*गीतकार ‘आधार’ला उभारीसाठी ‘आधार’ची अपेक्षा*
गरीबीमुळे रिक्षा चालवून भागवतोय कलेची भूक : शिकण्याची उमेद पण..
जळगाव
- कलाकारची भूक म्हणजेच त्याच्या कलेची साधना असते. सध्या बहुतांश कलाकार
उपेक्षित असून तांबापुरा परिसरात राहणारा उगवता गायक आधारची व्यथाही काही
वेगळी नाही. गायनाचे उच्चशिक्षण घेण्याची मनी उत्कंठ इच्छा असतांना केवळ
गरीबीमुळे तो मागे राहत आहे.
परिस्थिती माणसाला कुठल्या कुठे
नेवून ठेवते. तांबापुरा परिसरात असलेल्या एका गरीब कुटूंबात जन्मलेल्या
आधार संतोष ससाणे याच्या घरात 4 व्यक्ती. त्यात आई, भाऊ रोजंदारीने
साफसफाईची कामे करतात तर वडील घरीच असतात.
*एकलव्याप्रमाणे गायकी केली आत्मसात*
जेमतेम
आवक असलेल्या कुटूंबात आधारने 10वी पर्यंतचे शिक्षण मनपा शाळेत पुर्ण
केले. गायनाची आवड असल्याने शिक्षण घेत असतांनाच कोणत्याही गायन मंडळांच्या
कार्यक्रमात जाणे, गल्लीबोळात एखाद्या कार्यक्रमात संधी मिळेल तेव्हा गायन
करणे, इतरांचे गायन मन लावून ऐकणे असे करत-करतच आधार थोड्याफार प्रमाणात
गायन शिकला.
*अनेक ठिकाणी कार्यक्रम सादर*
आधारचे गायन
ऐकून त्याला काही कार्यक्रमांमध्ये गायन सादर करण्याचे आमंत्रण येवू लागले.
त्यात लोकगीत, भीमगीत, कव्वाली यांचे आमंत्रण जास्त होती. आधारने आजवर
शहरातील वाघनगर, मेहरूण, तांबापुरा तसेच बर्हाणपूर, रावेर, ऑर्डनान्स
फॅक्टरी येथे कार्यक्रम सादर केले.
*दुसर्यांच्या भरवशावर स्वत:ची गायकी*
कार्यक्रमात
गायन सादर करतांना संगीताची साथ असल्याशिवाय मजाच येत नाही. त्यामुळे आधार
ढोलक, हार्मोनियम, बॅन्जो, तबला, ऑक्टोपॅड आणि कोर्ससाठी बाहेरील
व्यक्तींना बोलवितो. त्यात प्रत्येकाला प्रतीदिवस दीड हजार रूपये त्याला
द्यावे लागतात.
*पोटाची भूक भागविण्यासाठी
रिक्षा चालविण्याचा व्यवसाय*
गायनाचे
कार्यक्रम नियमीत होत नसल्याने तसेच त्यात सर्वांना वाटल्यानंतर हजार,
पाचशे वाट्याला येत असतात. त्यात स्वत:चा आणि कुटूंबांचा रहाटगाडा चालत
नाही. त्यामुळे आधारने पाहुण्यांच्या मदतीने रिक्षा घेतली. गेल्या सहा
महिन्यांपासून तो रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करीत आहे.
*तेव्हा प्रेक्षक आवाज देता,
आता मी प्रवाशांना आवाज देतो*
एखाद्या
कार्यक्रमात गायन सादर केल्यानंतर प्रेक्षक मला दाद देत टाळ्यांचा कडकडाट
करतात. काही प्रेक्षक तर माझ्या सह्या घेवून कौतुक देखील करतात. परंतु
रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतांना कसल्या तरी अवतारात मला प्रवाशांना
आवाज देवून विचारणा करावी लागते, अशी खंत आधारने व्यक्त केली.
*मोठा गायक होण्याचे स्वप्न पण..*
आधारला
गायकीचे उत्तम शिक्षण घेवून मोठा गायक व्हायचे आहे. परंतु आर्थिक बाजू
कमकुवत असल्याने तो स्वत:चे हार्मोनियम सुध्दा घेवू शकत नाही. त्यातच
रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचे तीन हफ्ते थकीत असल्याने ती देखील चिंता कायम
माथी असते. गायकीच्या शिक्षणासाठी आणि इतर साहित्य घेण्यासाठी कोणीतरी मदत
करावी अशी अपेक्षा आधारने व्यक्त केली आहे.

Comments
Post a Comment