भाऊ-दादा आज करणार क्षमायाचना?

भाऊ-दादा आज करणार क्षमायाचना?

रूसवे-फुगवे सोडून शहराच्या विकासासाठी दोघांनी एकत्र येण्याची गरज

      जैनधर्मियांचा पवित्र चातुर्मास सप्ताहात पर्युषण पर्व महत्त्वाचे असते, त्यातल्या त्यात पर्युषण पर्वाच्या समाप्तीला असणार्‍या संवत्सरीच्या दिवशी क्षमायाचना करून आजवर आपला वाद असलेल्यांशी पुन्हा गट्टी साधतात. जिल्ह्याच्या राजकारणात कट्टर हितशत्रू समजले जाणारे माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी सुध्दा संवत्सरी पर्वाची संधी साधून जळगावच्या हितासाठी नवा पायंडा उभारण्याची गरज आहे.
     सध्या जैनधर्मियांचा पवित्र चातुर्मास पर्व सुरू असून उद्या दि.6 रोजी पर्वाधिराज पर्व पर्युषण पर्वाची संवत्सरीने समाप्ती होणार आहे. भगवान महावीर सांगतात, ‘क्षमा विरस्य भुषणमं’ क्षमा मागणे विरांचे भूषण आहे.
सोडा राग, बोला गोड
क्षमायचनेच्या दिवशी आजवर आपण कळत-नकळत मन, वचन आणि कायाने कोणाचेही मन दुखावले असेल, स्वार्थ, अहंकारामुळे नात्यांमध्ये कटुता निर्माण झाली असेल तर त्या व्यक्तीकडे क्षमायाचना करून ‘मिच्छामी दुक्कडमं’ असे म्हणून पुन्हा गोड बोलतात.
दादा-भाऊ एकत्र येतील?
संवत्सरीच्या निमित्ताने गेल्या अनेकवर्षापासून विशेषत: 2011 पासून जास्तच दुरावलेले माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे व माजी मंत्री सुरेशदादा जैन हे देखील एकत्र येतील अशी अपेक्षा गेल्या तीन दिवसांपासून जळगावकर व्यक्त करीत आहे.
‘सुर्यनाथ’, ‘खान्देश विकास मंच’ स्थापनेची चर्चा
घरकुल घोटाळ्याप्रकरणी गेल्या साडेचार वर्षापासून कारागृहात असलेले सुरेशदादा जैन यांना नाथाभाऊंच्याच वाढदिवशी जामीन मंजूर झाला. दि.2 रोजी जामीन मंजूर होताच सोशल मिडीयावर दादा-भाऊ विकासासाठी एकत्र यावे आणि ‘सुर्यनाथ’ किंवा ‘खान्देश विकास मंच’ स्थापन करून खान्देशच्या राजकारणात आपली सत्ता प्रस्थापित करावी अशी चर्चा जोर धरत आहे.
‘दादा’ स्वाध्याय भवनात येणार
कारागृहातून सुटल्यानंतर सुरेशदादा जैन हे अद्यापही निवासस्थानाच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी दिसून आलेले नाहीत. जैनधर्मांत सर्वात पवित्र मानल्या जाणार्‍या संवत्सरीच्या दिवशी सुरेशदादा जैन हे स्वाध्याय भवनात सुरू असलेल्या चातुर्मास प्रवचनासाठी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दोघांची एकच व्यथा, निर्माण व्हावी विकासाची गाथा
गेल्या 35 वर्षाच्या राजकारणात शहरात एकहाती सत्ता असलेले सुरेशदादा जैन यांनी युतीची सत्ता असतांना मंत्रीपदही उपभोगले. परंतु घरकुल घोटाळ्यात त्यांना साडेचार वर्ष कारागृहात राहावे लागले. यामागेही राजकारण असल्याचे आरोप झाले. गेल्या काही वर्षापासून विरोधी पक्षनेत्याची भुमिका चोख पार पाडत असलेले नाथाभाऊ मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु भाजपच्या वरीष्ठ मंडळींनी त्यांना डावलून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करून तब्बल 11 खात्यांचे मंत्रीपद नाथाभाऊंना दिले. परंतु गेल्या तीन महिन्यात झालेल्या वेगवेगळ्या आरोपांमुळे त्यांना मंत्रीपदांचा राजीनामा द्यावा लागला. यामागेही अंतर्गत राजकारण असल्याचे बोलले जाते. एकंदरीत दादा-भाऊंची व्यथा सारखीच आहे. दोघेही अभ्यासू आणि वरपर्यंत वजन असलेले नेते आहेत. खान्देशाच्या विकासासाठी ते एकत्र आल्यास विकासाची नवीन गाथा उभारू शकतील.

Comments

Popular posts from this blog

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग