Sunday 4 February 2024

पोलीस, राजकारणी, पत्रकार, जनतेचा मित्र.. एम.राजकुमार (IPS)

पोलीस, राजकारणी, पत्रकार, जनतेचा मित्र.. एम.राजकुमार (IPS)


चेतन वाणी - एखाद्या पत्रकाराने पोलिसाचे कौतुक करणे म्हणजे नवलच.. गावभरात पोलिसांविषयी ओरड होत असतांना आपण एखाद्या अधिकाऱ्याचे कौतूक करणे म्हणजे दुखावलेल्या आत्म्यांच्या आगीत तेल ओतण्यासारखेच काम आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत जळगाव जिल्हा तसा नशीबवानच ठरला आहे. जिल्ह्याला एक तपापासून लाभलेले जवळपास सर्वच अधिकारी एखादे व्यक्तिमत्व सोडले तर सर्वच चांगलेच होते. विशेषतः पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे आणि पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी पोलीस, राजकारणी, पत्रकार, जनतेच्या मनात निर्माण केलेली जागा एका मित्रापेक्षा कमी नाहीच.

     जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांचा एक तपाचा नामफलक पाहिला तर महाराष्ट्रीयन आणि दक्षिणेतील अधिकारी असा संमिश्र राहिला आहे. गेल्या बारा वर्षात जिल्ह्याने ७ पोलीस अधीक्षक पाहिले. कुणी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी लकी ठरले तर कुणी पोलिसांनाच खाक्या दाखविला. कोरोना काळात लाभलेले पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे हे बहुतांश काळ जनतेच्या संपर्कात असल्याने त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. अनेक कार्यक्रमात त्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला. पहिल्यापासूनच सर्वांच्या संपर्कात असल्याने डॉ.प्रवीण मुंढे हे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह जनतेत चांगलेच लोकप्रिय ठरले. आपला २ वर्षाचा कार्यकाळ त्यांनी कोणतेही मोठे विघ्न न येऊ देता पार पाडला.

     डॉ.प्रवीण मुंढे यांच्यानंतर पोलीस अधीक्षक म्हणून एम.राजकुमार यांनी पदभार स्विकारला. राजकुमार यांच्याबद्दल ऐकून असलेली प्रतिमा काहीशी वेगळी आणि कणखार अधिकारी अशी असल्याने सुरुवातीला त्यांच्याशी ओळख झाली नाही. साधारणतः महिनाभराने पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याशी परिचय झाला. पहिल्या भेटीतच एम.राजकुमार साहेबांनी दिलेला वेळ आणि आपल्या कार्यापद्धतीची स्पष्टता दिली. रस्त्यावर उतरून हातात काठी घेत सिंघम बनायची मला हौस नाही मात्र कुणाला कसे ठिकाणावर आणायचे हे मला चांगलेच माहिती आहे असे ते बोलले. आमच्या खात्यात प्रत्येक काम करायला वेगवेगळे खाते असून त्यामाध्यमातून कायदा व सुव्यवस्था कायम राखता येईल असा विश्वास साहेबांनी दिला.

     पहिल्या भेटीनंतर साहेबांशी वारंवार भेटी होऊ लागल्या. केवळ खात्याशी निगडीत चर्चा न होता कौटुंबिक आणि अवांतर गप्पा होऊ लागल्याने एक मैत्रीचे नाते तयार झाले. एखाद्याबद्दल मत जाणून घ्यायचे असेल किंवा सामाजिक, राजकीय आढावा घ्यायचा असेल तर साहेब हक्काने विचारू लागले. काही दिवसातच साहेबांनी आपल्या कामातून आपली प्रतिमा आणि खरे रूप दाखवून दिले. वर्षभरात ‘अब तक छप्पन’चे टार्गेट घेऊन कामाला लागलेल्या एम.राजकुमार साहेबांच्या कार्यकाळात आजवरचे सर्वाधिक म्हणजे ५६ एमपीडीए साहेबांच्या कार्यकाळात झाले. ‘अब तक छप्पन’ या आकड्यामुळे जळगाव जिल्हा पोलीस प्रशासन राज्यात एक नंबरवर आहे.

     पोलीस अधीक्षक एम.राजकुमार हे प्रचंड शिस्तप्रिय आणि फारशे बोलणारे नाही अशी त्यांची ऐकीव प्रतिमा असल्याने अनेकांच्या मनात ती कायम राहिली मात्र साहेबांना ज्यांनी जवळून ओळखले त्यांनाच ते कळले. विशेषतः कर्मचाऱ्यांनी त्यांना चांगलेच ओळखले. नाशिक परिक्षेत्र विभागीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने पोलीस खेळाडूंनी साहेबांना जवळून पाहिले. साहेब फार रागीट आहेत, वेळेतच कामे बघतात, अडचणी समजून घेत नाही, कुणाशी फारशे बोलत नाही अशा बऱ्याच गोष्टी साहेबांबद्दल ऐकून असले तरी प्रत्यक्षात मात्र ते एक उत्तम अधिकारी आणि एक चांगला मुलगा, पती, वडील आणि जावई आहेत. आपल्या दररोजच्या वेळेतून वेळ काढत ते कुटुंबाला वेळ देतच होते. कुटुंबासोबतच्या वेळेत ते शक्यतो तडजोड करीत नाही. काहींना आपल्याप्रमाणे ऐकणारा आणि दिवसरात्र कार्यालयात बसून राहणारा अधिकारी आवडतो मात्र एम.राजकुमार साहेब ज्या-त्या बाबीसाठी काढलेला वेळ त्याच वेळेला देत होते.

     पत्रकारितेच्या निमित्ताने नेहमी भेटतांना साहेबांनी अनेक गोष्टी आमच्याशी शेअर केल्या. बऱ्याच तर ‘ऑफ द रेकॉर्ड’ संज्ञेत मोडणाऱ्या तर कितीतरी गोष्टी कौटुंबिक होत्या. दूरदृष्टी, सरळ वागणे, नियमांशी तडजोड न करणारे, युवक, समाज, देशाचे हित जोपासणारे, कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणजे एम.राजकुमार साहेब. आपल्याला भेटायला येणाऱ्या व्यक्तींना साहेब फारसा वेळ देत नाही अशी काहींची तक्रार असेल मात्र आजवर जेव्हा जेव्हा आम्ही साहेबांना भेटायला गेलो तेव्हा तेव्हा साहेबांनी भरभरून गप्पा केल्या. बऱ्याचदा तर साहेबांच्या कार्यालयीन स्टाफला देखील आम्ही आल्यावर संकट पडायचे हे आले आता तर केव्हा बाहेर पडणार काय माहिती? इतकचं काय तर कालच अमळनेर दौरा आटोपून साहेब कार्यालयात आले आम्ही सहज भेटीसाठी गेलो तरी आमच्या गप्पा तासभर रंगल्या.

      अवघ्या १४ महिन्यांच्या काळात एम.राजकुमार साहेबांनी आपल्या शिस्तप्रिय स्वभावाची जाणीव करून देत अनेकदा अधिकारी, कर्मचाऱ्यांना देखील सांभाळून घेतले. साहेबांच्या कार्यकाळात कुणावर अन्याय झाला असेल असे मला तरी नाही वाटत. जिल्ह्यातील एखाद राजकारणी सोडले तर इतर कुणीही साहेबांबद्दल काही तक्रार केली नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील नागरिकांशी त्यांनी चांगले जुळवून घेतले. पदभार घेतल्यानंतर सुरुवातीच्या काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीमुळे वाढलेले वाद, निलंबीत पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले प्रकरण, अधिवेशनात अवैध धंद्यावरून झालेले आरोप, चाळीसगाव खंडणी प्रकरण, बीएचआर प्रकरण, मोठमोठ्या घरफोडी, दरोडे, लुट, खून प्रकरण साहेबांनी उत्कृष्टपणे हाताळले. जिल्ह्यात सर्व सणोत्सव शांततेत पार पडले आणि गुन्हेगारी हटावच्या मायक्रो नियोजनामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली. 

      जिल्ह्यात नव्याने येणारे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना देखील मावळते पोलीस अधीक्षक एम.राजकुमार हे आपल्या यशस्वी कारकीर्दीच्या टिप्स देतील आणि सोलापूर शहर आपल्या दमदार कामगिरीने गाजवतील यात शंका नाही.

भविष्यातील सर्व यशस्वी कारकिर्दीसाठी एम.राजकुमार साहेबांना शुभेच्छा..!

Sunday 17 December 2023

गौसेवा : दारात, घरात नव्हे थेट किचन, बेडरूममध्ये गाय, कुत्रे..

