मराठी विद्यार्थ्यांची कमाल, मेक्सिकोत बाप्पाची धमाल!

मराठी विद्यार्थ्यांची कमाल, मेक्सिकोत बाप्पाची धमाल!

दहा दिवस साजरा करणार गणेशोत्सव : मेक्सिकन नागरिकांचाही सक्रीय सहभाग

जळगाव - मेरा भारत महान, भारतीय संस्कृती महान. भारतीय सण, उत्सव संस्कृतीचे गुणगान गावे तितके कमीच. परदेशींना तर भारतीय संस्कृतीचे अफाट वेड. खान्देशातील प्रदिप नाहिदे आणि युवराज सातकर हेे विद्यार्थी  पी.एचडी.साठी मेक्सिकोतील गुआनजुआटो विद्यापिठात गेल्या दोन वर्षापासून शिकत आहे. गणेशोत्सवात ‘बाप्पा’ची आराधना करण्याची ईच्छा दोघांच्याही मनात.  मनी निर्धार करून दोघांनी गणेशाची स्थापना केलीच अन् आज मेक्सिकन नागरिकही उत्स्फूर्तपणे बाप्पाची आराधना करीत आहे.
भारतासह जगात अनेक ठिकाणी गणेशोत्सव मोठ्याप्रमाणावर साजरा करण्यात येत असतो. परंतु अनेक देशांमध्ये भारतीयांची कमतरता असल्याने हवा तसा गणेशोत्सव साजरा करण्यात येत नाही. परंतु मेक्सिकोतील गुआनजुआटो विद्यापिठात गेल्या दोन वर्षापासून पी.एचडी करीत असलेल्या जळगाव येथील प्रदिप नाहिदे आणि धुळ्यातील दहिवद येथील युवराज सातकर या दोघांनी गणेशोत्सवाला सुरूवात केली.
मेक्सिकन नागरिकाने दिली मूर्ती
मूळ जळगावातील असलेल्या प्रदिप नाहिदे हे सेंथिसीस ऑफ बायोलॉजीकली अ‍ॅक्टीव नॅचरल कंपाऊंडस् या विषयावर पी.एचडी करीत आहे. गणेशोत्सव साजरा करण्याची इच्छा मनात होती मात्र गणेशमूर्ती आणयची कुठून असा प्रश्‍न त्यांच्या मनात होता. मूर्तीचा शोध सुरू झाला. ईच्छा असेल तेथे मार्ग सापडतो. तेथील ज्युलीयो सेसर नावाच्या एका मेक्सिकन दुकानदार स्वत:कडे असलेली गणेशमूर्ती त्यांना देण्यास तयार झाला.
धुमधडाक्यात ‘बाप्पा’ची स्थापना
गणेशमूर्ती देणार्‍या ज्युलीयो सेसरला भारतीय संस्कृतीची माहिती असल्याने तो देखील गणेशोत्सवात सामील झाला. त्यानंतर जल्लोषात नाचत-नाचत प्रदिप नाहिदे यांच्या खोलीत गणेशाची स्थापना करण्यात आली.
अनेकांची उपस्थिती,
मसाले भाताचा प्रसाद
पहिल्याच दिवशी गुआनजुआटो विद्यापिठाचे प्राध्यापक डॉ.सेसर रोजेलियो यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली. मराठी गणेश आरती मेक्सिकन नागरिकांना म्हणता येत नसतांनाही त्यांनी टाळ्या वाजवून सहभाग घेतला. त्यानंतर उपस्थितांना भारतीय पध्दतीचा मसाला भात प्रसाद म्हणून देण्यात आला. आरतीसाठी डॉ.ऑस्कर, ज्युलाईटा ग्वारा, शैला, मोन्से, रेनॅल्डो, जोसे, पॉओलिना, जेसिक्का, रॉयीस, रोसाल्वा या मेक्सिकन विद्यार्थी आणि नागरिकांची उपस्थिती होती.
दहा दिवस जनजागृती
गणेशोत्सव दहा दिवस साजरा करताना दररोज विदेशी नागरिकांना भारतीय संस्कृतीबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच शेवटच्या दिवशी विधीपूर्वक बाप्पाचे विसर्जन देखील करण्यात येणार आहे.
*भारतीय उत्सव साजरे करणार*
मेक्सिकोमध्ये देखील भारतीय संस्कृतीचे जतन व्हावे, त्यांना भारतीय संस्कृतीचे महत्त्व कळावे, या उद्देशाने यापुढेही मेक्सिकोमध्ये भारतीय सण, उत्सव मोठ्याप्रमाणावर साजरे करण्याचा आमचा निर्धार असल्याचे प्रदिप नाहिदे यांनी सांगितले.
*चीनमध्ये गणेशोत्सव नसल्याची खंत*
चीनमध्ये गणेशोत्सव किंवा इतर काही धार्मिक कार्यक्रम सार्वजनिकपणे साजरे करण्यास परवानगी नाही. काही लोक घरातच गणेशोत्सव साजरा करतात. सार्वजनिक उत्सव नसल्याने आमचा हिरमोड होत असल्याची खंत नोकरीनिमित्त चीनमध्ये असलेल्या हितेश वाणी या तरूणाने व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग