खाकीतील सर्वसामान्य स्त्री 'मोक्षदा पाटील'(IPS)
*खाकीतील सर्वसामान्य स्त्री 'मोक्षदा पाटील'(IPS)*
लहानपणीच जळगावची काहीशी ओळख असलेल्या IPS मोक्षदा पाटील यांची जळगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदी वर्णी लागली. काही महिन्यांपूर्वीच त्यांची पदोन्नती झाल्याने त्यांनी जळगावच्या अपर पोलीस अधिक्षक पदाचा कार्यभार सांभाळला. रोखठोक बोलणे, कामाचा असलेला अनुभव, काम करण्याची वेगळी कार्यशैली, शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे त्यांचा स्वभाव फारच कणखर असल्याचा समजच जळगावकरांनी केला.
माझी आणि मोक्षदा पाटील यांची बातम्यांसाठी नेहमीच भेट होते. परंतु आजवर गेल्या महिन्यात मु.जे.महाविद्यालयाच्या जनसंज्ञापन आणि वृत्तविद्या (MCJ) च्या विद्यार्थ्यांसोबत गेलेलो असतांना काही खास विषयावर चर्चा झाली. त्यावेळी मोक्षदा मॅडम या स्त्रीप्रधान (महिलांना प्राधान्य देणाऱ्या) असल्याचे जाणवले. आज आपल्या सभोवताली असलेले सामाजिक वातावरण, मुलींना येणाऱ्या अडचणींचा त्यांनी कसा सामना करावा, उज्वल भविष्य कसे घडवावे? या विषयी सविस्तर मार्गदर्शन करून केव्हाही, काहीही अडचण आल्यास हक्काने नक्की संपर्क साधण्याचे ही सांगितले.
नेहमी खाकीत असलेल्या अपर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्यातील 'आई' सुद्धा काही महिन्यांपूर्वी दिसली. नवजात बाळाला आपल्यापासून दूर करायला आईचे काळीज कसं तयार होणार? कामाच्या व्यापात बाळाला मिळेल तेवढा वेळ दिल्यावर रात्री गस्तीसाठी जातांना त्या आपल्या चिमुकल्यालाही सोबत घेऊन जात होत्या.
पुन्हा आपल्या विषयाकडे येवूया, मोक्षदा पाटील यांच्यासोबत दिवसभर एक चालक पोलीस शिपाई, एक आरटीपीसी कर्मचारी (अंगरक्षक) असतो. अधिकारी असल्याने बऱ्याच वेळा मनमोकळं जीवन जगतांना अडचणी येतात. अखेर दिवाळीच्या धामधुमीत मॅडमांना स्वछंद खरेदी करण्याची संधी मिळालीच.
बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मोक्षदा पाटील या मामे नणंदसोबत घरगुती साध्या वेशात आपल्या शासकीय वाहनाने शहर पोलीस ठाण्यात आल्या. सोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना तिथेच थांबवून दोघी फुले मार्केटला गेल्या. दोन तास खाकीतील अधिकारीपणा बाजूला ठेवून एक सर्वसामान्य स्त्री म्हणून त्यांनी खरेदीचा आनंद घेतला. संपूर्ण फुले मार्केटच नव्हे तर चक्क बाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या हातगाड्या आणि थाटण्यात आलेल्या दुकानांवर असलेल्या वस्तूही त्यांनी खरेदी केल्या.
स्त्री शेवटी स्त्रीच असते राव! खरेदीच्या बाबतीत तर त्यांची कुणीच बरोबरी करू शकत नाही. दोन दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीवर अजय देवगण व काजल आले होते. त्यात स्ट्रीट शॉपिंगची मज्जाच काही न्यारी असल्याचे स्वतः काजलने ही कबूल केले. मोक्षदा पाटील यांनी देखील तीच मजा आपल्या फुले मार्केट परिसरात लुटली. साध्या पोशाखात असतांना त्यांना जळगावातील बोटावर मोजण्याइतक्याच नागरिकांनी ओळखले असावे. मॅडम मार्केटला आल्या, खरेदीचा आनंद लुटला खरा पण अस्सल खान्देशी माहिलेप्रमाणे त्यांनी वस्तू खरेदी करताना भाव केला की नाही? हे त्यांनाच माहिती.
IPS मोक्षदा पाटील यांच्या मी आजवर बघितलेल्या विविध छटा मांडण्याचा प्रयत्न माझ्या या ब्लॉगमधून करीत आहे....!


Comments
Post a Comment