गौसेवा : दारात, घरात नव्हे थेट किचन, बेडरूममध्ये गाय, कुत्रे..

चेतन वाणी - जळगाव शहर, सुशिक्षित कुटुंबीय, भले मोठे मन आणि भले मोठे घर.. प्राणीमात्रांवर दया दाखविताना कर्णासारखे उदार मन ठेवणाऱ्या भुसारी कुटुंबियांनी गौसेवेचा एक उत्तम आदर्श समाजासमोर ठेवला आहे. २० गाय-वासरू, ५० कुत्र्यांना आपल्या अंगणात, घरात आणि थेट किचन, बेडरूममध्ये मुक्त संचार करू देणाऱ्या भुसारी कुटुंबाची एक आगळीवेगळी कहाणी, विचार ऐकल्यास आपल्याला देखील गौसेवेचा मोह आवरल्याशिवाय राहणार नाही. आजच्या कलियुगात देखील असे कुणी असावे हे आश्चर्यच आहे. चला तर मग जाणून घेऊया..

भारतात आणि विशेषतः हिंदू धर्मीयांमध्ये गायीला गोमातेचा दर्जा देण्यात आला आहे. समाजात फार पूर्वीपासून गाईचे महत्व अनमोल राहिले आहे. गाईपासून मिळणारे गोमुत्र, दूध, शेण सर्वच मनुष्य आणि निसर्गासाठी प्रचंड फायदेशीर आहे. कलियुगात गोहत्येचे प्रमाण वाढले आणि अनेक ठिकाणी कत्तलखाने सुरु झाले. भाजप सरकारच्या काळात गोरक्षणार्थ कायदा तयार झाला. कायद्याच्या अनुषंगाने गो हत्या रोखण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी आजही ते शक्य झालेले नाही. काळानुरूप गौसेवेचे महत्व पुन्हा अधोरेखित होऊ लागले असून गोपालन करण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. गौसेवा आणि भूतदया करण्याच्या उद्देशाने सेवाकार्याला लागलेल्या भुसारी कुटुंबाची दिनचर्या आणि सेवाधर्म आपण सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे.

लहानपणापासूनच्या आवडीने कुटुंबियांना देखील लावला लळा..

जळगावातील एक प्रसिद्ध नाव म्हणजे ॲड.केदार किशोर भुसारी. लहानपणापासून केदार यांना गोसेवेची आवड होती. समजूतदारपणा आल्यानंतर केदार यांनी रिंगरोड येथील आपल्या फ्लॅटमध्ये दोन गायी पाळल्या होत्या. रिंगरोड सोडल्यानंतर बळीरामपेठेत स्थायिक झाल्यावर आपली गोसेवा सुरु ठेवण्यासाठी त्यांनी घराच्या छतावरच गोठा उभारला. मनात जागा असेल तर घरात जागा मिळतेच.. हेच त्यांचे ब्रीद त्यांनी कायम ठेवले. छत्रपती शिवाजी महाराज नगरातील नवीन घरात स्थलांतरित झाल्यावर केदार यांनी आपले कार्य आणखी वाढविले. केदार यांच्या गोप्रेमामुळे पत्नी अंजली आणि मुलगा कार्तिक यांना देखील त्याचे वेड लागले होते. शिवाजी नगरातील घरात देखील केदार भुसारी यांनी गायी, कुत्रे पाळणे सुरु ठेवले. 

किचन, बेडरुममध्ये मुक्त संचार, महिन्याला लाखभर खर्च

केदार भुसारी यांच्या कुटुंबात गौसेवेचे कार्य मनापासून आणि आवडीने कुणी पार पाडत असेल तर त्यांची पत्नी अंजली. स्वतः सुशिक्षित असल्याने आपल्या आवडी आणि भूतदयेचा धर्म त्यांनी पाळला आहे. अंजली या घरात काम करीत असताना गायींचा मुक्त संचार त्यांच्या घरात असतो. कोणतीही गाय कामात व्यत्यय आणत नाही. घरात खाण्याची सोय गायींसाठी केली जाते. केदार भुसारी दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असल्याने गाय, कुत्र्यांच्या देखभालीची सर्व जबाबदारी अंजली आणि मुलगा कार्तिक पार पाडतात. सकाळ, दुपार, संध्याकाळ तीन वेळ गाईंचे खाणे, पिणे करणे. वेळोवेळी लसीकरण आणि  इतर जबाबदारी त्या योग्यरीतीने सांभाळतात. आपण प्राण्यांना प्रेम दिले तर ते देखील आपल्याला लळा लावतात हे आपल्याला भुसारींच्या  घरात पाहायला मिळते. सर्वांचे खाणे, पिणे, लसीकरण आणि इतर किरकोळ बाबींसाठी महिन्याला साधारणतः लाखभर रुपयांचा खर्च होतो.

तीन फुटांची पुंगुरू गाय, ५० कुत्र्यांची भरते शाळा..

भुसारी यांच्या शिवाजी नगरातील घराच्या बाजूला एक मोठे पटांगण केवळ गायी आणि कुत्र्यांसाठी मोकळे ठेवण्यात आले आहे. समाजाने सोडलेले कुत्रे आणि आजारी गायी देखील ते उपचारार्थ घरी घेऊन येतात. नुकतेच दोन कुत्र्यांवर त्यांनी कर्करोगाची शस्त्रक्रिया देखील केली. कर्नाटक आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवर आढळणाऱ्या केवळ ३ फुट उंची असलेल्या ८ पुंगुरू प्रजातीच्या गाई त्यांच्याकडे आहेत. तसेच काठेवाडी, गीर आणि देशी अशा २० गायी. सेंड बर्नार्ड, लॅब्रेडीयन, रॉट विलर व उपचारार्थ आणलेले कुत्रे असे ५० कुत्रे आहेत. भूतदयेच्या कार्यासाठी भुसारी कुटुंबियांना घरात घरकाम करणाऱ्या राधाताई आणि त्यांची मुलगी प्रीती यांची मदत होते. जनावरांच्या उपचारार्थ डॉ.मिलींद पाटील, डॉ.मनीष बाविस्कर, डॉ.प्रवीण पाटील, भाग्येश आणि शुभम यांचे सहकार्य लाभत असते. 

सौरक्षण संस्थेच्या माध्यमातून पुढे नेणार कार्य..

केदार भुसारी हे आपले गोरक्षण आणि भूतदयेचे कार्य भविष्यात देखील आणखी पुढे घेऊन जात देशभरात नवा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. सौरक्षण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पुढील सर्व कार्य पार पाडले जाणार आहे. एकीकडे लोक देखावा करण्यासाठी गोपालन, पशु पालन करतात मात्र भुसारी कुटुंबीय मनापासून सेवा करतात. केवळ पालन पोषण करणे नव्हेच तर त्यांची देखभाल आणि सोयसुविधा ठेवण्यात देखील त्यांनी कुठे कमी पडू दिलेली नाही. गौसेवेचे महनीय कार्य भविष्यात देखील आणखी वाढेल आणि घरोघरी एक तरी गाय असेल असा विश्वास केदार भुसारी आणि कुटुंबियांनी व्यक्त केला. 

- चेतन रविंद्र वाणी, जळगाव

मो.9823333119, 7020588288

Saturday 16 December 2023

‘शिवमहापुराण’ कथेचे महासेवेकरी ‘पोलीस’च..

‘शिवमहापुराण’ कथेचे महासेवेकरी ‘पोलीस’च..



चेतन वाणी - जळगाव जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाची परीक्षा पाहणारा आजवरचा सर्वात मोठा सोहळा नुकतेच पार पडला तो म्हणजे वडनगरी शिवारातील पंडित प्रदीप मिश्रा यांचा शिवमहापुराण कथा सोहळा. कथेच्या निमित्ताने भक्तीचा जागर झाला, लाखो भाविक भक्तिरसात न्हाऊन निघाले, रात्रीची कडाक्याची थंडी, दिवसाचे ऊन सहन करीत भाविकांनी कथेचा लाभ घेतला. भाविकांच्या सेवेसाठी हजारो सेवेकऱ्यांनी सेवा बजावली मात्र खरे सेवेकरी होते ते पोलीस. तहान, भूक विसरून, पुरेशी झोप न घेता दिवसभर रस्त्यावर उभे राहून पोलिसांनी बजावलेल्या चोख कर्तव्यामुळे शिवमहापुराण कथा सोहळा कायदा व सुव्यवस्था राखत पार पडला. एरव्ही सण, उत्सव वेशीवर टांगून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या शिस्त, माणुसकीचे रूप जळगावात पाहायला मिळाले. 



