'समाज सहकार्यातून 'समाज उभारणी'

'समाज सहकार्यातून 'समाज उभारणी'

    माझ्या सर्व समाज सदस्यांना नमस्कार. आज जगात वावरतांना प्रत्येक समाजाची एक ओळख आहे. कोणत्याची जातीचा 'शब्द जरी उच्चारला' तरी त्या जातीशी निगडीत 'सर्व चेहरे पटापट नजरेसमोर येतात', पण कधी 'वैश्यवाणी' असा उल्लेख केला तर आपल्या समाजाचे 50 चेहरे तरी लक्षात येतात का? नाहीच येणार. आपल्या वैश्यवाणी समाजाला आज आपणच ओळखत नाही तर जग कसे ओळखणार? हे असंच सुरु राहिले तर कधी एका काळी, देशात 'वैश्यवाणी' सुद्धा होते असे म्हणण्याची वेळ येईल.
    'आपण समाजाचे देणं लागतो' हे आज केवळ एक वाक्य म्हणूनच राहिलंय. आपल्या वडीलधाऱ्यांना समाजातील प्रत्येक कुटुंबाची माहिती होती. समाजाच्या आयोजित प्रत्येक कार्यक्रमाला खेड्यापाड्यातून सर्व समाज एकत्र व्हायचा. परंतु आज 15-20 डोकं सोडले तर कुणीही पुढे येत नाही.
    जळगाव येथील वैश्यवाणी नवयुवक मंडळाने माझ्या माहितीत असलेले एकमेव 'वैश्यवाणी नेते माजी उपमहापौर अनिलकाका वाणी' यांच्या सहकार्याने कांचननगर परिसरात समाज कार्यालयासाठी जागा मंजूर करून आणली. आपल्या समाजातील प्रत्येक कुटुंब, समाजाप्रती जाण असलेले दिग्गज, व्यापारी, उद्योजक, मोठे व्यावसायिक आणि इतर काही समाजसेवक यांच्या सहकार्याने भव्य समाज कार्यालय उभारले. प्रत्येकवर्षी समाज कार्यालयात विविध उपक्रम होऊ लागले, परंतु पुरेशा आर्थिक पाठबळ अभावी समाजकार्यालयाची डागडुजी होऊ शकली नाही.
    मध्यंतरी एक काळ असा आला की, कार्यालय एक ओसाड मैदान, हवेली वाटू लागले. दीड वर्षापूर्वी एका मोठ्या कार्यक्रमानिमित्त पून्हा कार्यालयाची काही प्रमाणात (20%) दुरुस्ती करण्यात आली. आजची स्थिती पहिली असता कार्यालय आहे असे वाटतच नाही. सर्वत्र गवतही फार वाढले आहे.
    गेल्या आठवड्यात मी चेतन वाणी, पंकज भदाणे, भूषण वाणी, चेतन(गुड्डू) वाणी, गजानन वाणी, राकेश वाणी, मुकेश जाधव या युवकांनी पुढाकार घेऊन मोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या 'मोफत आरोग्य शिबिरा'निमित्त कार्यालयाची साफसफाई केली. काही गवत काढले, झाडून सर्व परिसर साफ केला, कार्यालयातील पंखे, इलेक्ट्रिक फिटिंगची दुरुस्ती केली. काही फोटो व्हाट्सअँप ग्रुपवर देखील पोस्ट केले. वेळप्रसंगी रात्री 11 हि वाजले, पण काम केले. त्याचे फळ शिबिर यशस्वी झाले.
    शिबिरानंतर आयोजित बैठकीत पुढील चर्चा करण्यात आली असता पहिलाच मुद्दा ठरला कार्यालयाचा जिर्णोद्धार. (आपले कार्यालय आपल्यासाठी मंदिरच आहे) दुरुस्ती तर करावयाची आहे, परंतु पैसा कुठून आणणार? गंभीर प्रश्न उपस्थित झाला. तासभर खलबते चालल्यानंतर आपण थोडी मदत करावी आणि समाजाला पुन्हा एकदा मदतीसाठी हाक मारावी असे निश्चित करण्यात आले. कार्यालयाचे व्यासपीठ(स्टेज), खिडक्या आणि किरकोळ सुशोभिकारणासाठी जवळपास 20 हजारांचा खर्च अपेक्षित आहे.
    'ईच्छा असते तिथं मार्ग सापडतो'. असे म्हणतात. शिबिराच्या दिवशी व्हाट्सअँपवर टाकण्यात आलेले फोटो आणि आमच्या एका सदस्याने केलेल्या चर्चेतून हितेश अहिरे या युवकाने व्यासपीठ आणि बाजूला लावण्यात येणाऱ्या पर्मनंट, डिझाईन बॅनरचा खर्च करण्याची शाश्वती दिली, तात्काळ अर्धी रक्कम हि दिली.
    सहज बोलण्यातून झालेल्या गप्पांमुळे समाज कार्यालयाच्या सुशोभीकरण कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. समाज कार्यालयात दुरुस्तीसाठी लागणारा खर्च, टेन्टचे साहित्य, भांडे, खुर्च्या, टेबल यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने 'आपण समाजाचं देणं लागतो' या भावनेने त्याच्या परीने (1 ते अमर्याद) रुपयांची अथवा वस्तुंची मदत केल्यास समाज त्यांचा सदैव ऋणी राहील. (स्वतः कमावत्या असलेल्या तरुणांकडून अधिक आणि स्वतःहून मदतीची अपेक्षा)
     आपण दिलेल्या प्रत्येक पैशाचा हिशोब (ताळेबंद) मागाल तेव्हा आपल्याला देण्यात येईल. कधीकाळी आमच्या वडीलधाऱ्यांनी शहरातील 250 आणि राज्यातील हजारो कुटुंबाशी संपर्क साधून सहकार्यासाठी आवाहन केले, आज आम्ही करणार. सुरुवात माझ्या या ब्लॉग वरूनच...! 

"चला समाज सहकार्यातून पुन्हा समाज उभारणी करूया"


चेतन अरुणा रविंद्र वाणी, जळगाव
9823333119, 8855000643

Comments

Popular posts from this blog

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग