'रासक्रीडा वहना'च्या दिवसाची वर्षभर प्रतिक्षा

                        'रासक्रीडा वहना'च्या दिवसाची वर्षभर प्रतिक्षा

            
देशात दिवाळी तर सर्वत्रच साजरी होते. आपण देखील दिवाळीचा सण साजरा करतो. जळगावात तर दिवाळीच्या काळात रथोत्सव आणि वहनोत्सव साजरा होत असल्याने दिवाळीची रंगतच वेगळी असते. दिवाळीचा पंधरवडा सर्वांसाठी सारखाच असला तरी शनीपेठ, बळीरामपेठेतील नागरिक, विशेषतः महिलावर्ग मात्र रासक्रीडा वहनाच्या आगमनाची वाट पाहत असतात. त्याला कारणही तसेच आहे हो...!!
     दिवाळी सण आली की सर्वांचा आनंद गगनात मावेनासा होतो. बोनस, फटाके, मिठाई, फराळ, नवीन कपडे, रोषणाई, दिवे असा सर्व झगमगाट प्रत्येकाच्या ध्यानीमनी असतो. जळगावात तर दिवाळीची मज्जा श्रीराम मंदिर संस्थानतर्फे काढण्यात येणाऱ्या वहन आणि प्रभू श्रीरामांच्या रथामुळे जास्तच वाढते. लक्ष्मीपूजननंतर बलीप्रतिपदेला वहनाला सुरुवात होते. शहरात वहनाचा मार्ग असलेल्या परिसरात वहन मार्गावर सडा समार्जन करण्यात येते.
         पंधरा दिवसापासून तयारी
      श्रीरामरथाच्या दुसऱ्या दिवशी रासक्रीडा वहनाने वहनोत्सवाचा समारोप करण्यात येतो. श्रीराम मंदिरापासून रिधुरवाडा, शनीपेठ, बळीरामपेठ, नवीपेठ असा वहनाचा मार्ग असतो. वहनाच्या स्वागतासाठी वर्षभरापासून प्रतीक्षा करीत असलेल्या महिला, मुली दिवाळी सुरु झाल्यापासून कोणती रांगोळी काढावी, कशी काढावी, कोणते रंग असावे, काय संकल्पना असावी याचाच विचार करीत असतात.
           ...अन अंथराला जातो रांगोळीचा गालिचा
     रासक्रीडा वहनाच्या स्वागतासाठी महिलावर्ग सकाळपासूनच तयारीला लागतो. रस्ता स्वच्छ झाडने, धुणे केल्यानंतर पूर्ण गल्ली वाहतुकीसाठी बंद करण्यात येते. प्रत्येकाच्या अंगणात कमीतकमी ४बाय४ तर जास्तीत जास्त १५बाय१५ फूट आकाराची भव्य रांगोळी साकारायला सुरुवात होते. दुपारी ११ पासून सुरु झालेली कलाकुसर ४ ते ५ वाजेपर्यंत पूर्ण होते. जीव ओतून तयार केलेली रांगोळी पाहून एक आत्मिक समाधान मिळते. शनिमंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत रस्त्यावर जणू रांगोळीचा गालिचाच अंथराला आहे असा भास आपल्याला होतो.
                                                           जनजागृतीसह 'कुछ हटके'
      वहनासाठी रांगोळी साकारताना काहीतरी हटके करण्याचा आणि जनजागृती होईल याची सुद्धा काळजी घेण्यात येत असते. यावर्षी शनिवारी विनय आणि साहिल ठाकूर या भावांनी जवळपास ३ हजार रुपये खर्चून फुलांची रांगोळी साकारली होती. याकामी त्यांना कुटुंबीयांनी देखील मदत केली. त्याच प्रकारची फुलांची रांगोळी महेश चौधरी व परिवाराने साकारली होती. नुकत्याच झालेल्या उरी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून सेजल ठाकरे, स्वप्नील ठाकरे, मयूर रतवेकर, भूषण नेवे, निर्भय पाटील यांनी आकर्षक रांगोळी साकारली होती. पंतप्रधान मोदी यांनी नुकताच झटका देऊन नव्याने आणलेल्या २ हजाराच्या नोटेची प्रतिकृती गौरी श्रीकांत पाठक यांनी साकारली होती. यासह स्वच्छ भारत अभियान, श्रीकृष्ण, स्त्रीभृण हत्या यासारख्या विषयांना रांगोळीच्या माध्यमातून हात घालण्यात आला होता.
  जिल्ह्याभरातून आलेल्या प्रेक्षकांची भरते जत्रा
      महिला व मुलींसह मुलांनी देखील साकारलेल्या रांगोळीच्या दोन्ही बाजूला ४-४ फुटाची जागा सोडण्यात आलेली असते. त्या मार्गावरून ये-जा करीत जिल्ह्याभरातील नागरिक विशेषतः महिलांची रांगोळी पाहण्यासाठी गर्दी होत असते. सायंकाळी ६ वाजेपासून रात्री १० वाजेपासून परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले असते. नागरिकांना रांगोळीची छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह आवरता येत नाही.
                   ४ तासाची मजा पण..!
      रांगोळी पूर्ण झाल्यानंतर केवळ ४ तासात ती पुसली जाणार आहे हे माहित असूनही सर्व उत्साहाने भाग घेतात. वेगवेगळ्या शक्कल लढवितात. या दिवसाची वाट वर्षभर पाहिल्यानंतर पुन्हा यावर्षीच्या रांगोळीची आठवण सर्व मनात ठेवतात.

Comments

Popular posts from this blog

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग

साडेतीनशे वर्षांचा इतिहास असलेले तरसोदचे गणपती मंदिर