प्रख्यात कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी संपूर्ण देशातील भक्तांना ‘एक लोटा जल सारी समस्या का हल’ हा मंत्र देत भगवान भोले बाबाच्या भक्तीचा मार्ग दाखवला. देशभर सध्या पंडित प्रदीप मिश्रा आणि बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्याच नावाचा बोलबाला आहे. जळगाव तालुक्यातील वडनगरी गावाजवळ श्री बडे जटाधारी मंदिराचे विश्वस्त असलेल्या चौधरी कुटुंबियांनी वर्षभरापूर्वीच पंडित मिश्रा यांच्या कथेसाठी वेळ निश्चित केली होती. जळगावात कथा होणार आणि साधारणतः ८ लाखांपेक्षा अधिक भाविक येणार असा अंदाज वर्षभरापासूनच व्यक्त केला जात होता.



जळगावात कथा होण्याच्या काही महिने अगोदर मालेगाव तर काही दिवस अगोदरच धुळे आणि नाशिक येथे कथा झाली. तिन्ही ठिकाणी भाविकांच्या येण्या-जाण्याचे अनेक मार्ग उपलब्ध होते तर भाविकांची व्यवस्था देखील चोख होती. जळगावात देखील भाविकांच्या व्यवस्थेच्या दृष्टीने आयोजकांनी नियोजन केले होते. विविध समित्या देखील गठीत केल्या, पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी देखील कथास्थळी भेट देत सूचना केल्या. सर्व नियोजनरित्या सुरु असले तरी पूर्वी अनुभव नसल्याने नको तो घोळ होतोच आणि हौशेनौशे स्वयंसेवक ऐनवेळी पसार होत असल्याने देखील नियोजन कोलमडते. जळगावात देखील पहिल्या दिवशी तसेच काही झाले मात्र ‘बाबा सब देख लेंगे’ म्हणत सर्व निर्विघ्नपणे पार पडले. 


पंडित प्रदीप मिश्रा यांची कथा दि.५ डिसेंबर रोजी सुरु होणार होती. तत्पूर्वी जळगाव जिल्हा प्रशासनाने अनेक बैठका घेतल्या आणि प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित करून दिली. कथेच्या पूर्वसंध्येलाच कथास्थळी लाखभर भाविक येऊन बसले. कथेचा कार्यक्रम खाजगी असला तरी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जवळपास ७०० पोलीस अधिकारी, कर्मचारी व ६०० होमगार्ड यांची नियुक्ती केली होती. जळगाव विभागात कथा असल्याने पोलीस अधिक्षकांसोबत मुख्य जबाबदारी होती ती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांची. सुरुवातीपासूनच्या सर्व नियोजनात दोघांचा सहभाग होता मात्र कथेच्या काही दिवस अगोदरच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची बदली झाली आणि अशोक नखाते यांनी जबाबदारी स्वीकारली. ज्याठिकाणी पोलिसांची गरज नसते मात्र त्याठिकाणी पोलिसांनी पुढाकार न घेतल्यास नंतर पोलिसांनाच धावपळ करावी लागते हा मूलमंत्र ध्यानी ठेवत पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी नियोजन केले.



जळगावात कथेच्या ठिकाणी भाविकांना जाण्यासाठी एकच मुख्य मार्ग असल्याने शहरातील प्रमुख चौक ते कथा स्थळापर्यंत टप्प्याटप्प्यावर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात होते. पहिल्या दिवशी सकाळपासून दुपारपर्यंत सर्व नियोजनाप्रमाणे सुरु होते मात्र कथा संपली आणि भाविक एकाच वेळी बाहेर पडल्याने पोलिसांचे नियोजन कोलमडले. नियोजन कोलमडले असले तरी पोलिसांनी आपल्या कर्तव्याहून पळ न काढता परिस्थितीला सामोरे गेले. पायी येणारे भाविक आणि वाहनधारक यांच्यामुळे कोंडी होत असल्याने पोलीस अधीक्षक यांनी इतरांची वाट न पाहता रस्त्याच्या कडेला उभे असलेले एक ट्रक्टर रस्त्यावर आडवे लावले आणि एका बाजूची वाहतूक रोखली. गर्दीत एका वाहन चालकाने अधिक्षकांच्या वाहनाला देखील धडक दिली. रस्त्यावर जिकडे तिकडे केवळ पोलीसच आपली जबाबदारी पार पाडत होते तर इतर विभाग मात्र कुठेच दिसेनासे होते. प्रशासनातील इतर विभागांचे अधिकारी तर सोडाच कर्मचारी देखील जागेवर नव्हते. भाविकांच्या गर्दीत गरजूंना मदत करण्यापासून ते वृद्धांना रुग्णालयात पोहाचाविण्यापर्यंत पोलिसांनीच सेवा बजावली. सकाळी ७ वाजत रस्त्यावर उतरलेले पोलीस रात्री १ वाजता सर्व रस्ते मोकळे केल्यावर घरी गेले. दिवसभरात पोलिसांना कुणीही जेवण आणि पाण्यासाठी विचारले नाही हि फार मोठी शोकांतिका आहे. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या पोलिसांनी देखील आपले कर्तव्य चोख बजावले आणि हे कौतुकास्पद आहे. 



पहिल्या दिवशी भुकेने व्याकूळ पोलिसांनी शेव, मुरमुरे, वेफर्स, कुरकुरे खाऊन आणि पाणी पीत एखाद्या कान्याकोपऱ्यात आपल्या पोटाला आधार देताना मी स्वतः पाहिले. पहिल्या दिवशी रात्री ११.१५ वाजता पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची संपूर्ण अधिकाऱ्यांसह के.सी.पार्क जवळील पेट्रोल पंपावर भेट झाली असता त्यांनी आम्हाला जेवण झाले का म्हणून विचारणा केली. आम्ही होकार दिला आणि तोच प्रतिप्रश्न त्यांना केला असता ‘हमारे लोक खाली पेट खडे है भाई, मै कैसे खा सकता हू’ असे उत्तर त्यांनी दिले. कर्मचाऱ्यांची जाण ठेवणारे पोलीस अधिकारी जळगावकरांना मिळाले हे आपले नशीब. 



पहिल्या दिवशी लाखो भाविकांना ९ किलोमीटर पायपीट करावी लागली, अनेकांना गर्दीने भोवळ आली, रिक्षा चालक, वाहन मालकांना गर्दीत ५ तास अडकून राहावे लागले आणि सर्वांनी गैरसोयीचे खापर पोलिसांवरच फोडले. मुळात पोलिसांनी आपली जबाबदारी चोख बजावली हे कुणी पहिलेच नाही, फक्त नेहमीप्रमाणे पोलिसांना टीकेचा धनी केले. गर्दीचे नियोजन करण्याची जबाबदारी होती आयोजकांची. स्वयंसेवकांच्या मदतीने वेळीच रस्ता मोकळा केला असता तर लवकर मार्ग मोकळा झाला असता. पोलीस होते म्हणून तरी सर्व भाविक सुखरूप आणि रात्री १२ च्या आत घरी पोहचले नाहीतर काही अनुचित प्रकार घडला असता किंवा मोठा गोंधळ उडाला असता हे नक्की.



मालेगाव, धुळे, नाशिक येथील कथेत गर्दीचा फायदा घेत सक्रीय होणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचारी साध्या वेशात गर्दीत गस्तीवर होते. भाविकांना दागिने, पैसे, मौल्यवान ऐवज आणू नका अशा सूचना केलेल्या असतांना देखील भाविकांनी दुर्लक्ष केले आणि पहिल्याच दिवशी डझनभर भाविकांना त्याचा भुर्दंड सहन करावा लागला. पोलीस होते म्हणूनच पहिल्या दिवशी एक-दोन नव्हे तर तब्बल २७ महिला चोरट्यांची आणि दोन दिवसांनी १३ पुरुष चोरट्यांची आंतरराष्ट्रीय टोळीच्या मुसक्या आवळण्यात जळगाव पोलीस दलाला यश आले. जळगावात चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने दुसऱ्या दिवसापासून होणाऱ्या चोऱ्या टाळण्यात जळगाव पोलिसांना यश आले. आजवर देशभरात कुठे नव्हे तर जळगावात जिल्हा पोलिसांच्या नियोजनामुळेच हे शक्य झाले. कदाचित यामुळे पुढे होणाऱ्या कथेच्या ठिकाणी पोलीस आणि आयोजक अधिक सतर्क राहतील.



