भाजपाच्या शेतीत सेना, राष्ट्रवादीला येईल बहर!
भाजपाच्या शेतीत सेना, राष्ट्रवादीला येईल बहर!
गटबाजीचा फटका आगामी निवडणुकीत बसणार : विधानपरिषद ही भाजपकडून जाणार?
राज्यासह जिल्ह्यातील भाजपची स्थिती लक्षात घेता एकमेकांवर शरसंधान
साधण्याचे पराक्रम आपल्याच नेत्यांकडून केले जात आहे. जिल्ह्यात काँग्रेसला
भुईसपाट करून भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख निर्माण केलेल्या जळगावात
आगामी नगरपालिका, नगरपंचायत आणि विधानपरिषद निवडणुकीत आपला बालेकिल्ला
आपल्याच कुरघोड्यांनी ढासळतांना पाहण्याची मज्जा अनुभवता येणार आहे.
भाजपातील अंतर्गत मतभेद सध्या जास्तच चव्हाट्यावर आले असल्याने आगामी
निवडणुका चुरशीच्या ठरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा सरळसरळ
लाभ होणार असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे
यांच्यात कोणत्या न कोणत्या कारणावरून आरोप, प्रत्यारोप होत असून मी योग्य
हे दाखविण्याच्या प्रयत्नात इतर मंत्री डागाळले जात आहेत. जिल्ह्यातही
पुर्वीपासून आम्ही एकच असल्याचा डंका वाजवणिारे भाजपचे जेष्ठ नेते माजी
मंत्री एकनाथराव खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील मतभेद
पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. नुकत्याच झालेल्या भाजप मेळाव्यात गिरीश
महाजनांविरोधात झालेली घोषणाबाजी, जामनेरच्या कार्यक्रमाला एकनाथराव
खडसेंनी जाणे टाळले, विमानतळावर मुख्यमंत्र्यांना काळ्या फिती लावून
करण्यात आलेला निषेध, त्यातल्या त्यात शहर भाजपात ही पदांच्या रस्सीखेचवरून
होत असलेले किरकोळ वाद नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. एकेकाळी काँगे्रसचा
बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यात 40 वर्षांची भाजप तपश्चर्या असलेले
एकनाथराव खडसेंनी तळागाळापर्यंत भाजप पोहचवून जिल्हा भाजपमय केला. परंतु आज
त्यांचे मंत्रीपद गेल्यानंतर चित्र काहीसे वेगळेच पहायला मिळत आहे.
भाजपातील काही जण पक्ष सोडण्याच्या वाटेवर आहेत तर अनेकांनी पक्षात सक्रीय
राहण्यापासून काढता पाया घेतला आहे.
स्थानिक स्वराज्य
संस्थांमध्ये भाजप सेना युती करण्याचे वरीष्ठस्तरावर निश्चित करण्यात आले
असताना जिल्ह्यात मात्र युतीचे बस्तान काही ठिकाणी बसलेच नाही. जिल्ह्यात
13 नगरपालिकांमध्ये होत असलेल्या निवडणुकीचे माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले
असून अनेक प्रभागांमध्ये दिग्गज स्वत:चीच आघाडी स्थापन करून रिंगणात उतरले
आहेत. भुसावळात तर सेनेने तिकीट न दिल्याने माजी आ.संतोष चौधरी यांनी
पक्षाला रामराम ठोकला तर अमळनेर आणि चाळीसगावला भाजपातील दोन दिग्गजांना
बंडखोरीमुळे पक्षातून निलंबित करण्यात आले.
शह-काटशहचा फटका बसणार
जिल्ह्यात
आ.खडसे आणि त्यांच्या काही हितचिंतकांमध्ये सध्या शह-काटशहचे राजकारण शिजत
असून अमळनेरला एका आघाडीच्या पत्रकावर खडसेंचा फोटो दिसला तर दुसरीकडे
भुसावळला युतीच्या पत्रकावर त्यांचा फोटो डावलण्यात आल्याची चर्चा आहे.
खडसे प्रत्यक्षात जरी पक्षासोबत असले तरी मात्र त्यांच्या नेतृत्त्वात पक्ष
यावर्षी देखील बहरेल कि भाजपला जिल्ह्यात शह-काटशहचा फटका बसेल हे लवकरच
समजणार आहे.
नोटाबंदीमुळे फसणार गाडी
स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुकीत पैसा मोठ्याप्रमाणावर वाटण्यात येत असतो. फुलीसाठी
100 आणि 500 च्या नोटाच वाटप करण्यात येत असतात. परंतु यावर्षी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 500, 1000 च्या नोटाबंदीच्या आदेशामुळे नवीन
नोटा मिळणे आणि 100 च्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे
यावर्षी जिल्ह्यात नोटा बंदीचा मातब्बर आणि पैशांच्या बळावर निवडून
येणार्या उमेदवारांना फटका बसणार आहे.
बोली बच्चनवर चालणार खेळ
नोटा
बंदीमुळे फारसा पैसा कुणाच्याही हातात राहणार नाही. त्यात निवडणूक आयोगाची
आमिष देणार्यांवर करडी नजर असल्याने उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे.
अनेक उमेदवार तर केवळ आश्वासनांची खैरात वाटून मते पदरात पाडून घेण्याच्या
विचारात आहे. बहुतांश तालुक्यांमध्ये तर पक्ष सोडून आघाडीतर्फे निवडणूक
लढवित असलेले उमेदवार पक्षांच्या उमेदवारावर विकासकामे न केल्याचे खापर
फोडत आहेत. त्यातल्या त्यात सत्ताधारी भाजप, युती सरकारकडून
सर्वसामान्यांना कोणताही ठोस लाभ मिळत नसल्याची ओरड विरोधक उमेदवार करीत
असल्याने त्याचाही फटका भाजपला बसणार आहे.
विधानपरिषद कोणाच्या पथ्यावर?
राज्याचे
अनुभवी नेते आ.एकनाथराव खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते
पक्षापासून जरा लांबच आहेत. त्यांचा उमेदवार समजल्या जाणार्या डॉ.गुरूमूख
जगवानी यांना डावलून पक्षाने चंदूलाल पटेल यांना उमेदवारी दिली. जगवानी
यांना डावलल्याचा रोषही त्यांनी भुसावळ येथे व्यक्त करून दाखविला. त्यात
खडसेंप्रमाणे निवडणूक बिनविरोध करण्याचा चिकाटीने प्रयत्न करणारे जलसंपदा
मंत्री ना.गिरीश महाजन यांनी मातब्बरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग
पाडले. परंतु त्यांची खेळी अपक्षांनी उधळून लावली. काही महिन्यांपासून सुरू
असलेले मराठा क्रांती मोर्चाचा प्रभाव, जगवानींना तिकीट न दिल्याने
दुखावलेले ना.खडसे समर्थक, ना.महाजनांच्या भरवश्यावर तिकीटाची आस लावून
असलेले परंतु डावलले गेलेले समर्थक हे सर्व भाजपविरूध्द मतदान करण्याची
शक्यता नाकारता येत नाही. त्यातल्या त्यात माघारीच्या दिवशी सर्व अपक्षांनी
हम एक साथ है, चा नारा दिल्याने भाजपला त्याचाही फटका बसू शकतो.

Comments
Post a Comment