'एसपीं'कडून पोलिसांना एम.एस.धोनीच्या स्वरूपात 'दिवाळी भेट'
जळगावातील ५०० वर पोलिसांनी घेतला 'एम.एस.धोनी'चा आनंद
राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून सण, उत्सव, परिवार विसरून सतत दक्ष राहणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देशभर गाजलेल्या एम.एस.धोनी हा चित्रपट दाखवून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी नवा पायंडा निर्माण केला आहे. एकप्रकारे पोलिसांना हि दिवाळी भेट आहे. राज्यातील हा दुसराच उपक्रम आहे.जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.सुपेकर नेहमीच नवनवीन उपक्रम राबवित असतात. समाधान हेल्पलाईन, वाचनालय, जॉब, करियर मार्गदर्शन केंद्र, स्केटिंग ग्राउंड, कराटे प्रशिक्षण यासारखे विविध उपक्रम त्यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस पाल्यांसाठी सुरु केले आहेत.
सध्या देशात एम.एस.धोनी चित्रपटाची सर्वत्र चर्चा असून चित्रपटाने चांगला गल्ला हि जमवला आहे. सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आल्यानंतर फुटबॉल गोलकीपर ते टीम इंडियाचा कर्णधार हा प्रवास पूर्ण करतांना महेंद्र धोनी याने किती कष्ट घेतले. टीसी असतांना घेतलेली मेहनत, आयुष्यात आलेले खडतर चढउतार पार केल्यानंतर तो यशस्वी झाला. महेंद्र धोनीचे जीवन इतरांना बळ देणारे असल्याने हा चित्रपट अनेकांनी बघितला. नुकताच या चित्रपटाला करमुक्त करण्यात आले.
नागपूरला प्रथम उपक्रम
नागपूर पोलीस आयुक्तांनी १० दिवसांपूर्वी अचानक सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वायरलेस करून एका मॉलमध्ये बोलाविले. त्यांना काही कळण्याच्या आताच त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत चित्रपट पाहण्यास बसविले.
पोलीस अधिक्षकांसह सर्वांची उपस्थिती
जळगाव शहरातील नटवर मल्टिप्लेक्समध्ये शनिवारी दुपारी ११.३० वाजता एम.एस.धोनी या चित्रपटाचा शो होता. शहरातील जवळपास ५५० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अगोदरच पोहचले होते. स्वतः पोलीस अधिक्षक डॉ.जे.डी. सुपेकर, अप्पर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे, सर्व पोलीस निरीक्षक चित्रपट पाहण्यात गुंग झाले होते.
पोलिसांची चहा, पाण्याचीही सोय
चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस प्रशासनाकडून मोफत चित्रपट तर दाखवण्यात आलाच सोबत त्यांना वडापाव, चहा आणि पाण्याची बाटली देखील देण्यात आली. पोलीस अधीक्षकांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Comments
Post a Comment