पहिल्या दिवशी पोलिसांच्या नियोजनाचा फज्जा उडाल्याने दुसऱ्या दिवसापासून पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी नियोजन बदलले आणि ते शेवटच्या दिवसापर्यंत यशस्वी ठरले. कथेला भेट देणाऱ्या लोकप्रतिनिधी, मान्यवरांच्या सोयीपासून भाविकांची गैरसोय होऊ नये याचे सर्व नियोजन पोलिसांनी केले. दि.६ ते १० पोलिसांचे सर्व नियोजन योग्य ठरले. टॉवर चौकात, १०० फुटी रस्त्यावर, शिवाजीनगर भागात एकेरी मार्ग सुरु असल्याने अनेक नागरिकांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस सर्वांना हात जोडून विनंती करीत दुसऱ्या मार्गाने जाण्यास सांगत होते. कथास्थळी जाणाऱ्या बस, रिक्षा, खाजगी वाहने यांचे मार्ग आणि वेळ निश्चित केलेली असल्याने पोलिसांचे नियोजन परफेक्ट ठरले. शेवटच्या दिवशी भाविक गर्दीचा रेकॉर्ड मोडणार अशी शक्यता असल्याने पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी कुणीही जागा सोडू नये अशा सूचना पोलिसांना दिल्या होत्या. कर्मचाऱ्यांची खाण्यापिण्याची गैरसोय होऊ नये म्हणून सर्वांना जागेवर खिचडी, पाववडा आणि पाण्याची व्यवस्था करून देण्यात आली. पोटाला आधार मिळाल्याने दिवसभर उभे राहणाऱ्या इच्छेला देखील आधार मिळाला. कथा दरम्यान पोलीस हा पोलीस म्हणूनच सेवा देत होता. सेवा बजावताना ना जात आडवी आली ना धर्म. कुणीही भेदभाव केला नाही किंवा कर्तव्यात कसूर केली नाही. प्रत्येक पोलीस आणि होमगार्ड यांनी केवळ आपले कर्तव्य बजावले.



खाजगी कार्यक्रमासाठी किंवा वैयक्तिकरित्या पोलीस बंदोबस्त हवा असल्यास साधारणतः प्रति कर्मचारी १५०० रुपये खर्च येतो. कथेच्या बंदोबस्तासाठी सर्व पोलिसांनी विनामूल्य सेवा बजावली. विशेष म्हणजे ७ दिवस कथेसाठी बंदोबस्त बजावणाऱ्या पोलिसांना आपले नियमीत कामकाज, तपास देखील पूर्ण करणे आवश्यक होते. वेळात वेळ काढत सर्वांनी ती जबाबदारी देखील सांभाळली. पहिल्या दिवशी कथेच्या ठिकाणी जातांना रात्री १०.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर एका दुचाकीस्वाराला चारचाकीने जोरदार धडक दिली. दुचाकीस्वाराच्या पायाचे हाड मोडले आणि रक्तबंबाळ अवस्थेत तो वेदनेने विव्हळत रस्त्याच्या कडेला पडलेला होता. मी आणि सहकारी जकी याच्यासह आणखी दोघांनी त्याला उचलून एका रिक्षात टाकले तेव्हा मदतीला स्वयंसेवक नव्हे तर पोलिसच धावले. नव्याने भरती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जखमीची दुचाकी चालविण्याच्या स्थितीत नसताना देखील एकमेकांच्या मदतीने शहर पोलीस ठाण्यात आणली आणि डिक्कीतील सर्व साहित्य देखील सुस्थितीत ठेवले. पोलीस वेळीच पोहचले नसते तर त्या बाबांच्या वाहनाचा आणि साहित्याचा देखील पत्ता लागला नसता.



शिवमहापुराण कथेच्या निमित्ताने जळगावकरांनी भक्तीचा जो महामेळा अनुभवला कदाचित भविष्यात पुन्हा कधी ती वेळ येईल. जळगावात आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, उद्धव ठाकरे, शरद पवार असे दिग्गज राजकारणी आणि किरीट भाईजी, इंद्रदेवजी महाराज यांच्यासह देशातील प्रख्यात निरुपणकारांचे कार्यक्रम झाले मात्र इतकी गर्दी कुठेही पाहायला मिळाली नाही. पोलीस हा समाजाचा असा घटक आहे जो कुटुंब विसरून ‘सद्ररक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रीद सार्थ ठरविण्यासाठी झटत असतो. जळगावातील शिवमहापुराण कथा निर्विघ्नपणे पार पडल्यावर सर्व पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. कौतुकास्पद बाब म्हणजे अवघ्या १० दिवसापूर्वी पदभार स्वीकारून देखील अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी स्वतः हातात माईक घेत वाहतूक नियमन केले आणि भाविकांना योग्य ते मार्गदर्शन केले हे विशेष आहे. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार हे दुपारपासून रात्रीपर्यंत अनेकदा कथास्थळी आणि मार्गावर भेट देत होते आणि बऱ्याचदा थांबून देखील होते. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, कृष्णांत पिंगळे, पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, महेश शर्मा, डॉ.विशाल जैस्वाल, अनिल भवारी, रंगनाथ धारबळे, सहाय्यक निरीक्षक देविदास इंगोले यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, सर्व पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व होमगार्डने आपले कर्तव्य चोख बजावल्यानेच सर्व कायदा व सुव्यवस्था राखत पार पडले. कथेच्या निमित्ताने पोलिसांवर टीका अनेकांनी केली असेल पण पोलीस देखील मनुष्य आहे आणि त्यांच्या देखील भावना जाणून जळगावकर म्हणून पोलिसांना एकदा सन्मानाने सल्युट मारायला लाजू नका. स्वयंसेवक, सेवेकरी म्हणून आपण लाख मिरवून घेतले असेल पण खरा सेवेकरी पोलीसच होता हे विसरू नका. जय हिंद.

- चेतन रविंद्र वाणी, जळगाव

मो.९८२३३३३११९, ७०२०५८८२८८





Saturday 9 December 2023

ट्रॉफीच नव्हे, मने जिंकणारे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार!

ट्रॉफीच नव्हे, मने जिंकणारे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार!



चेतन वाणी : जळगाव जिल्ह्यात नुकतेच नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. एरव्ही शिस्त आणि कायद्याच्या दृष्टीने कणखर असणारे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांचे दुसरेच रूप गेल्या ७ दिवसात ५ जिल्ह्यातील पोलीस खेळाडूंनी पाहिले. जेव्हा पोलीस अधीक्षक स्वतः खेळाडू म्हणून सहभागी होतात तेव्हाच खेळाडूंना देखील उत्साह संचारतो आणि ते विजयश्री खेचून आणतात. जळगाव जिल्ह्यात विभागीय क्रीडा स्पर्धा होणार असल्याने 'न भूतो न भविष्यती' नियोजनाचा विडा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी उचलला. गेल्या २ महिन्यांपासून खेळाडूंशी होत असलेली चर्चा, मायक्रो नियोजनाने सर्व शक्य झाले आणि महिला व पुरुष दोन्ही गटात सर्व साधारण विजेतेपद जळगाव जिल्ह्याने मिळवले. शेवटच्या दिवशी समारोपीय कार्यक्रमात सर्वांना मनसोक्त मजा लुटता आली आणि जेवणाचा तृप्तीचा ढेकर देत सर्व आपल्या घरी मार्गस्थ झाले. 

जळगाव एखादा पोलीस अधिकारी कधी पोलिसांसाठी चांगला असतो तर कधी फारच शिस्तीचा किंवा त्रासदायक ठरतो. जळगाव जिल्हा तसा गेल्या काही वर्षापासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बाबतीत फार चांगला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना सांभाळून घेणारे, समजणारे आणि पोलिसांचे हित पाहणारे पोलीस अधीक्षक जिल्ह्याला लाभले आहे. गेल्या वेळीचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी तर सर्वांना चांगलेच सांभाळले आणि पोलिसांच्या आनंदाचा तरंग उत्सव देखील उत्कृष्टपणे पार पाडला. बदली असो की विभागांतर्गत कारवाई डॉ.प्रवीण मुंढे यांनी सर्वांना योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला. डॉ.मुंढे यांची बदली झाली आणि पोलीस अधीक्षक म्हणून एम.राजकुमार यांनी पदभार स्विकारला.

