविध शंका यातून उपस्थित होतात.
     जिल्ह्याचे राजकीय बॉस समजले जाणारे अभ्यासू नेते नाथाभाऊ यांची राजकीय भुमिका देखील काही वेगळी नाही. न.पा.निवडणुकीत राज्यात भाजप सेनेची युती झाली असली तरी जिल्ह्यात मात्र ठराविक ठिकाणीच युती झाली आहे. त्यातही खडसे हे 14 न.पा.च्या उमेदवारांचा प्रचार करीत नसून केवळ खा.रक्षा खडसेंच्या लोकसभा मतदार संघांत येणार्‍या तालुक्यातच प्रचार करीत आहे. एकंदरीत ना.महाजन यांचा गट समजल्या जाणार्‍या विधानसभा मतदार संघांकडे खडसेंनी साफ दुर्लक्ष केले आहे. खडसेंच्या अहमं स्वभावात बदल दिसून येत असला तरी मंत्रीपद घालवण्यासाठी कारणीभूत पक्षातील हितचिंतकांची गंमत दुरूनच बघावी अशी खुमखुमी त्यांची कायम आहे. जिल्ह्यात असलेल्या राजकीय चिखलात खडसेंची केवळ कमळच फुलविले नाही तर गेल्या 40 वर्षाच्या तपश्‍चर्येत जिल्ह्यात कमळाची शेतीच केली. परंतु सध्या त्यांची न.पा.निवडणुकीत शेतीचा एकच कोपर्‍यावर नजर असल्याने इतर ठिकाणी आघाडी व इतर पक्षांची किड भाजपचे कमळ खराब करेल हे दिसून येत आहे.

Comments

Popular posts from this blog

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग