गुरू परंपरा आणि माझे मत

गुरू परंपरा आणि माझे मत 

वाणी समाजातील सध्या वैश्य, वळंजू या नावांनी ओळखल्या जाणार्या आपल्या समाजाला शाप देण्यात आला असल्याने अनेक वर्षापासून गुरू नव्हते. परंतु, सन 2004 पासून आपल्या समाजाला श्री संस्थान हळदीपुर शांताश्रम मठाधिपती परमपुज्य श्री श्री वामनाश्रम महास्वामी गुरू म्हणून मिळाले. गुरू असल्यास समाजाचा विकास निश्चित होते असा आजवरचा अनुभव आहे. प्रत्येक समाजाला एक गुरू आहेत त्यामुळे आपल्या समाजालाही गुरू असावेत अशी धारणा अनेकांची झाली प्रामुख्याने आपल्या वडीलधार्यांनी यावर लागलीच विश्र्वास ठेवला. मुळात आपण वैश्यवाणी असल्याने आपल्याला गुरू नव्हते ही धारणाच चुकीची आहे. वैश्यवाणी हे इतर वाणी बांधवांपेक्षा वेगळे नसल्याने आपण त्यांच्याप्रमाणे 'संत तुकाराम' यांना आपले गुरू का मानले नाही. त्यांच्याप्रमाणे मोठ्याप्रमाणावर संत तुकाराम महाराज जयंती व तुकाराम बीजोत्सव का साजरा केला नाही असा प्रश्न मला पडतो.
    मुळात मी लहान असल्यापासून जळगावात मला संत तुकाराम हे आपले समाजगुरू आहेत हे माहितीच नव्हते परंतु मी 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नंदुरबार येथे दंडपाणेश्र्वर महादेव मंदिरात आयोजित गुणवंत गौरव सोहळ्यासाठी गेल्यानंतर त्याठिकाणी मान्यवरांनी संत तुकारामांच्या प्रतिमेचे पुजन केल्यावर संत तुकाराम महाराज आपले समाजगुरू असल्याचे मला समजले. जळगाव येथील वैश्यवाणी नवयुवक मंडळाच्या प्रसिध्दीपत्रावरही अगोदर संत तुकारामांचे चित्र होते परंतु अलीकडच्या काळात आलेले प्रसिध्दीपत्रक पाहून मी अवाकच्‌ झालो कारण त्यावर वामनाश्रम स्वामींचे चित्र होते.
    आठवण आठवली म्हणून पुन्हा मुळ मुद्यावर येवूया, समाजाला नवीन गुरू मिळाल्यानंतर समाजाचा विकास होण्यास सुरूवात झाली हे वाक्‍य अलीकडच्या काही काळात वारंवार माझ्या कानी पडत आहे. मुळात समाजाचा 2004 नंतर विकास कसा झाला? हे आपण आधी पाहूया. सन 2004 पूर्वी म्हणजेज सन 1950 ते 2000 दरम्यान तंत्रज्ञान फारसे विकासित नसल्याने आपल्या समाजातील सर्व बांधव नोकरी, अभ्यास ऐवजी व्यवसायाकडे अधिक प्रमाणात वळत होते. आपल्या वडीलधार्यांमध्ये शिक्षणाप्रती आवड नव्हती किंवा असलीच तर घरची परिस्थिती जेमतेम असल्याने ते चांगले व उच्च दर्जाचे शिक्षण घेवू शकत नव्हते. त्यामुळे ते अप्रगत गटातच मोडले गेले. सन 2000 नंतर जगात तंत्रज्ञानाची क्रांती होण्यास सुरूवात झाली आणि आज आपण सर्वचजण सहजरित्या मिरवत असलेले मोबाइल आणि जवळपास सर्वांकडे असलेले कॉम्प्युटर आपल्याला परिच्तित झाले. आपल्या वडीलधार्यांना चांगले शिक्षण घेता न आल्याने ते आज जगत असलेले मध्यमवर्गीयाचे जीवन आपल्या पाल्यांच्याही नशीबी येवू नये हि चिंता त्यांना सतावत असल्याने त्यांनी स्वतच्या जिवाचे रान करून आपल्याला चांगले शिक्षण, हव्या त्या सुखसोयी, महागड्या शिकवण्या देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परिणामी आज सन 2010 नंतर आपल्या वैश्यवाणी समाजातील प्रत्येक मुलगा-मुलगी किमान 10वी उत्तीर्ण असून अभियांत्रिकी, वैद्यकीय, सीए, उद्योग यासह इतर शासकीय क्षेत्रामध्ये नोकरीसाठी उपयोगी पडणारे शिक्षण प्रत्येकाने घेतले आहे.
    मी मांडलेला वरील मुद्दा प्रत्येकाने पुन्हा एकदा मनापासून वाचल्यास मी नमूद केलेली व्याख्या केवळ वैश्यवाणी समाजासाठीच नाही तर इतर प्रत्येक समाजासाठी लागू पडते. विश्र्वास नसेल तरी तुम्ही इतर समाजातील एखाद्या जेष्ठ नागरिकाला विचारा तोच तुमच्या मनातील शंकेचे समाधान करेल.