पोलीस अधीक्षक एम.राजकुमार हे शिस्तप्रिय आणि कुटुंबवत्सल म्हणून ओळखले जातात. जळगावात येऊन वर्ष पूर्ण होत असल्याने त्यांच्या कार्याची प्रचिती बहुदा सर्वांना आलेली आहे. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या कार्यकाळात पोलिसांसाठी होणारा सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा. जळगाव जिल्ह्यात नुकतेच स्पर्धा संपन्न झाल्या. जळगाव जिल्ह्यात २०१७ नंतर यंदा नाशिक परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडणार असल्याने पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी स्वतः पुढाकार घेतला. जळगावात होत असलेल्या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यालाच विजेतेपद मिळावे यासाठी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी तीन महिने अगोदरपासुनच नियोजन सुरू केले. सर्व क्रीडा प्रकारातील पोलीस खेळाडूंना एकत्र करीत त्यांनी पोलीस मुख्यालयाशी जोडले. सर्वांशी चर्चा करून प्रमुखांची बैठक घेतली आणि विजयाचा मंत्र देत विजयश्री खेचून आणण्याचा निर्धार करून घेतला.

जळगावचे पोलीस खेळाडू तसे हुनहुनरी मात्र त्यांच्यात सामील होत प्रोत्साहन देण्याचे कार्य पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी केले. एरव्ही पोलीस खेळाडू आणि अधीक्षक किंवा अधिकारी यांची जर्सी वेगळी असे मात्र यंदा असा भेदभाव दिसून आला नाही. सुरुवातीपासूनच खेळाडूंच्या हिताचा विचार करणाऱ्या अधिक्षकांनी हव्या त्या वस्तू, क्रीडा साहित्य तत्काळ उपलब्ध करून दिले. सर्व साहित्य मिळत असल्याने खेळाडू देखील जोमाने तयारीला लागले होते. सर्व क्रीडा प्रकारातील खेळाडूंचा पोशाख, राहण्याखाण्याची व्यवस्था, वेळोवेळी चर्चा, बैठक यामुळे नियोजन सफल ठरले. 

पोलीस अधीक्षक एम.राजकुमार हे स्वतः पुढाकार घेत तर होतेच शिवाय त्यांनी पोलीस कल्याण विभाग, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपविभागीय अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक, राखीव पोलीस निरीक्षक यांच्यासह सर्व विभागांना जबाबदारी वाटून दिलेली असल्याने इतर जिल्ह्यातून आलेल्या एकही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली नाही. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार हे स्वतः दररोज सकाळी रनिंग, सायकलिंग करीत असल्याने आणि स्वतः खेळाडू असल्याने त्यांनी फुटबॉल स्पर्धेत सहभाग देखील नोंदविला. केवळ सहभागीच झाले नाही तर एम.राजकुमार यांनी सलग दोन दिवस केलेल्या सुपर गोलमुळे जळगाव संघाला जेतेपद देखील मिळाले.

विजेतेपद जळगाव जिल्ह्याला मिळेल याची खात्री पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांना होतीच मात्र सर्व खेळाडूंचा आत्मविश्वास उंचाविण्यासाठी त्यांनी सातपुडा ऑटोमोबाईल्सच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडू पुरुष आणि महिला अशा दोघांसाठी दोन दुचाकी पारितोषिक म्हणून ठेवल्या. शेवटच्या दिवशी पारितोषिक वितरणानंतर मनोरंजन संगीत संध्या ठेवण्यात आली होती. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून पोलीस अधीक्षक कुटुंबासह स्पर्धांना हजेरी लावत होते. बऱ्याच ठिकाणी तर ते चिमुकलीला देखील घेऊन जात होते. पहिल्या दिवसापासून असलेली कुटुंबाची हजेरी शेवटच्या दिवशी देखील कायम होती. खेळाडू पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि सहकाऱ्यांसोबत पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी कुटुंबासह सहभाग नोंदवीत गाण्याच्या तालावर ठेका धरला. 

स्पर्धेसाठी आलेल्या पाहुण्या खेळाडूंच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून सर्वांना आवडेल त्या जेवणाची फर्माईश पूर्ण करण्यात आली. कोणत्याही क्रीडा प्रकारात जळगाव संघाचा पराभव झाला तरी पोलीस अधीक्षक आपल्या खेळाडूंना समजावून सांगत होते तर विजेत्या संघाचे अभिनंदन करून प्रोत्साहन देखील देत होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी केलेल्या आभारपर भाषणाने सर्वांना हसविले आणि काहीसे भावूक देखील केले. पोलीस अधीक्षक विजयी चषक हातात घेत माझ्या मुलांनी ‘हा कप आम्हीच ठेवू’ असा शब्द दिला होता आणि तो पूर्ण करून दाखविला आहे. 'आज मी इथे आहे पुढे नसणार मात्र हा कप इथेच राहील', असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तब्बल २० वर्षानंतर जळगाव जिल्हा पोलीसदलाला नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे जेतेपद मिळाले ही जिल्हा पोलीस दलासाठी खरोखरच अभिमानाची बाब आहे.

पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून शेवटची नेमणूक आहे. पोलीस अधिक्षकांची पदोन्नती अपर पोलीस महानिरीक्षक म्हणून कधीच झाली असून जळगावातून बदली झाल्यानंतर पुढे कायम ते वरिष्ठ पदांवरच राहणार आहेत. जळगावातील आपली कारकीर्द कायम संस्मरणीय रहावी यासाठी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी घेतलेल्या मेहनतीला सलाम. भविष्यात देखील ते खेळाडूवृत्तीचे प्रदर्शन करतील आणि खाकीची प्रतिमा आणखी उंचावतील यात शंकाच नाही. नुकतेच सांगायचं झालं तर गत आठवड्यात पार पडलेल्या खान्देश रन स्पर्धेत पोलीस अधीक्षकांनी सहपरिवार सहभाग नोंदविला आणि मोठी दौड लगावली. शिस्त, व्यायाम, चिकाटीची सांगड घातली तरच 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद साध्य होईल हाच संदेश क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी दिला. 


- चेतन रविंद्र वाणी, जळगाव

मो.9823333119, 7020588288

Saturday 30 September 2023

गणेशोत्सव विसर्जन/ईद मिलाद : अनेक महिन्यांचे फलीत, शेवटचा तासभर मैत्रीचा सल्ला ठरला मोलाचा!

गणेशोत्सव विसर्जन/ईद मिलाद : अनेक महिन्यांचे फलीत, शेवटचा तासभर मैत्रीचा सल्ला ठरला मोलाचा

चेतन वाणी : गणरायाचे आगमन म्हणजे सर्वत्र चैतन्य आणि सणासुदीची मांदियाळी आणणारा उत्सव. सामाजिक एकोपा जपणारा हा सोहळा गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत आनंददायी असतो.  गणेशोत्सवाच्या काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये याची जबाबदारी पोलीस दलाची असल्याने ते जास्त सतर्क असतात. जळगाव जिल्ह्यात यंदा सर्वत्र गणेशोत्सव शांततेत पार पडले आणि ईद मिलाद देखील उत्साहात साजरे झाले. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यात पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांचे मायक्रो मॅनेजमेंट यशस्वी ठरले. मुख्य म्हणजे संपूर्ण पोलीस दलात सिंहाचा वाटा राहिला तो जळगाव 'एलसीबी'चा.

जळगाव जिल्ह्यात कोणत्याही गावात किंवा शहरात कोणतेही गालबोट न लागता गणेशोत्सव आणि ईद मिलाद शांततेत पार पडल्याचे हे कदाचित पहिलेच वर्ष असावे. मुख्यत्वे ग्रामीण भागात नियमात आणि पोलिसांच्या सूचनेप्रमाणे सर्व विसर्जन आणि जुलूस मिरवण्यात आले. जळगाव जिल्ह्यात रावेर, चोपडा, चिनावल, अडावद, धानोरा, नशिराबाद, भुसावळ, वरणगाव, एरंडोल, पाळधी, अमळनेर, पाचोरा हे संवेदनशील वर्गात येणारी गावे म्हणून मोडली जातात. सणोत्सवाच्या काळात काही समाजकंटकांमुळे याठिकाणी वाद उद्भवतो किंवा काही मतभेद झाल्याने वाद होतात. बऱ्याचदा दगडफेक किंवा किरकोळ दंगलीचे प्रकार देखील घडले आहे.

गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्याची जबाबदारी पोलिसांवरच जास्त असते. गणेशोत्सवपासून सणासुदीच्या काळाला सुरुवात होत असल्याने आगामी महिन्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी अगोदरचे काही महिने त्याचे नियोजन करावे लागते. जळगाव जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी आपल्या स्टाईलने कामाला सुरुवात केली. फटके कमी आणि कागद जास्त चालवून त्यांनी आपली छबी उमटवली. अवघ्या १० महिन्यात ४ मोठ्या गँगवर मोक्का आणि ३० पेक्षा अधिक गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. गुन्हेगारांची यादी तयार करणे, एमपीडीए प्रस्तावातील त्रुटी दूर करणे, पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाने प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविणे आणि तो मंजूर करून घेण्याचे दिव्य टीम एलसीबीने पार पाडले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील गुन्हेगारीचा बीमोड करण्याचा विडाच उचलला असल्याप्रमाणे आपले कर्तव्य चोख बजावत तत्काळ प्रस्तावांना मान्यता दिली.

मोक्का आणि एमपीडीए कारवायांमुळे अनेक गुन्हेगारांनी धास्ती घेतली असून 'मेरा नंबर कब भी आयेगा' म्हणत गुन्हेगार लपत आहे. इतकंच नव्हे तर जळगाव पोलिसांनी हद्दपारच देखील सपाटा लावला असून प्रांताधिकाऱ्यांचे देखील कारवाईला पाठबळ लाभत आहे. यंदाचा गणेशोत्सव, गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईद मिलाद पोलीस व जनतेसाठी काही खास होती. गणेशोत्सव साजरा करताना अनेक मंडळांना परवानगी मिळण्यात अडचणी आल्या, मनपा, महावितरण आणि धर्मदाय आयुक्त कार्यालयाची परवानगी सहजासहजी मिळाली नाही तरीही पोलिसांनी कोणत्याही मंडळाला रोखले नाही. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे दौरे असल्याने पोलिसांना फारसा वेळ मिळाला नाही तरीही पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले. गणेश चतुर्थीच्या काही दिवस अगोदर शांतता कमिटी आणि मंडळांची बैठक घेत सूचनांचे स्वागत पोलिसांनी केले. त्याचेच फळ म्हणून विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळांची संख्या वाढली. अनेक ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले.

www.chetanwani.blogspot.com

गणेशोत्सवाचे ९ दिवस शांततेत पार पडले आणि पोलिसांसह भाविकांनी देखील आनंद घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने रात्री १२ वाजता वाद्य बंद करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. सातव्या दिवशी चोपड्यात उल्लंघन झाले आणि पोलिसांनी ३० मंडळांवर गुन्हे दाखल केले. चोपड्याचा परिणाम इतरत्र झाला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी जळगावात पहिल्यांदाच रात्री १२ वाजता वाद्य बंद झाले आणि १ वाजता रस्ता मोकळा झाला. गेल्या वर्षी बऱ्याच मंडळांना रात्री १२ वाजले तरी जागेवरून हलने शक्य झाले नव्हते मात्र यंदा जवळपास सर्व मंडळांना आपले प्रदर्शन आणि उत्कृष्ट नृत्य, लेझीम सादरीकरण करता आले. सार्वजनिक गणेश महामंडळाचे नियोजन, गणरक्षकांची भूमिका, पोलिसांनी उभारलेली अलार्म व्यवस्था, माजी पोलीस आणि वनरक्षकांची मदत कामी आली.

पोलीस आपले कर्तव्य पार पाडत होते पण त्यांना मानसिक आधार दिला तो मुस्लीम समुदायाने. गणेश विसर्जन असल्याने ईद मिलाद एक दिवस पुढे ढकलण्यात आली. इतकंच नव्हे तर गणेश विसर्जन मिरवणूकमुळे पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठल्याने त्रास होऊ नये म्हणून ईद मिलाद  मिरवणुकीची (जुलूस) वेळ सकाळी ८ ऐवजी १० वाजता ठेवण्यात आली. मुख्य म्हणजे विविध परिसरातील मिरवणुका एकत्र करण्यात आल्या. मुस्लीम समुदायाने दाखविलेल्या मोठेपणाचे अनेकांनी कौतुक केले.

जळगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर दुपारपासून रात्रीपर्यंत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दिवसभर कर्तव्य बजावत उभे होते त्यात उन्हाचा तडाखा जोरदार होता. काही कर्मचारी तर अगोदरच्या दिवशी देखील रात्री नियोजन करीत होते. विसर्जन मिरवणुकीत वाहन लावण्यावरून वाद झाल्याने पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, परिरक्षावधिन उपअधीक्षक आप्पासो पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासह सर्व प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. एलसीबीच्या पथकाला तर जिल्हाभरातील संवेनशील भागात विसर्जन मिरवणुकीत जाऊन आपले कर्तव्य बजावावे लागले.

www.chetanwani.blogspot.com

जळगावात दिवसभर गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेकदा पायी फिरून पाहणी करीत असताना पोलिसांनी कुणालाही रोखले नाही किंवा कोणत्याही कार्यकर्त्याला अरेरावी केली नाही. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार आणि अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी दोघे दिवसभर शहर पोलीस ठाणेजवळ ठाण मांडून होते. रात्री १२ वाजताच पोलीस अधीक्षक नेहरू चौकाच्या दिशेने तर अपर पोलीस अधीक्षक भिलपुरा चौकाच्या दिशेने रवाना झाले. पोलिसांच्या विनंतीला मान देत सर्व मंडळांनी वाद्य बंद केली आणि अवघ्या तासाभरात सर्व रस्ता देखील मोकळा झाला. १-२ मंडळांनी अर्धा तास वाद्य वाजविण्याची परवानगी मिळावी म्हणून सर्वपक्षीय नेत्यांना साकडे घातले मात्र त्यांचे प्रयत्न विफल ठरले. नेहरू चौकाजवळ एका मंडळाच्या ट्रॅक्टर चालकाला फिट्स आल्याने तो खाली कोसळला. पोलीस अधीक्षकांनी स्वतः धाव घेत गर्दी बाजूला केली आणि रुग्णाची पाहणी केली.

मध्यरात्री १२ वाजेनंतर देखील काही मंडळांचे कार्यकर्ते भिलपुरा मशिदीजवळ जोरदार घोषणाबाजी करीत कमी आवाजात वाद्य वाजवीत होते. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी तरुण कार्यकर्त्यांना शांततेत सूचना केल्या. मंडळाच्या युवा अध्यक्षाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला बाजूला घेऊन जात प्रेमाने विनंती केली. 'आम्ही कालपासून रस्त्यावर आहोत. उद्या पुन्हा सकाळी बंदोबस्त आहे. पोलिसांनी देखील आराम करायला संधी द्या आणि बाप्पाला शांततेत निरोप द्या'. पोलीस अधीक्षकांनी खांद्यावर हात ठेवून केलेल्या विनंतीमुळे कार्यकर्त्यांना देखील आपलेपणा वाटला आणि विनंतीचा मान राखत ते पुढे सरकले. सर्व मंडळ पुढे मार्गस्थ झाल्यावर पोलीस अधीक्षक शहर पोलीस ठाण्यात आले. दिवसभर मेहनत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची गळाभेट घेत हस्तांदोलन करून अभिनंदन केले. रात्री १.१५ वाजता क्युआरटी पथकाला त्यांनी मेहरूण तलावावर येण्याच्या सूचना केल्या मात्र सर्वांचे चेहरे उतरलेले पाहून अधीक्षकांनी त्यांना घरी जाण्याच्या सूचना केल्या.

१.३० वाजता शहरात फेरफटका मारत पोलीस अधीक्षक एम.राजकुमार मेहरूण तलावावर रवाना झाले. विसर्जनाचा आढावा घेत पोलीस अधीक्षकांनी अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी व इतर प्रभारी अधिकाऱ्यांना घरी जाण्याच्या सूचना केल्या व ते स्वतः तलावावर थांबले. एकीकडे एरंडोल शहरात रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना पोलीस अधीक्षक मेहरूण तलावावर थांबून होते. सर्व मोठे गणपती मेहरूण तलाव परिसरात पोहचल्यावर पोलीस अधीक्षक पहाटे घरी निघाले. यंदा पहिल्यांदाच सर्व विसर्जन लवकर आटोपले. पोलीस अधीक्षकांनी स्वतः सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. दुसऱ्या दिवशी ईद मिलाद मिरवणुकीसाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सकाळीच हजर झाले. पहाटे ४ ते ७ दरम्यान घरी पोहचून देखील पोलीस सकाळी ७ ते १० च्या आत कर्तव्यावर हजर झाले. तब्बल तीन दिवसांची झोप मोड, भूक मोड करून पोलिसांनी जळगाव जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली ही शहराच्या दृष्टीने कौतुकास्पद बाब आहे. गणेश मंडळांनी शांतता राखत सहकार्य केल्यानेच हे सर्व शक्य झाले. 

www.chetanwani.blogspot.com

जळगाव शहरात विसर्जन मिरवणुकीत सहभागी प्रत्येक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना आपले लेझीम सादरीकरण करण्यासाठी पुरेशी संधी मिळावी म्हणून काही नवीन उपाय शोधणे आवश्यक आहे. विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आणखी मोठा करणे, विसर्जन मिरवणूक मार्गावर असलेले स्वागत व्यासपीठ जवळ-जवळ उभारणे, ठराविक व्यासपीठ उभारण्यास परवानगी देणे, सादरीकरणाची वेळ निश्चित करणे असे काही बदल केल्यास निश्चितच त्याचा सकारात्मक परिणाम येणाऱ्या काळात दिसून येईल. बाप्पाची कृपा दरवर्षी प्रमाणे यंदा देखील जळगावकरांवर राहिली आणि येणाऱ्या काळात देखील असू द्यावी, हीच श्रीचरणी प्रार्थना.

Monday 21 August 2023

इन्सायडर स्टोरी : बाप तो बाप रहेगा..!


इन्सायडर स्टोरी : बाप तो बाप रहेगा..!

जळगाव जिल्ह्यात प्रथमच पोलीस, महसूल आणि आरटीओ विभागाने संयुक्तरीत्या मोठी कारवाई केली. ५३ ट्रॅक्टर आणि १४ डंपर, ट्रक पथकाने बांभोरी गावातून ताब्यात घेतले. अतिशय गोपनीय पद्धतीने भल्या पहाटे यशस्वीरित्या पार पडलेल्या कारवाई मागे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांचे मायक्रो सिक्रेट प्लॅनिंग कारणीभूत आहे. पोलिसांनी कारवाई केली हे सर्वांना माहिती आहे मात्र का केली यामागील काही कारणे महत्त्वाची आहेत. कुणाच्याही दबावाला न जुमानता केलेल्या कारवाईमुळे जिल्हाभरातील वाळूमाफिया कमालीचे धास्तावले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील बरेच गावगुंड विशेषतः तरुण गेल्या काही वर्षात अवैध धंद्याच्या नादी लागले आहेत. सट्टा, पत्ता, जुगार, कुंटन खाना व्यवसायात आणि खास करून अवैध वाळू वाहतुकीच्या बळावर कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याची सवय तरुणाईला लागली. झोपडपट्टी बहुल भागासह इतरही भागातील तरुण आणि प्रौढ यात उतरू लागले. सुरुवातीला मोजकेच असलेल्या गावगुंडांनी आपल्या गँग तयार केल्या. राजकारण्यांची साथ मिळू लागल्याने गुंड सुसाट झाले आणि त्यातच काही प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हफ्तेखोरीने त्यांना बळ मिळाले. अवैध धंद्यात पैशांचा पाऊस होऊ लागल्याने मोजकेच वरचढ झाले आणि मग सुरू झाली स्पर्धा.

स्पर्धेत गँगवार रंगू लागले आणि बंदुका, चाकू, सुरे चालले. सावकारी धंद्याने त्यात भर टाकली. गुंडांना आर्थिक रसद मिळू लागली सोबतच जास्तीची आमदनी होऊ लागली. पैसा खेळता राहू लागल्याने काही जण स्वतःला बादशाह समजू लागले. भांडणं, वाद कुणाची असो मध्यस्थी करायला हेच ठेकेदार जाऊ लागले. पोलीस ठाणे असो की महसूल कार्यालये सर्व प्रकरणे त्यांनीच पार पाडायची असा पायंडा पडला. काही गुंड स्वतःला सर्वांचा बाप समजत असल्याने जिथे तिथे प्रशासनाला ते बॉयकॉट करीत दुय्यम स्थान देत होते.

वाळूमाफियांकडून पोलीस आणि महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अनेकदा झाले, किंबहुना ते आता नित्याचेच होऊ लागले होते. वाळूमाफियांचा उपद्रव जिल्ह्यात इतका वाढला की अखेर माध्यमातून वृत्त प्रकाशित झाले आणि प्रशासनाला मानवी हक्क आयोगाची नोटीस पोहचली. दुसरीकडे माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी नेहमीप्रमाणे तक्रारी आणि आरोप करणे सुरूच ठेवले. मावळते जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना ते चांगलेच भारी पडले. वाळूमाफियांनी पाच दिवसापूर्वी एक पंगा घेतला आणि तिथेच ते चुकले.

पाळधी येथे गोमांस असल्याच्या संशयावरून एक ट्रक अडविण्यात आला. कोणतीही खात्री न करता बांभोरी येथील काही तरुणांनी जमाव बोलविला. पोलीस शांतता राखण्याचे आवाहन करीत असताना काही तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली. एकाने तर चक्क परिरक्षावधीन उपअधीक्षक आप्पासो पवार यांना गर्दीतच 'ओपन चॅलेंज' दिले आणि तिथेच खटका पडला. कारण गोमांस वाहतुकीचा संशय दिसत असला तरी गेल्या दोन महिन्यांपासून आप्पासो पवार वाळूमाफियांवर करीत असलेली कारवाई तरुणांना खटकली होती. आपला बदला घेण्याच्या दृष्टीने काहींनी पोलिसांवर दगडफेक केली. पवार स्वतः देखील जखमी झाले. काहींनी ट्रकवर हल्ला करीत ट्रक जाळला. 

पोलिसांवर हल्ला झाला आणि तेव्हाच जिल्ह्यात येणारा प्रत्येक अधिकारी सारखाच असतो असा समज खोटा ठरवण्याची वेळ आली. मानवी हक्क आयोग नोटीस, पोलिसांवरील हल्ला, माहिती अधिकार कार्यकर्त्यांची तक्रार आणि दररोज होत असलेले आरोप लक्षात घेता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी मायक्रो प्लॅन आखला. आपलेच फितूर होऊ नये म्हणून सर्वांना गाफील ठेवले. पाळधी घटनेत पोलिसांचे जागरण झालेले असताना देखील पुन्हा दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेची वेळ निश्चित करण्यात आली. योगायोगाने तो दिवस शनिवार ठरला. अधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर कारवाईचे नाव करीत गनिमी कावा खेळला होता. काही पथक बांभोरी पुलाजवळ तर काही पाळधी येथे थांबून असताना मुक्ताईनगरच्या दिशेने निघालेल्या पथकाने यु टर्न घेतला आणि कारवाईला सुरुवात झाली.

आपल्यावर कारवाई होणारच नाही आणि जर झालीच तर आपण सहज पळून जाऊ असा अतीआत्मविश्र्वास बाळगून असलेले वाळूमाफिया प्रशासनाच्या सापळ्यात अडकले. नेत्यांना जाग आली तोवर ६५ पेक्षा अधिक वाहने पोलिसांनी पकडली होती. १०.३० च्या सुमारास नेत्यांचा फोन आला आणि त्यानंतर कारवाई आटोपती घेण्यात आली मात्र तोवर मिशन फत्ते झाले होते. पोलीस आणि महसूल प्रशासनाने दाखवून दिले की 'बाप तो बाप रहेगा'. जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांवर केलेल्या कारवाईमुळे आज अनेकांचे धाबे दणाणले असले तरी अद्यापही गिरणा, तापी, वाघूर काठच्या अनेक गावात ट्रॅक्टर, डंपर, ट्रक लावून माफिया बसलेले आहेत. शहरातील मातब्बर वाळूमाफिया देखील अद्याप बिनधास्त असून त्यांच्यावर कारवाई करून प्रशासनाला आपला दबदबा दाखविणे गरजेचे आहे.

आजच्या कारवाईचे सर्व श्रेय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, आरटीओ विभाग आणि सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांना जाते. एक विशेष सांगायचे राहिलेच.. भल्या पहाटेपासून सुरू झालेल्या कारवाईनंतर पोलिसांनी सर्व वाळूमाफियांसाठी नाश्ता, पाण्याची व्यवस्था देखील केली. इतकंच नव्हे तर एका तरुणाच्या पायाला इजा झाली तर त्यासाठी प्रथमोपचार देखील पोलिसांनी करून दिले. कुणालाही मारहाण न करता शांततेत केलेली कारवाई नक्कीच कौतुकास्पद आहे.

- चेतन वाणी, जळगाव



Wednesday 9 August 2023

इनसायडर स्टोरी : डॉ.अश्विन सोनवणे यांचे उपोषण फसले का?

इनसायडर स्टोरी : डॉ.अश्विन सोनवणे यांचे उपोषण फसले का?