    आजही आपल्या समाजातील अनेक तरूण बेरोजगार असून अनेकांना व्यवसाय उभारणीसाठी पैशांची आवश्यकता आहे. समाजकार्य करताना स्वार्थ बाजूला ठेवावा लागतो परंतु प्रत्येकाला स्वतचेच भले करण्याचा नाद लागला आहे. समाजाशी आज कोणालाही काही देणे घेणे नाही. आपल्या समाजाला वामनाश्रम स्वामीजी मिळाल्यानंतर सर्वत्र त्यांच्या नावाचा उदोउदो करण्यात आला. ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी कार्यक्रम घेण्यात आले यावेळी मोठ्याप्रमाणावर देणगीही गोळा करण्यात आली. एरव्ही एखाद्या सामाजिक कार्यासाठी देणगी न देता समाजाला शिव्या घालणार्यांनीही या कार्यक्रमासाठी मोठ्याप्रमाणावर सढळ हाताने मदत केली. तरूणांचा उत्साह दांडगा असल्याने कार्यक्रमही मोठ्या थाटात पार पडले. सर्व चांगले झाले असतांनाही माझ्यासह अनेकांच्या मनाला हे कार्यक्रम खटकले, काहींनी तर थेट टिकाही केली. एका ठिकाण झालेल्या कार्यक्रमासाठी केवळ 50 हजार रूपये जरी आपण खर्च झाले असे आपण समजलो तर फक्‍त खान्देश आणि नाशिक मिळून जवळपास 2 लाख रूपये खर्च झाले असतील. गुरू आलेत 2 दिवस थांबले आणि निघून गेले. पुन्हा समाजबांधव आपल्या नित्यनियमाच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त झाले. जळगावचेच उदाहरण घेतले तर केवळ 250 घरे असलेले समाजबांधव 50 हजार रूपये या कार्यक्रमासाठी देवू शकतात तर समाजाच्या सर्वागींण विकासासाठी नक्कीच 1 लाख रूपये देणगी देतील. गुरू आल्यानंतर समाजाला देणगी तर मिळाली परंतु ती गुरूंच्या पथ्थ्यावर पडली.
    माझे विचार वाचून अनेकांना प्रश्न पडला असेल की, हा मुलगा किती नास्तिक आहे. मुळात मी नास्तिक नाही किंवा वामनाश्रम स्वामींच्या विरूध्दही नाही. प्रत्येकाने गुरूचा आदर करावा. भगवान दत्तगुरूंनी ज्याच्याकडून काही शिकायला मिळाले त्याला स्वतचा गुरू समजले. वामनाश्रम स्वामींच्या कार्यक्रमासाठी आपण प्रत्येक विधीसाठी आपल्या शारिरिक श्रमांसह पैसाही खर्च करीत असतो. वामनाश्रम स्वामींच्या कार्यक्रमाप्रसंगी जमा होणार्या निधीपैकी त्यांनी समाजासाठी 60 टक्के निधी दिल्यास त्याच निधीतून समाजाचा नक्की विकास करता येइल असे माझे स्पष्ट मत आहे. समाजाचे काम आहे, काही-काही बोलू नये, सर्व समजून घ्यावे लागते, वाहत्या प्रवाहाच्या दिशेने काम करायचे असते असे माझे आइ-आप्पा नेहमी मला सांगतात. मी कधी कधी त्यांचे शांतपणे ऐकतो तर कधी वादही होतात. पण काय करणार तरूण रक्‍त नेहमी स्वतचेच विचार मांडणार.
    सर्वांच्या माहितीसाठी मी गेल्या तीन महिन्यापासून समाजाच्या काहीतरी कामांसाठी माझा वेळ कसा देता येइल याचा विचार करून माझ्या वडीलधार्यांचा आशिर्वाद आणि मार्गदर्शन घेवून तरूण बांधवांच्या मदतीने धडपड करीत आहे. आज प्रथमच मी माझे मत समाजासमोर स्पष्टपणे मांडले. त्यामुळे आपणास माझे विचार आवडले असल्यास तसे समर्थन करावे किंवा आवडले नसल्यास तेही मला सांगावे. आपल्या उत्तराचे मी नेहमी स्वागतच करेल.
संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी भेट द्या
http://tukaram.com/marathi/marathi.htm
आपलाच...

चेतन वाणी
9823333119

Comments

Popular posts from this blog

पोलिसात जुगाड पाहिजेच.. बहीण, चिमुकल्यांचा चेहरा पाहून तरळले आनंदाश्रू!

कुठं हरवली खाकी? प्रत्येक पोलीस ठाण्यात हवे 'अण्णा-बापू'

पोलीस अधिक्षकांच्या गणरायाला साऊथ इंडियन नैवेद्याचा भोग