जळगाव शहराची अवस्था सर्वांनाच ठावूक आहे. गल्लोगल्ली रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून शहर खड्ड्यांनी भरले आहे. कचरा आणि अस्वच्छ गटारींनी परिसर व्यापले असतांना स्वच्छतेच्या नावाने लाखोंची बिले वर्ग केली जात आहे. ठराविक परिसरात विकासकामे होत असून इतरांना मात्र वाटाण्याच्या अक्षता दिल्या जात आहे. जळगाव शहरातील विकासकामांविषयी माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला. भाजप सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाचे नेते संकटमोचक ना.गिरीश महाजन यांच्या कानावर देखील सोनवणे यांनी तो विषय घातला होता. डॉ.सोनवणे आपला हेतू घेऊन पुढे सरकत असतानाच काही लोकांनी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत आपला हेतू साधला. शहरातील विकासकामांच्या मुद्द्यात आयुक्तांवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा मुद्दा मुख्य करण्यात आला. अवघ्या काही महिन्यांपूर्वी नगरसेवकांच्या नाकावर टिच्चून पुन्हा पदावर बसलेल्या डॉ.विद्या गायकवाड विरुद्ध डॉ.अश्विन सोनवणे असे चित्र रंगवण्यात आले.

www.chetanwani.blogspot.com

उपोषण सुरु झाले आणि विकासकामांच्या मुद्द्यावर डॉ.सोनवणे यांना तब्बल ५० पेक्षा अधिक नगरसेवकांचा पाठींबा मिळाला. उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी संकटमोचक ना.गिरीश महाजन यांचा डॉ.सोनवणे यांना  फोन आला. उपोषणाची माहिती घेत त्यांनी ते पुढे सुरु राहू देण्याचे देखील सांगितले. जळगाव शहर मनपात एकहाती सत्ता मिळवलेल्या भाजपमध्ये मोठी फुट पडली असल्याचे नगरसेवक फुटाफुटीच्या वेळीच सर्वांना लक्षात आले होते. डॉ.अश्विन सोनवणे यांच्या उपोषणावेळी देखील ते दिसून आले. नगरसेवकांनी पाठींबा तर दिला मात्र आ.राजूमामा भोळे यांचा जाहीर पाठिंबा दिसून आला नाही. आपल्या सर्व बॅनरवरून डॉ.सोनवणे यांनी आ.भोळे यांचा फोटो कधीच बाजूला केला आहे. डॉ.सोनवणे आमदारकीच्या शर्यतीत येत असल्याने आ.भोळे आणि त्यांच्यात फुट पडल्याचे उघड झाले आहे.

नेत्यांशी चर्चा केल्यावर उपोषण सोडविण्याचे कार्य आ.राजूमामा भोळे यांनीच केले. अविश्वास ठराव विशेष महासभेत ठेवत पुढील रणनीती राबविण्याचे नगरसेवकांनी ठरविले फक्त कस लागणार होता तो जादुई आकडा गाठतांना. इकडे हे सर्व ठरत असतांना एक गट अविश्वास ठराव रद्द करण्यासाठी पुढे सरसावला. थेट कुणीही पुढे आले नसले तरी फोनाफोनी करीत लाभार्थी सर्वांनी नेत्यांचे कान भरण्याचे काम चोख केले. अधिवेशन काळात सुट्टी येताच नेते जळगावात पोहचले आणि अजिंठा विश्रामगृहात एक बैठक झाली. दुसरीकडे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे देखील दुसरी छुपी बैठक झाली. डॉ.विद्या गायकवाड यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव पारित केल्यास भविष्यात त्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. एखाद्या अधिकाऱ्याच्या कार्याची सुरुवातच अशी झाली तर भविष्यात पोस्टींग मिळवताना ते अडचणीचे ठरते.

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून विद्यमान मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन हे तयारी करीत असून आयुक्त अविश्वास ठरावाच्या मागे महाजन असल्याचे चित्र उभे करण्यात आले आणि तसा संशय पालकमंत्री ना.पाटील यांच्या मनात देखील काही लाभार्थ्यांनी पेरला होता. काहींनी तशी माहिती त्यांच्यापर्यंत अलगद पोहचवली. सुनील महाजनांचे मनसुबे फळाला जावू नये, आपल्या गटातील नगरसेवक आणि काही ठराविक पदाधिकाऱ्यांच्या माहितीवर ना.पाटील यांनी विश्वास ठेवला आणि मंत्री महाजन यांच्यापर्यंत ते सर्व पोहचविले. राज्याचे राजकारण पाहणाऱ्या नेत्यांना जळगावातील परिस्थिती लक्षात घेता कुणालाही नाराज न करता निर्णय घ्यावा लागणार होता. अजिंठा विश्रामगृहातील बैठक यशस्वी ठरली. नेत्यांनी मार्ग काढला आणि आयुक्तांवरील अविश्वास ठराव मागे घेत बदलीची शिफारस करण्याचे त्यात ठरले. पालकमंत्री असल्याने ना.पाटील यांचा शब्द वरचढ ठरला. भाजपने देखील दुसऱ्या दिवशी महासभेत गुगली टाकली. अविश्वास प्रस्ताव मागे न घेता कोरम पूर्ण न झाल्याने सभा तहकूब करावी लागली, त्यामुळे तो प्रस्ताव अनिश्चित काळासाठी रोखला गेला.

जळगाव शहरातील कामांच्या बाबतीत पहिल्याच दिवशी आयुक्त डॉ.विद्या गायकवाड कामाला लागल्या. सर्वांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करीत त्यांनी आपले काम सुरु केले. डॉ.गायकवाड यांचे कार्य देखील उत्तम आहे यात शंका नाही मात्र सर्वांनासोबत घेऊन कार्य केल्यास आगामी काळात प्रभागात सर्व नगरसेवकांना तोंड दाखवायला जागा मिळेल. सध्या मनपात अधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू असून डॉ.गायकवाड यांच्या जोडीला नवीन उपायुक्त आणि अधिकाऱ्यांची साथ लाभणार आहे. स्वच्छता, गटारी, हॉकर्स पुनर्वसन, शहर सुभोभिकरण, स्वच्छतागृहे हे मुद्दे महत्त्वाचे असून सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी आणि पाठपुरावा करणे त्यांना आवश्यक आहे. जळगावकरांना आणि नगरसेवकांना देखील आयुक्त डॉ.गायकवाड यांच्यावर विश्वास असून त्या आपली जबाबदारी चोख पाडतील अशी आशा आहे.

पुढील महिन्यात जळगाव मनपाची मुदत संपत असून त्यानंतर प्रशासक प्रशासनाचे राज्य सुरु होणार आहे. तत्पूर्वी येत्या चार दिवसात ३० कोटींच्या कामासाठी विशेष महासभा बोलाविण्याच्या हालचाली सुरू आहे. पुढे देखील महिनाभराचा कालावधी शिल्लक राहणार असून त्यात कधीही विशेष महासभा बोलावून अविश्वास प्रस्ताव आणला जावू शकतो फक्त त्यासाठी संकटमोचक ना.गिरीश महाजन यांची मान्यता असणे आवश्यक आहे. जळगावातील कामे मार्गी लावण्यासाठी आणि समस्या सोडविण्यासाठी येणारा काळ सुगीचा असून त्यासाठी सर्वांचे एकमत होणे आवश्यक आहे.

www.chetanwani.blogspot.com

डॉ.अश्विन सोनवणे यांनी शहराच्या विकासासाठी उपोषण पुकारण्याची हिंमत पुढे कुणी दाखविणार? की, आहे त्याच नावेत स्वार होऊन पुढे जातील हे तर येणारा काळच सांगेल. डॉ.सोनवणे यांचे उपोषण काहींनी पब्लिसिटी स्टंट वाटला तर काहींना विधानसभा निवडणुकीची तयारी. सोनवणे यांनी घेतलेली भूमिका पक्षाच्या विरोधात वाटत असली तरी ती शहराच्या दृष्टीने योग्य होती. सध्या जळगाव शहर मनपात भाजपची कोणतीही सत्ता नाही. जळगाव शहराच्या विकासासाठी पहिल्यांदाच कुणीतरी नगरसेवक पुढे आला. विशेष म्हणजे त्या नगरसेवकाला इतरांनी देखील पाठींबा दिला. आज जरी सर्व शांत झाले किंवा सोनवणेंच्या आंदोलनाला हवी तशी प्रसिद्धी न देता उलट ते चुकीचे असे दाखविण्यात आले तरी येणाऱ्या काळात सोनवणे योग्य होते असे जळगावकर नागरिक नक्कीच म्हणतील.